कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात नैसर्गिक आपत्तीत सतर्क राहण्याची गरज-आवाहन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात संभाव्य गोदावरी पूर, ढगफुटी यासह नैसर्गिक आपत्तीत प्रत्येक विभागाने दिलेल्या जबाबदारीचे पालन करत आपापल्या खातेनिहाय कर्मचारी यांची बैठक घेऊन सुक्ष्म नियोजन करावे.आपले स्तरावर नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना दिलासादायक कामकाज करावे.असे आवाहन कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांनी नुकतेच एका बैठकीत केले आहे.
“ग्रामीण भागात बुजवले गेलेले पाण्याचे चर पुर्ववत करणे,बांधकाम विभागाने तालुक्यातील कच्चे रस्ते पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक अडथळे तयार होतात तेथे तातडीने व्यवस्था करुन वाहतूक पुर्ववत करणे.आपत्ती ग्रस्तांची व्यवस्था,शहरी भागात नाले सफाई,धोकेदायक इमारत मालकांना सुचना देणे,शहरात नियमित औषध फवारणी करण्यात यावी.पोलिस विभागाने पूर काळात कायदा व सुव्यवस्था सोबत नदीकाठावर आणि पुलावर कोणी नागरिक येणार नाही याची काळजी घ्यावी”-योगेश चंद्रे,तहसीलदार कोपरगाव.
कोपरगाव तालुक्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीत निर्मुलन आणि व्यवस्थापन संदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले, निवासी जिल्हाधिकारी संदिप निचित,उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी डॉ.विरेंद्र बडदे यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी यांचे बैठकीचे आयोजन तहसिल कार्यालय येथे करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले,गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते,कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता प्रशांत वाकचौरे,शाखा अभियंता डि.बी.गाडे,जि.प.सा.बा.विभाग उत्तमराव पवार,पशू संवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ.अजयनाथ थोरे,वीज वितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवंत खराटे,भूमी अभिलेख संजय भास्कर,गोदावरी डावा कालवा उपविभागीय अधिकारी भरत दिघे,भारत संचार निगम चे कनिष्ठ दूरसंचार अभियंता गौतम मेश्राम,पूरनियंत्रणचे अभियंता धिरजकुमार हंस,संजय पाटील,शिक्षण विभाग विस्तार अधिकारी शबाना शेख,कोपरगाव नगरपरिषद फायर ब्रिगेड अधिकारी संभाजी कार्ले,वनक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप,आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके, तुरुंग अधिकारी शंकर दुशिंग आदिंसह विविध खातेनिहाय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत तहसिलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे यांनी, कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील २८ गावांचे व्यवस्थापन,बंधारे,नाले यांचे उलट दिशेने फुगवटा पाणी,आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने संभाव्य साथीचे आजार(डेंग्यू,मलेरिया,चिकणगुणिया ),सर्प दंश उपाययोजना,पुरेसा औषध साठा,कोरोना व्यतिरिक्त ईतर आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया या करिता नागरिकांना स्वतंत्रपणे मार्गदर्शक माहिती उपलब्ध करून द्यावी.असे सुचित केले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की,वीज वितरण मार्फत वीजेच्या तारा तुटून वीज पुरवठा खंडित होण्यासाठी कारणीभूत झाडाच्या फांद्या तोडण्यात याव्यात. तसेच कार्यालयातील फोन २४ तास कार्यान्वित ठेवणे.तसेच वीज पुरवठा खंडित काळात नागरिकांना संवाद साधण्यासाठी अतिरिक्त मोबाईल नंबर सेवा उपलब्ध करुन देणे.वीज पुरवठा खंडित होते याची कारणे आणि सुरळीत होण्याची वेळ नागरिकांना तातडीने कळविणे.भारत संचार निगमने सर्व शासकीय कार्यालयातील फोन सुरळीत सुरु ठेवावे असे आवाहन केले आहे.
गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी कोपरगाव तालुक्यातील सर्व गावांना संभाव्य पावसाळा,पूर, ढगफुटी आणि संभाव्य बाधित कुटुंबियांचे व्यवस्थापन बद्दल ग्रामस्तरावर कळवले असल्याचे सांगितले.
तर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांचे सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले.
कोपरगाव नगरपरिषदचे फायर ब्रिगेड अधिकारी संभाजी कार्ले यांनी आपत्ती निर्मुलनासाठी नगरपालिकेने केलेली शहर नियोजनाची माहिती सादर केली.
या प्रसंगी विविध खात्यांचे अधिकारी यांनी आपत्कालीन परिस्थितीत केलेले नियोजनाची माहिती सांगितली.नागरिकांनी कोरोना संकटात केलेल्या सहकार्याबद्दल प्रशासनाने कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचे सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानले आहेत.यापुढे संभाव्य नैसर्गिक आपत्तीत निर्मुलनासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.