कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात ‘एक गाव,एक गणपती’योजना राबवणार-पो.नि.जाधव
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आगामी गंणेशोत्सव व नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका पोलीस प्रशासनाने नुकतीच शांतता समितीची बैठक पोलिस पाटलांच्या उपस्थितीत आयोजित केली होती.त्या बैठकीत शासनाच्या आदेशानुसार एक गाव एक गणपती राबविण्याचा योजनेला उपस्थित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी हिरवा कंदिल दाखवला आहे.त्यामुळे या वर्षीही तालुक्यात एक गाव,एक गणपती योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
“आम्ही या बाबत बैठक घेवुन उपस्थित पोलीस पाटील यांना वस्तुस्थिती समजावून दिली आहे.त्यांना महाराष्ट्र शासन,गृह विभाग यांच्या कडील सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ संदर्भात प्राप्त परीपत्रका नुसार योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आम्ही तालुक्यातील सर्वांना “एक गाव एक गाव गणपती” बसविणे बाबत विनंती केली असून गावोगाव बैठका सुरु केल्या आहेत”-दौलतराव जाधव,पोलीस निरीक्षक कोपरगाव तालुका पोलीस ठाणे.
आगामी काळात शुक्रवार दि.१० सप्टेंबर पासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे तर या खेरीज गुरुवार दि.०७ ऑक्टोबर रोजी नवरात्र उत्सव प्रारंभ होत आहे.मात्र दोन वर्षांपासून जगभर कोरोना विषाणूच्या साथीने कहर उडवून दिला आहे.अद्याप तो संपण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.त्यामुळे आगामी काळात हे उत्सव साजरे करणे जोखमीचे व नागरिक,भाविक भक्त यांच्यावर संकट निर्माण करणारे ठरणार आहे.याची प्रशासनाला जाणीव आहे.शिवाय दुसरी कोरोनाची लाट अद्याप संपलेली नाही.त्यामुळे प्रशासन धास्तावलेले आहे.वर्तमानात तर कोपरगाव तालुक्यातील नैऋत्येकडील पोहेगाव जिल्हा परिषद गटात कोरोनाने थैमान मांडलेले आहे.कोपरगावतही अद्याप रुग्णवाढ सुरु आहे.या पार्श्वभूमीवर आगामी सण उत्सव साजरे करणे जोखमीचे ठरणार आहे.त्यामुळे याबाबत राज्य शासनाने आदेश काढून या बाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन व शांतता समितीची बैठक घेऊन एक गाव एक गणपती हि योजना राबविण्यास प्रोत्साहन देण्यास सुचवले आहे.
कोपरगाव तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची संख्या मोठी असते.गावांमध्ये त्यामुळे कधीकधी वाद उद्भवतात.या पार्श्वभूमीवर एक गाव एक गणपती ही संकल्पना तालुका पोलिस दरवर्षी राबवितात.या पार्श्वभूमीवर हि बैठक तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यालयात नुकतीच आयोजित केली होती.त्यात सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,विविध गावांचे पोलीस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतता समिती सदस्य,प्रतिष्ठित नागरिक,गणेश मंडळाचे अध्यक्ष,सदस्य व मंडप व्यावसायिक आदीना याबाबत सूचना देण्यास पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले आहे.