शैक्षणिक
… या संस्थेत मुलींच्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुणे येथील राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत अहिल्यानगर येथील जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘69 व्या राष्ट्रीय शालेय 17 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे’ मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमुळे महिला कबड्डीला चालना मिळणार असून ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना राष्ट्रीय व्यासपीठावर गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळण्यासह क्रीडा क्षेत्रातील प्रतिमेला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळणार आहे.
सदर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा दिनांक 24 डिसेंबर 2025 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल,कोकमठाण येथे संपन्न होणार आहेत. या स्पर्धेत देशातील 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश,नवोदय विद्यालय,केंद्रिय विद्यालय,सीबीएसई विद्यालय असे एकूण 39 संघ सहभागी होत असून,खेळाडू,पंच,प्रशिक्षक (कोचेस) व संघ व्यवस्थापक मिळून साधारणपणे 650 ते 700 सहभागी या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

सदर स्पर्धा ही पूर्णतः मॅटवर खेळवण्यात येणार असून,यासाठी चार अत्याधुनिक मॅटची मैदाने सज्ज करण्यात आली आहेत.त्याचबरोबर खेळाडूंच्या सरावासाठी एक स्वतंत्र मॅट मैदान उभारण्यात आले आहे.सामने दिवस व रात्र या कालावधीत पार पडणार असल्यामुळे उत्तम व सुरक्षित प्रकाशव्यवस्थेची सोय करण्यात आलेली आहे.प्रेक्षकांच्या सोयीसाठी मैदानाच्या तीन बाजूंनी सुमारे 320 फूट लांबीची भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आलेली असून,मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमींना सामने पाहता येणार आहेत.स्पर्धेसाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण झालेली असून खेळाडूंच्या स्वागतासाठी सज्ज आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये आयोजित करण्यात आला आहे.सदर स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री अजित पवार,विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे,राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे तसेच जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार,जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अर्जुन पुरस्कार विजेते पंकज शिरसाट व जिल्ह्यातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुली खेळाडूंसाठी नोंदणी कक्ष,स्वतंत्र चेंजिंग रूम,विश्रांती कक्ष,वैद्यकीय कक्ष उभारण्यात आलेले आहेत.पंचांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली असून,या स्पर्धेसाठी एकूण 36 राष्ट्रीय दर्जाचे पंच नियुक्त करण्यात आले आहेत.तसेच भारतीय खेल महासंघाचे पंकज द्विवेदी स्पर्धा निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
दरम्यान या स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व संघांसाठी निवास व्यवस्था,भोजन व्यवस्था,वाहतूक व्यवस्था,भोजन व्यवस्था तसेच सुसज्ज व सुरक्षित मैदानी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.स्पर्धा न्याय्य,पारदर्शक व शांततेत पार पडाव्यात यासाठी आयुक्त क्रीडा व युवक सेवा,महाराष्ट्र राज्य पुणे श्रीमती.शितल तेली व जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक क्रीडा व युवक सेवा,पुणे विभाग पुणे युवराज नाईक व जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे व त्यांचे सर्व सहकारी काम पाहत आहेत तसेच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व क्रीडा व्यवस्थापक सुधाकर मलिक,संस्थेतील सर्व प्राचार्य व क्रीडाशिक्षक स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता नियोजन करत आहे. या स्पर्धेकरता जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी देशातील सर्वोत्तम कबड्डी खेळाडूंचा खेळ पाहण्याकरता उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.
या शैक्षणिक वर्षामध्ये अहिल्यानगर जिल्याने 13 राज्यस्तरीय शालेय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केलेले आहे.यामुळे अहिल्यानगर जिल्यात खेळासाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे.या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमुळे महिला कबड्डीला चालना मिळणार असून ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना राष्ट्रीय व्यासपीठावर गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळण्यासह क्रीडा क्षेत्रातील प्रतिमेला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळणार आहे.



