कोपरगाव तालुका
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा-आवाहन

न्यूजसेवा
कोपरगांव (प्रतिनिधी)
गेल्या दोन महिन्यापासून पावसाळा सुरु झालेला असला तरी मध्य महाराष्ट्रात व प्रामुख्याने
नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्हयात पाऊसच पडलेला नाही. उर्वरीत दोन महिन्यात पाऊस पडेलच याचीही शाश्वती नाही. नुकतेच गोदावरी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सोडलेली आवर्तने
पुन्हा बंद केल्याचे वर्तमानपत्रामधून वाचले. अशीच परिस्थिती पुढेही राहिल्यास भविष्यात शेतीच्या पाण्यासह
पिण्याच्या पाण्याची गंभिर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे भयानक संकट लक्षात घेवून शासनाने नाशिक भागातल्या धरण क्षेत्रातील पाणलोटासह लाभक्षेत्रात तातडीने कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे पाटील यांनी मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे
यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.
कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यासंदर्भात मागील वर्षी मी आपणांस दि. ३१ जुलै २०२० रोजी पत्र पाठवून मागणी केलेली होती. परंतु त्यावेळी पत्राची गंभिरतेने दखल घेतली गेली नाही. यावर्षी
पावसाळ्याचे दोन महिने निघून गेलेले आहेत. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्हयात सुरुवातीला पडलेल्या मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, बाजरी, मका, भुईमूग, तूर, मूग
पिकांच्या पेरण्या केल्या. परंतु दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके धोक्यात आली आहेत. विहीरी व कुपनलिकांच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर घटलेली आहे. धरण क्षेत्रावर कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविला गेला तर गावोगांवच्या पाणी पुरवठ्याच्या योजना, गावतळे, बंधारे, ओढे,
नाले धरणाच्या पाण्याच्या आवर्तनातून भरली जावून पाणी टंचाईवर मात करता येऊ शकते. माणसांसह
शेती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. सद्या आभाळात ढग भरुन येतात परंतु पाऊस पडत नाही. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी चांगले ढगाळ वातावरण आहे. याचा लाभ घेवून
कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी करता येवू शकतो.
नैसर्गिक आपत्तीबरोबरच सरकारच्या काही धोरणांमुळे शेतकरी आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. शाश्वत शेती विकास, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, शेतीची नुकसान भरपाई, शेतमालास रास्त व शाश्वत दर, महागाई आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण अशी अनेक आश्वासने सरकारने दिलेली असतानाही माझ्या माहितीप्रमाणे यातील एकही आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. महागाईमुळे
जनता होरपळून निघत असून शेती क्षेत्र प्रचंड तोट्यात आहे. परिणामी शेतीचा विकासदर खालावत चालला आहे. शेती उद्ध्वस्त होण्याबरोबरच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभिर बनलेला आहे. पशुखाद्याच्या किमती आकाशाला भिडल्याने
शेतीला पूरक असलेला दूध धंदा परवडणारा राहिला नाही. जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. शाश्वत शेती विकासाबरोबर शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शासनाने निश्चित धोरण
राबविण्याची आज नितांत गरज आहे. त्यासाठी शाश्वत पाण्याची उपलब्धता करणे अत्यावश्यक
आहे.
भविष्यातले हे भिषण संकट विचारात घेता नाशिक जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह
लाभक्षेत्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग तातडीने राबविण्याची गरज आहे. त्यासाठी शासकीय पातळीवरुन
तातडीने कार्यवाही व्हावी अशीही मागणी श्री परजणे यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे.