पुरस्कार,गौरव
या वर्षीचा सहा जणांना भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील भि.ग.रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये ज्योती सोनवणे,लक्ष्मण महाडिक,डॉ.सुभाष वाघमारे,उत्तम बावस्कर,डॉ.जी.ए.उगले व डॉ.रामकिशन दहिफळे या लेखकांचा समावेश आहे अशी माहिती भि.ग.रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी दिली आहे.
“कै.के.बी.रोहमारे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन केलेल्या भि.ग.रोहमारे ट्रस्टतर्फे सामाजिक कृतज्ञतेच्या जाणीवेतून १९८९ पासून हा उपक्रम राबविण्यात येतो.ग्रामीण नवलेखकांच्या निर्मितीक्षम मनांना प्रोत्साहन देणे,हा यामागील मूळ उद्देश आहे”-अशोक रोहमारे,भि.ग.रोहमारे ट्रस्ट,पोहेगाव ता.कोपरगाव.
भि.ग.रोहमारे ट्रस्टतर्फे १९८९ पासून महाराष्ट्र पातळीवर ग्रामीण साहित्यातील कवितासंग्रह,कादंबरी,कथासंग्रह व समीक्षा या साहित्यप्रकारातील सर्वोत्कृष्ट ग्रंथांना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात.यावर्षी २०२१ या वर्षातील पुढील ग्रंथांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
काळवाटा-उत्तम बावस्कर (ग्रामीण कादंबरी-लोकवाड्मय गृह प्रकाशन मुंबई ) दमकोंडी-ज्योती सोनवणे (ग्रामीण कथासंग्रह – तेजश्री प्रकाशन कबनूर,कोल्हापूर) ‘स्त्री कुसाच्या कविता’-लक्ष्मण महाडिक (ग्रामीण कविता संग्रह-शब्दालय प्रकाशन प्रकाशन श्रीरामपूर) विभागून,संविधानाच्या स्वप्नातलं गाव-डॉ. सुभाष वाघमारे (ग्रामीण कविता संग्रह-साहित्यविश्व प्रकाशन पुणे) विभागून,सत्यशोधक दिनमित्रकार मुकुंदराव पाटील जीवन कार्य आणि लेखन-संपादक जी ए.उगले (ग्रामीण समीक्षा – अक्षरवाड्मय प्रकाशन पुणे) विभागून,परिवर्तनवादी साहित्य संकल्पना आणि स्वरूप-डॉ.रामकिशन दहिफळे (ग्रामीण समीक्षा स्वरूप प्रकाशन पुणे) विभागून.
प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना प्रत्येकी रोख १५ हजार रुपये,स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.या वर्षी कविता संग्रह व समीक्षा या साहित्य प्रकारातील ग्रंथांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.ट्रस्टकडे आलेल्या एकूण ७२ साहित्य कृतींपैकी उपरोक्त ग्रंथांची निवड करण्याचे कार्य प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे,प्राचार्य डॉ.भाऊसाहेब गमे,डॉ.बालाजी घारूळे,डॉ.जिभाऊ मोरे,डॉ.संजय दवंगे यांच्या संयुक्त निवड समितीने केले.वरील ग्रंथांशिवाय निवड समितीने ‘बुर्गांट’, ‘बवाळ’, ‘अक्षर यात्रा’, ‘अक्षरायन’, ‘रंग सारे मिसळू द्या’ या ग्रंथांचा उल्लेखनीय ग्रंथ म्हणून निवड समितीने विशेष निर्देश केला आहे.
पुरस्कृत ग्रंथांबद्दल निवड समितीने म्हटले आहे की,’‘काळवाटा’ या कादंबरीत समकालीन कथाकार उत्तम बावस्कर यांनी गावगाड्यातील अभावग्रस्त जगण्याला शब्दरूप दिले आहे.मराठवाड्यातील छोट्या खेड्यात शेतकऱ्याच्या मुलाला शिकण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि त्याच्यासमोर ठाकलेल्या समस्यांचा डोंगर वाचताना वाचकाला विचारप्रवृत्त करतो.स्वातंत्र्यानंतर खेड्यापाड्यात सर्वसामान्य गोरगरिबांचे नव्याने तयार झालेले शोषक आणि त्यांचे डावपेच सामान्य माणसाच्या जगण्याचा चुराडा कसे करतात याचे हृदयस्पर्शी चित्रण या कादंबरीत केलेले आहे.
