कोपरगाव तालुका
माजी मुख्यमंत्री देशमुख यांचे राज्याच्या विकासात योगदान-स्मृती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक,सांस्कृतिक विकासात माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांचे योगदान असून राज्यात व केंद्रात अनेकदा मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले निर्णय व केलेले कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रातिपदान कोपरगाव येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी एका कार्यक्रम प्रसंगी काढले आहे.
विलासराव देशमुख हे मराठी,भारतीय राजकारणी होते.इ.स.१९७४ साली बाभळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते १६ जानेवारी, इ.स. २००३ व १ नोव्हेंबर, इ.स. २००४ ते ४ डिसेंबर, इ.स. २००८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते.
कोपरगाव येथिल के.जे.सोमैया महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी संस्थेचे सचिव ऍड.संजीव कुलकर्णी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी कै.विलासराव देशमुख यांच्या स्मृतीला वंदन करताना महाविद्यालयातील नाविन्यपूर्ण व समाजविधायक विविध उपक्रमांची माहितीही उपस्थितांना दिली.तसेच केंद्र सरकारच्या उच्च शिक्षण व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद द्वारा आयोजित ‘एक जिल्हा एक हरित विजेता महाविद्यालय’ म्हणून अहमदनगर जिल्ह्यातून केवळ आपल्या महाविद्यालयाला हा पुरस्कार कालच प्रदान करण्यात आल्याबद्दल सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारीवर्गाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
संस्थेचे सचिव ऍड. कुलकर्णी, सदस्य संदीप रोहमारे यांनीही कै.विलासराव देशमुख यांच्या स्मृतीला वंदन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.या कार्यक्रमाला प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून उपस्थित होते.