कोपरगाव तालुका
गोदावरी दूध संघ गायींसाठी शेतकऱ्यांना कर्ज देणार-आश्वासन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गोदावरी खोरे दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना गायी खरेदीसाठी स्टेट बँकेच्या आर्थिक सहकार्याने कर्जपुरवठा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय संघाने घेतला असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“गोदावरी खोरे दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना गायी खरेदीसाठी अत्यल्प व्याज दरात कर्ज पुरवठा करुन देवू व शेतकरी जर आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असतील तर या गोष्टीचा आम्हालाही आनंदच आहे.तसेच बल्क कुलरसाठी कर्जपुरवठा करता येईल का ? यासाठी बँकेच्या वरिष्ठ पातळीवर आपण स्वतः चर्चा करणार आहे”-प्रादेशिक व्यवस्थापक,स्टेट बँक ऑफ इंडिया.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी ज्येष्ठ संचालक राजेंद्रबापू जाधव,उपाध्यक्ष संजय खांडेकर,माजी संचालक नानासाहेब सिनगर,भागवतराव धनवटे,जयराम पाचोरे,विद्यमान संचालक विवेक परजणे,उत्तमराव माने,निवृत्ती नवले,यशवंत गव्हाणे,भाऊसाहेब कदम,भिकाजी थोरात,गोपीनाथ केदार,सदाशिव कार्ले,दिलीप तिरमखे,सुनंदाताई होन,कुंदाताई डांगे यांच्यासह दूध उत्पादक सभासद,शेतकरी उपस्थित होते.
प्रारंभी संघाचे संस्थापक नेते नामदेवराव परजणे पाटील यांच्या स्मृतीस्थळावरील प्रतिमेचे पूजन करण्यात आले.अहवाल सालातील दिवंगतांना श्रध्दांजली वाहण्यात आली. स्टेट बैंक ऑफ इंडियाकडून गावपातळीवरील प्राथमिक सहकारी दूध संस्था,सेंटर व दूध उत्पादकांना वाटप करावयाच्या कर्जाचे
अहमदनगर येथील स्टेट बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री विनोदकुमार व कोपरगांव शाखेचे व्यवस्थापक आर.एस.संधानशीव यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.मागील सभेच्या अहवालाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी वाचन केले.तर अहवालातील सर्व विषयांवर चर्चा होऊन विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आलेत.दरवर्षीच्या पर्जन्यमानाच्या अनियमितपणामुळे शेती धंदा बेभरवशाचा झालेला आहे.परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतीला पूरक म्हणून ओळखला जाणारा दूध व्यवसाय देखील शासनाच्या अनास्थेमुळे अडचणीत आल्याने दूध उत्पादनावर विपरीत परिणाम झालेला आहे.या परिस्थितीचा विचार करुन गोदावरी दूध संघाने शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तसेच दूध उत्पादन वाढीसाठी स्टेट बँकेच्या सहाय्याने गायी खरेदीसाठी तसेच गोठ्यासाठी कर्जपुरवठा उपलब्ध करुन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याची सुरुवात देखील झालेली आहे.कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करुन परजणे पुढे म्हणाले की,”शेतकऱ्यांना दूध धंदा परवडेल हा दृष्टीकोन समोर ठेऊन संघाने २०१६ पासून अमेरिकेतून आयात केलेल्या सुधारीत सॉर्टेड सिमेनचा उपक्रम कार्यक्षेत्रात सुरु केला. ९५ टक्क्याहून अधिक कालवडींचा जन्मदर राहिलेला असून आतापर्यंत १ हजार ६१० कालवडी जन्माला आलेल्या आहेत. त्यापैकी २२३ कालवडी पहिल्या वेतात आल्या आहेत. त्यांची दूध देण्याची सरासरी प्रतीदिन २६ ते २८ लिटर्स इतकी आहे. सॉर्टेड सिमेन केवळ ४०० रुपये दराने उपलब्ध करुन दिल्यामुळे शेतकऱ्यांना या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेता आला. याशिवाय संघाच्या कार्यस्थळावर पशुरोग निदान प्रयोगशाळा २०१८ पासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्यामाध्यमातून आजपर्यंत चार हजाराच्या आसपास जनावरांवर उपचार करण्यात आलेले आहेत.पशुसंवादिनी (कॉलसेंटर ) च्या माध्यमातून पशुखाद्य, मिनरल मिक्शर, वैरण याबाबत अनेक दूध उत्पादकांनी पशुचिकित्सकांचा सल्ला व मार्गदर्शन घेवून लाभ घेतलेला आहे. गायी खरेदी, गोठा दुरुस्ती, कडबाकुट्टी, दूध काढणी यंत्र व इतर आवश्यक साहित्यासाठी गावपातळीवरील प्राथमिक सहकारी दूध संस्था व दूध उत्पादकांना स्टेट बैंक व प्रवरा सहकारी बँकेच्या आर्थिक सहकार्याने कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात आल्याने याचाही दूध उत्पादकांनी चांगला लाभ घेतला. संघाच्यामार्फत कार्यक्षेत्रात सर्वच ठिकाणी बल्क कुलरची व चार ठिकाणी चिलींग प्लॅन्टची उभारणी केलेली आहे. बाजारपेठेत लवकरच ह्युमन अन – टच ( मानवस्पर्श विरहीत ) पॅकींग दुधाची विक्री करण्याचा संघाचा मानस आहे. आज संघाकडे एक हजार लिटर क्षमतेचे ३३ बल्क मिल्क कुलर उपलब्ध असून असेच बल्क कुलर गांवपातळीवर एकाच शेतकऱ्याकडे बसवून त्या शेतकऱ्याचे किमान एक हजार लिटर दूध उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा देखील उपलब्ध करुन दिल्या जातील.भारत सरकारच्या पशुपालन व दुग्धविकास विभाग तसेच महानंद डेअरी यांच्या सहकार्याने मिल्क स्कॅन एफटी – १ ही अत्याधुनिक यंत्र सामुग्री संघावर कार्यान्वित करण्यात आलेली आहे. एका मिनीटात सुमारे ३२ प्रकारच्या तपासण्या या यंत्राद्वारे केल्या जातात.श्री नामदेवराव परजणे पाटील सेवाभावी संस्थेच्यावतीने पशुधनाच्या सकस आहारासाठी मुरघास निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी लागणारी यंत्रणा देखील संघाने खरेदी केली आहे.लवकरच मुरघासाचा प्रकल्प सुरु करीत आहोत. याशिवाय कोरोना महामारीत मयत झालेल्या संघाच्या दूध पुरवठादारांच्या अनाथ पाल्यांचे १२ वी पर्यंतचे शिक्षण श्री नामदेवराव परजणे पाटील सेवाभावी संस्थेमार्फत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचेही परजणे यांनी शेवटी सांगितले आहे.उपस्थितांचे संघाचे संचालक उत्तमराव माने यांनी आभार व्यक्त केले.