गुन्हे विषयक
चोरांची हुशारी…या सरकारी कार्यालयातून ट्रॅक्टर चोरी,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील ऐन मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व दिवसाचे चोवीस तास कॅमेऱ्या द्वारे चलचित्रण सुरु असलेल्या तहसिल कार्यालयाच्या आवारात उभा करून ठेवलेला वाळू चोरीतील ट्रॅक्टर अज्ञातच चोरट्याने चोरून नेल्याने या विशेष चोरीबद्दल तालुक्यात विशेष चर्चा सुरु झाली आहे.
संकल्पित छायाचित्र.
नूतन तहसील इमारतीच्या बाजूने चोवीस तास कँमेरे बसवलेले आहेत.त्या ठिकाणी उपकारागृह असून त्या ठिकाणी रात्रंदिन पोलिसांचा राबता असतो.आजूबाजूस अन्य इमारती असून त्या ठिकाणी बँका आणि व्यापारी आस्थापने सुरु असतात.त्या ठिकाणी चलचित्रण सुरु असल्याचे कोणाही नागरिकांच्या सहज दृष्टीपथास आल्याशिवाय रहाणार नाही.तरीही त्या ठिकाणी वाळूचोरीच्या गुन्ह्यात उभा करून ठेवलेला सुमारे १ लाख रुपये किंमतीचा विना क्रमांकाचा स्वराज-७४४ कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर कोणाच्याही परवानगी शिवाय चोरून नेला आहे आता बोला !
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पूर्वमुखी वहात असून ती वडगाव या ठिकाणी तालुक्यात प्रवेश करते.त्या ठिकाणाहून ते वारी हद्दीतून ती राहाता तालुक्यात व पुढे औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करते.संबंधित ठिकाणी वाळू चोरांनी हैदोस घालून या पवित्र नदीतून मोठ्या प्रमाणावर नाशिक,नगर,औरंगाबाद आदी जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांनी वाळूला सोन्याचे मोल आल्याने या नदीचे पात्र उजाड करून टाकले आहे.
याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात तत्कालीन खा.काळे यांनी आपल्या समर्थकामार्फत याचिका दाखल होऊनही फारसा फरक पडला नव्हता न्यायालयाच्या आदेशाला वाळूचोरांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या होत्या.अखेर उच्च न्यायालयाला याबाबत आपला आदेश मागे घ्यावा लागला होता.व सरकारचा बुडणारा महसूल पुन्हा वसूल करण्यास अनास्थेने परवानगी द्यावी लागली होती.मागावुन तर पोलीस,महसूल अधिकारी,उरलेसुरले राजकीय नेते यांनीही या लुटीत सहभाग घेऊन आपले पवित्र काम करून जनतेची बांधिलकी (?) दाखवून दिली आहे.आता फार थोडी वाळू या नदी पात्रात शिल्लक राहिली आहे.मात्र तिच्यावरही वाळूचोर डल्ला मारण्यास मागेपुढे पहात नाही.वर्तमानात पावसाळा मोठा व प्रदीर्घ पडला असून नदीस मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने वाळूचोरी नियंत्रणात आहे.
मात्र यापूर्वी वाळूचोरीत पकडले गेलेले वाहने तहसील कार्यालय आवारात उभी करून ठेवलेली आहे.त्यासाठी नूतन इमारतीच्या बाजूने चोवीस तास कँमेरे बसवलेले आहेत.त्या ठिकाणी उपकारागृह असून त्या ठिकाणी रात्रंदिन पोलिसांचा राबता असतो.आजूबाजूस अन्य इमारती असून त्या ठिकाणी बँका आणि व्यापारी आस्थापने सुरु असतात.त्या ठिकाणी चलचित्रण सुरु असल्याचे कोणाही नागरिकांच्या सहज दृष्टीपथास आल्याशिवाय रहाणार नाही.तरीही त्या ठिकाणी वाळूचोरीच्या गुन्ह्यात उभा करून ठेवलेला सुमारे १ लाख रुपये किंमतीचा विना क्रमांकाचा स्वराज-७४४ कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर कोणाच्याही परवानगी शिवाय चोरून नेला आहे.तो संबंधितांच्या दि.१० ऑक्टोबर रोजी निदर्शनास आला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी तहसील महसूल सहाय्यक राजेंद्र सुरेश उदावंत (वय-४५) यांनी दि.१३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एस.कोरेकर करत आहेत.या चोरीबद्दल सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.