कोपरगाव तालुका
वडझिरे गावात भक्तीचा महापूर
प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा मोठया भक्तीभावाने व उत्साहात संपन्न
लोणीमावळा(प्रतिनिधी ) :- टाळांच्या गजरात, मृदंगाच्या तालावर अन भक्तीने तल्लीन होत पारनेर तालुक्यातील वडझिरे गावात अखंड हरिनाम सप्ताहासह विठ्ठल-रुख्मिनी मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा मोठया भक्तीभावाने व उत्साहात संपन्न झाला.
गेल्या सहा वर्षांपुर्वी सुरू केलेले मंदिराचे काम यावर्षी पुर्ण करत सालाबादप्रमाणे त्रेचाळीस वर्षांची अखंड परंपरा अबाधित राखुन गावकऱ्यांनी सप्ताहाला सुरवात केली. पहाटे चालू होणाऱ्या काकड आरतीने भाविकांच्या दिवसाची सुरुवात होऊन त्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेसाठी व कलशारोपणासाठी होणारे होमहवन, गाथा पारायण, भाविकांना सकाळचे अन्नदान, सायंकाळी सात वाजता सुरू होणारे कीर्तन, त्यानंतर पुन्हा रात्रीच्या पंगतीचे आयोजन व रात्रीचे जागर करून संपणारा दिवस या साऱ्या धामधुमीने वातावरणात भक्तिरस ओतप्रोत भरून वाहवत होता.
पंढरपूरकर गुरुजी व ब्रम्हवृंदांच्या मार्गदर्शनाखाली विविध विधी पार पाडून जगद्गुरू भास्कराचार्य महाराजांच्या (करवीर पीठ, कोल्हापूर) हस्ते कलशारोपण पार पाडण्यात आले. सप्ताहकाळात वेगवेगळ्या महाराजांची विविध विषयांवर समाजप्रबोधनपर कीर्तनसेवा संपन्न झाली तर तुकाराम महाराज बीजोत्सवाचे कीर्तन हभप पांडुरंग महाराज शितोळेंनी सादर करत तुकाराम महाराज व शिवाजी महाराजांचे चरित्र विषद केले. काल्याचे कीर्तन आक्रुरमहाराज साखरे यांनी सादर करत उपस्थित हजारोंच्या जनसमुदयास भक्तीच्या अतिउच्च शिखरावर पोहचवले.
सप्ताहकाळातील विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे गावकऱ्यांनी केलेले आयोजन व स्वतः वरील जबाबदारी पार पाडण्यासाठी धडपडणारे आबालवृद्ध आणि ग्रामप्रदक्षिणा घालत कलशाची व शंकराचार्य महाराजांची सवाद्य काढण्यात आलेली मिरवणुक. ढोल, ताशा या पारंपारिक वाद्याबरोबरच झांज पथक, घोडे अन् कलश डोक्यावर घेतलेल्या शेकडो महीला, अभंगवाणी गाण्यात गुंग झालेली तरुणाई, गावातील महीला-पुरुष, परीसरातील ग्रामस्थ अशा हजारो भाविकांनी केलेले सूत्रबद्ध संचलन वाखाणण्याजोगे होते.
सर्व स्तरातील गावकऱ्यांनी मंदिर बांधकामासाठी जमा केलेली जवळजवळ दोन कोटींची रक्कम आणि शिस्तबद्ध व शांतपणे पार पाडलेला भव्य दिव्य भक्तीयज्ञ, गावातील राजकारण विरहित धार्मिकतेच आणि सामाजिक सलोख्याचे पावलापावलावर दर्शन घडवत होते.