निधन वार्ता
राज्याने कुशल राजकारणी गमावला -…यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याची बातमी अनाकलनीय आणि असह्य वेदना देणारी होती.त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र राज्याने कुशल राजकारणी,कृषी,शिक्षण,सहकार क्षेत्रातील एक अभ्यासु नेतृत्व व कुशल प्रशासक गमावला असून त्यांचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना समुहावर कृपा होती असे प्रतिपादन कोपरगावचे माजी आ.अशोक काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“स्व.अजित पवार यांना सहकार क्षेत्राची उत्कृष्ठ जाण होती.प्रशासनावर मजबूत पकड असणारा व ग्रामीण भागाच्या जनतेशी नाळ जुळलेले स्व.अजित पवार हे बहुआयामी नेतृत्व होते.काळे परिवाराचे आणि पवार कुटुंबाचे तीन पिढ्यापासूनचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक सबंध होते”-माजी आ. अशोक काळे,कोपरगाव.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे.अजित पवार प्रचारासाठी आणि सभांसाठी बारामती या ठिकाणी चालले होते.त्यावेळी अजित पवारांचं विमान हे धावपट्टीवर उतरत असताना त्याचा स्फोट झाला आणि अजित पवार नावाचा लोकनेता या अपघातात काळाच्या पडद्याआड गेला.अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते.मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली.यात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.त्याची तीव्र प्रतिक्रिया राज्यात उमटली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने कारखाना मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी स्व.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे,सर्व संचालक मंडळ,कारखान्याचे कार्यकारी संचालक,महाव्यवस्थापक,आसवनी विभागाचे महाव्यवस्थापक,सचिव,तसेच कारखाना व उद्योग समुहातील पदाधिकारी व कर्मचारी बहूसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना म्हणाले की,”स्व.अजित पवार यांना सहकार क्षेत्राची उत्कृष्ठ जाण होती.प्रशासनावर मजबूत पकड असणारा व ग्रामीण भागाच्या जनतेशी नाळ जुळलेले स्व.अजित पवार हे बहुआयामी नेतृत्व होते.काळे परिवाराचे आणि पवार कुटुंबाचे तीन पिढ्यापासूनचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक सबंध असून त्यांचे आणि माझे मित्रत्वाचे संबंध होते त्याप्रमाणे काळे कुटुंबियावरही त्यांचे मनापासून प्रेम होते.सन-२०२४ ला माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी त्यांनी उपस्थित राहून मला शुभेच्छा दिल्या होत्या असल्याची आठवण करून दिली आहे.
त्यांचे कोपरगाव मतदार संघावर देखील विशेष प्रेम होते.२००४ ते २०१४ या कालावधीत विधिमंडळात त्यांच्या सोबत काम करण्याची मला संधी मिळाली.आपण विरोधी पक्षाचा आमदार असतांना देखील त्यांनी मला सहकार्य करून मतदार संघाच्या विकासासाठी भरीव निधी दिला होता.आणि २०१९ पासून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कोपरगाव शहरातील पाणी प्रश्नासाठी,शासकिय इमारती,मंजूरचा बंधारा,ग्रामीण भागातील रस्ते अशा अनेक विकास कामांसाठी त्यांनी मोठा निधी दिला असून कोपरगावच्या विकासामध्ये स्व.अजित पवारांचा मोठा वाटा असल्याचे शेवटी सांगितले आहे.आ.आशुतोष काळे यांचेवर त्यांचा मोठा विश्वास होता.त्यांच्या राजकीय वाटचालीत आधारस्तंभ होते.त्यांच्या पाठबळामुळेच आ.आशुतोष काळे यांना राजकारणात बळ मिळाले आणि जनतेसाठी प्रभावी काम करता आले.अजितदादांच्या जाण्याने आ.काळेंचा राजकीय आधारस्तंभ पडद्याआड गेला असून अजितदादांचे राजकीय योगदान,नेतृत्वगुण आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम सदैव स्मरणात राहील अशी श्रद्धांजली अर्पण केली आहे.


