शैक्षणिक
“जीवन गौरव पुरस्काराने” आपल्या कार्याला बळ-रोहमारे
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“प्रवरा नगर येथील अभिमत विद्यापीठाने ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन माझा जो सन्मान केला आहे त्यामुळे आज पर्यंत शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यात एका निष्ठेने जे कार्य करीत आलो आहे त्याला बळ प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे व लायन्स मूक बधिर व अपंग विद्यालयाचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“माजी आ.के.बी.रोहमारे यांच्या निधनानंतर खांद्यावर आलेली मोठी जबाबदार रोहमारे यांनी अतिशय क्षमतेने पेलली व आपल्या सचोटी,शिस्त व प्रामाणिकपणाने आजवर पुढे नेली.त्यामुळे सोमैया महाविद्यालय नगर जिल्ह्यातील एक नामांकित महाविद्यालय म्हणून नावारूपास आणले आहे”-चंद्रशेखर कुलकर्णी,माजी संचालक कोपरगाव सहकारी साखर कारखाना.
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी के.जे.सोमैया व के.बी.रोहमारे महाविद्यालय कोपरगाव,चासनळी व जवळके इत्यादी शैक्षणिक संकुलांच्या वतीने अशोक रोहमारे यांना अभिमत विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यावेळी उत्तर देताना ते बोलत होते.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव अड्.संजीव कुलकर्णी हे होते.
या कार्यक्रमास कोपारगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य सुनील शिंदे,रावसाहेब रोहमारे,मंदाताई रोहमारे,राहुल रोहमारे व संदीप रोहमारे तसेच कोपरगाव,चासनळी व जवळके येथील तीनही कॉलेजचे सर्व प्राध्यापक,प्राध्यापकेतर कर्मचारी,परिसरातील नागरिक,सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मला माजी आ.के.बी.रोहमारे यांच्या राजकारणाचा वारसा असला तरी नंतर राजकारणामध्ये शिरलेल्या अर्थकारणाचा मनापासून तिरस्कार वाटू लागला.त्यामुळे त्यापासून आपण दूर रहाणेच पसंत केले व शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यात रस घेतला.१९८५ ला मूक बधिर व अपंग विद्यालय सुरू केले.आरंभी त्यासाठी खूप अडचणी आल्या मात्र आज हे विद्यालय अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श विद्यालय मानले जाते.त्याचे श्रेय परिसरातील व्यापारी,शेतकरी यांनी जे सहकार्य केले त्यांचे आपण मनापासून ऋणी असल्याचे ते म्हणाले आहे.”
“१९९० ला आपण डॉ.वासुदेव मुलाटे व डॉ.गणेश देशमुख यांच्या सहकार्याने पोहेगाव येथे पहिले मध्य महाराष्ट्र ग्रामीण साहित्य संमेलन घेतले.या संमेलनास आनंद यादव,रा.रं.बोराडे,नागनाथ कोतापल्ले,रावसाहेब कसबे व रामदास फुटाणे यांच्यासारखे ख्यातनाम लेखक आले होते व त्यामुळे माझा त्यांच्याशी जवळून परिचय झाला.तेव्हाच आम्ही पहिला भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्काराचे वितरण केले.तेव्हापासून आजतागायत या पुरस्काराच्या निमित्ताने मंगेश पाडगावकर,विठ्ठल वाघ,ना.धो.महानोर,द.मा.मिरासदार व फ.मु.शिंदे आदी.कितीतरी दिग्गज साहित्यिकांचा सहवास लाभला.फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी हा पुरस्कार काहीही झाले तरी बंद करू नका असे तळमळीने मला सांगितले व या सर्व गोष्टींमुळे आपण राजकारणापासून अधिक दूर गेलो व तन-मन-धनाने या कार्याला वाहून घेतलेअसल्याचे शेवटी म्हणाले आहे”
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.डॉ.जिभाऊ मोरे यांनी तर उपस्थितांना मार्गदर्शन केले तर सचिव अड्.संजीव कुलकर्णी,स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य पंडितराव चांदगुडे,बाळासाहेब रहाणे,मनीष गाडे,प्रा.गणेश देशमुख,आदींनी मनोगतात रोहमारे यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
या प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या तीनही कॉलेजच्या वतीने प्राध्यापक संघटनेच्या स्थानिक शाखा व संजीवनीच्या वतीने आण्णा व शोभाताई रोहमारे यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी उपस्थितांचे स्वागत व रोहमारे यांच्या कार्याचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.शैलेंद्र बनसोडे यांनी तर आभार प्राध्यापक डॉ.संजय अरगडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.अभिजित नाईकवाडे,डॉ.बी.एस.गायकवाड,डॉ.एन.जी.शिंदे,आदी प्राध्याक व कार्यलयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहे.