आरोग्य
कोपरगावच्या आरोग्य यंत्रणांचा ताण संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्रावर !
न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून शासकीय यंत्रणा तोकडी पडू लागली असल्याचे विदारक चित्र आहे.कोविड उपचाराशी निगडीत सुविधा उपलब्ध होण्यासाठी सरकार विविध आदेश जारी करत असले तरी खालच्या पातळीवर मात्र वस्तूस्थिती मात्र विरोधाभासी असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना कोपरगाव शहरानजीक असून ग्रामीण रुग्णालयात कोरोना तपासणी संचच उपलब्ध नसल्याने अखेर वैतागून कोपरगाव व नजीकचे रुग्ण आता संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना तपासणीसाठी धाव घेत असल्याने या ठिकाणी गर्दीचा महापूर आलेला दिसून आला आहे.त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी वाढली असल्याचे दिसून आले आहे.
संवत्सर या ठिकाणी विविध तपासण्या मधून १ हजार नागरिकांची तपासणी केली आहे.त्यात १७४ बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहे.तर १ हजार ०२३ निरंक निघाले आहे.गावात ८ मार्च पासून लसीकरण सुरु केले आहे.आता ०१ हजार ९६० नागरिकांचे लसीकरण झाले आहे.यात अंगणवाडी सेविका,आशा सेविका,शिक्षक आदींचे पथके कार्यरत असल्याची माहिती डॉ.राजेंद्र पारखे यांनी दिली आहे.
राज्यात कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.रुग्णांना रूग्णालयात,कोविड सेंटर मध्ये तपासणी संच,बेड,ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे.या पार्श्वभूमीवर कोविड उपचाराशी निगडीत विलगीकरण कक्ष,ऑक्सिजन सेंटर,ऑक्सिजन सिलेंडर,ऑक्सिजन बेड,सॅच्युरेटेड,ऑक्सिजन मशीनचा पुरवठा अशा कोविड उपचाराशी निगडीत सुविधा उपलब्ध होण्यासाठी सरकार विविध आदेश जारी करत असले तरी मात्र खालच्या पातळीवर मात्र वस्तूस्थिती मात्र विदारक असून मोठा विरोधाभास दिसून येत आहे.आता कोपरगावचे उदाहरण घ्या ना.या शहरात कोविड सेंटर तर तयार आहे मात्र त्याला पुरविण्यासाठी प्राणवायूच नसल्याने ते अनेक दिवसापासून बंद आहे.दुसरे उदाहरण तालुक्यात शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत असताना या रुग्णांना तपासणीसाठी कोरोना तपासणी संचच नसल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.रुग्णसंख्या कमी झालेली दिसत असली तरी त्यामागे खरे कारण हे कोरोना तपासणी संच नाही हे आहे.त्यामुळे अनेक नागरिक बाधित वा संशयित असूनही त्यांना पुढील उपचाराची प्राथमिक सुविधांच नसल्याने नागरिकांना कोणी वाली उरला नसल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे हे तपासणी सुविधा न मिळलेले रुग्ण अजून तालुक्यात संसर्ग पसरविण्याचे काम बिनबोभाट करत आहे.त्यामुळे शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या वाढत आहे.हीच स्थिती काही दिवस असल्याने अनेकांनी अन्य पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.त्यामुळे सरकारने व लोकप्रतिनिधींनी तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.या बाबत आता नगरपरिषद व अन्य सहकारी संस्था,स्थानिक स्वराज्य संस्था आदींनी तातडीने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.मात्र या पातळीवर शुकशुकाट असल्याने आता हा भार नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर पडताना दिसत आहे.संवत्सर हा त्याचा जिता जगता पुरावा मानायला हवा.कोरोनावर उपाय औषधोपचार नसल्याने व त्यावर लस हाच अपर्याय असल्याचे एव्हाना नागरिकांना कळून चुकले आहे.त्यामुळे आता प्राथमिक आरोग्य केंद्रे व खाजगी आरोग्य यंत्रणांवर ताण यायला प्रारंभ झाला आहे.त्यामुळे संवत्सर या ठिकाणी मुर्शतपुर,जेऊर पाटोदा,टाकळी,जेऊर कुंभारी,कोकमठाण आदी ठिकाणाहून ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली असल्याचे दिसून आले आहे.त्यांनी बेदिली माजविली होती व आरोग्य कर्मचाऱ्यांना अरेरावी सुरु केली होती.आधीच संवत्सर या ग्रामपंचायतीची लोकसंख्या १५-१६ हजार इतकी मोठी त्यात आणखी हि मोठा भर पडत असून या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अखेर पोलीस पाटलांना तालुका पोलिसांना निमंत्रीत करावे लागले आहे.त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पारखे यांचे संपर्क साधून उपलब्ध कोरोना लस व उपस्थित ग्रामस्थ यांचा मेळ घालून नागरिकांना रांगेत उभे करून उर्वरित ग्रामस्थांना हाकलून लावले आहे.त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
संवत्सर येथे ग्रामपंचायतीने सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,ग्रामविकास अधिकारी कृष्णा अहिरे व सदस्य आदींनी ग्रामस्थांत जागृती केली असून जागोजागी सूचना फलक लावले असल्याचे दिसून आले आहे.प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र पारखे,डॉ.अनिकेत खोत,आदींनी या पातळीवर लक्षवेधी काम केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
संवत्सर या ठिकाणी विविध तपासण्या मधून १ हजार नागरिकांची तपासणी केली आहे.त्यात १७४ बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहे.तर १ हजार ०२३ निरंक निघाले आहे.गावात ८ मार्च पासून लसीकरण सुरु केले आहे.आता ०१ हजार ९६० नागरिकांचे लसीकरण झाले आहे.यात अंगणवाडी सेविका,आशा सेविका,शिक्षक आदींचे पथके कार्यरत आहे.त्यांनी वाड्या वस्त्यांवर जाऊन हि मोहीम फत्ते करण्याचे काम सुरु केले आहे.त्या बाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केला आहे.