तर ‘दमकोंडी’ या कथा संग्रहातील कथा गाव,खेडे आणि शहरातील स्त्रीची दमकोंडी शब्दबद्ध करणाऱ्या कथा आहेत.दमकोंडी सहन करत जीवनाच्या अवकाशातील काळेकुट्ट ढग बाजूला सारून क्षितिजावर चंद्रकोरीचा प्रकाश कोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांच्या या कथा म्हणूनच वाचकालाही अस्वस्थ करतात.
‘स्त्री कुसाच्या कविता’ या संग्रहातील सहा सुक्तांमध्ये विभागलेल्या कवितांमधून कवी लक्ष्मण महाडिक यांनी ग्रामीण वास्तवाचे प्रखर भान राखत जीवनातील सुखापेक्षा दुःखाच्या वेणा शांतपणे सहज बोलीभाषेत गावरान खेड्याच्या मराठमोळ्या पद्धतीने गुंफल्या आहेत.ग्रामीण जीवनाचे वर्तमान तटस्थपणे न्याहळून त्याचे विश्लेषण करण्याचे सामर्थ्य महाडिक यांच्या कवितेत आहे.विशेषतः स्त्रियांच्या भरकटल्या जाणाऱ्या आयुष्याची भैरवी वाचताना वाचक गलबलून जातो.त्याचबरोबर ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’ या डॉ.सुभाष वाघमारे यांच्या कवितासंग्रहातील १२१ कवितांमधून कवीने सत,असत या प्रवृत्तींच्या द्वंद्वांमध्ये असलेलं गाव चित्रित करताना संविधानात्मक स्वप्नाच्या रंगांनी नव्या गावाची व नव्या विश्वाची संकल्पना मांडली आहे.या कवितांमधून अत्याचारी व अन्यायी व्यक्ती व प्रवृत्तींवर मार्मिक शब्दांचे असूड ओढले आहेत.उपरोध,उपहासाच्या शैलीत व्यक्त झालेल्या या कवितांमध्ये ग्रामीण व शहरी शोषितांचा कैवार,स्त्री-सन्मान,वैश्विक मानवता व करुणा आदी मूल्ये आदी मूल्ये मंत्रमुग्ध करतात.
‘सत्यशोधक दिनमित्रकार मुकुंदराव पाटील जीवन कार्य आणि लेखन’ समीक्षा या ग्रंथातून जी.ए.उगले यांनी ग्रामीण आणि सत्यशोधकीय साहित्याची संकल्पना स्पष्ट करून दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या एकूणच कर्तुत्वाची मीमांसा करताना महात्मा फुले,कृष्णराव भालेकर आणि गणपतराव सखाराम पाटील यांच्या विचारांचा वसा आणि वारसा ग्रामीण भागात राहून कसा पुढे नेला याचे मौलिक व अभ्यासपूर्ण विश्लेषण केलेले आहे.तर ‘परिवर्तनवादी साहित्य संकल्पना आणि स्वरूप’ या डॉ. रामकिशन दहिफळे यांच्या संपादित ग्रंथात स्वतः दहिफळे आणि त्यांच्या ३२ सहकाऱ्यांनी ग्रामीण जीवनातील एकूणच सामाजिक राजकीय वास्तवाला शब्दबद्ध करत प्रमुख ग्रामीण लेखकांच्या योगदानावर व्यापक प्रकाशझोत टाकलेला दिसून येतो.वरिष्ठ ग्रामीण लेखक,समीक्षक डॉ.वासुदेव मुलाटे यांचा गौरव ग्रंथ असून देखील ग्रामीण साहित्यातील अनेक नामवंत आणि उदयोन्मुख समीक्षकांच्या दर्जेदार लेखनामुळे या ग्रंथाला संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे.त्यामुळेच या ग्रंथांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.
सदर पुरस्कार वितरणाचे हे ३३ वे वर्ष असून पुरस्कार योजनेचे ३४ वे वर्ष आहे.आजपर्यंत या पुरस्काराने महाराष्ट्रातील १६५ पेक्षा जास्त लेखकांना सन्मानित करण्यात आले आहे.या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण माजी खासदार,आंतराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर व ज्येष्ठ कवयित्री,शब्दालय प्रकाशनाच्या संचालक सुमतीताई लांडे यांच्या शुभहस्ते व कोपरगावचे माजी आ.व कोपरगाव तालुका सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै.के.बी.रोहमारे यांच्या पंचवीसाव्या स्मृतिदिनी दि.८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालय येथे केले जाणार आहे.या पुण्यस्मरण व भि.ग.रोहमारे साहित्य पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास साहित्य रसिक व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव ऍड.संजीव कुलकर्णी व के.जे.सोमैया महाविद्यालय प्राचार्य डॉ.डॉ.बी.एस.यादव यांनी केले आहे.