जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

कथिल देऊन सोन्याचे बनावट कर्ज,चौकशीची मागणी !

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन सर्व आजी-माजी संचालक मंडळ तसेच श्रीरामपूर शिवाजीरोड शाखेचे शाखाधिकारी,कर्जरोखे अधिकारी रामेश्वर कचरू माळवे,अशोक कचरू माळवेसह श्रीरामपूर तालुक्याचे संचालक भानुदास मुरकुटे,करण ससाणे आदींनी सामूहिकरीत्या संगणमत करून बँकेस खोटे सोने तारण करून जवळपास दिड ते दोन कोटी रुपयांचे बोगस कर्ज रोखे दाखवून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांचेसह अनेकांनी केला आहे.त्यामुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांची असून तिच्या उद्दिष्ठात उद्योगांना कर्ज देण्याची तरतूद नाही तरीही हे कर्ज कसे दिले जाते असा सवाल निर्माण झाला असून वर्तमानात सहकारी साखर कारखाने जादा व्याजाचे कर्ज सहकारी बँकांकडून का घेत आहे असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.यातून शेतकऱ्यांच्या कर्ज वितरणात मोठे अडथळे आले असून यात काही तरी काळेबेरे दडले असल्याची जोरदार चर्चा नगर जिल्ह्यात सुरू झाली आहे.

  वित्तीय क्षेत्रात सोने तारण कर्ज सर्वात सुरक्षित मानले जाते.यात वित्तीय बँका तुमचे सोने तारण ठेवून कर्ज देते.या कर्जात तुम्ही सोन्याचे मूल्यांकन करून,सोन्याच्या बाजार मूल्याच्या सुमारे ७५% रक्कम कर्ज म्हणून घेऊ शकता.आणीबाणी,शिक्षण,व्यवसाय किंवा इतर वैयक्तिक गरजांसाठी याचा उपयोग होतो.कर्ज फेडल्यानंतर तुम्हाला तुमचे सोने परत मिळते.मात्र अलीकडील काळात सोन्या ऐवजी कथील दाखवून त्यावर कर्ज उचलून बँकेला फसविण्याचे प्रकार नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढीस लागले आहे.त्यातून बँका आगामी काळात अडचणीत येणार असे दिसू लागले आहे.अशीच घटना श्रीरामपूर तालुक्यात सन-२०१९ साली उघड झाली आहे.नकली सोने तारण ठेवून बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी नानासाहेब मांढरे,विशाल आदिक,लता गोरे,प्रकाश खैरे,प्रमोद अंबिलवादे,राजू अंबिलवादे,खंडेराव सरोदे,सुनील सरोदे,लक्ष्मण पटारे,ज्ञानेश्वर सोनार,इसाक पटेल,रेशमा पटेल,कैलास हरे,विश्वास सराफ,प्रदीप करंडे,युनुष शेख,सर्जेराव देवकर,जितेश खैरे,योगेश चिंतामणी,ज्ञानेश्वर नागरे,हेमंत सोळंकी सह एकूण ७० बोगस खातेदारांच्या नावे नकली सोने तारण करून दिड ते दोन कोटी रुपयांचे कर्जरोखे बँकेतून काढले असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेने नाशिक येथील सहकार विभागाचे विभागीय आयुक्त यांचेकडे केला आहे.

    या बाबत तत्कालीन जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे,माजी आ.भानुदास मुरकुटे आदींच्या ही बाब लक्षात आणून दिली होती.त्यानंतर तक्रारदारांना संबधित अधिकाऱ्यांकडून त्यांची मालमत्ता विक्री करून सदर रक्कम भरून घेतली जाईल असे सांगून त्या मागणीला हरताळ फासला आहे.याबाबत दिनांक १८ एप्रिल २०१९ रोजी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.मात्र या ठिकाणी राजकीय दबाव आणून पोलिसांची कारवाई थंड केल्याचा आरोप होत आहे.याबाबत सहकार न्यायालयात सुनावणी होऊन संबंधितांवर वसुलीसाठी आदेश झाला असल्याची माहिती हाती आली आहे.यातील बँकेशी संबधित काही अधिकाऱ्यांनीच याबाबत चर्चा करून वाचा फोडली असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे.बँकेचा तारण मूल्यांकन अधिकारी बँकेच्या संचालक मंडळाने नेमलेला असताना असा घोटाळा होऊ कसा शकतो असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.त्यामुळे या घोटाळ्याची सुई संचालक मंडळाकडे वळत असल्याची तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे.ज्या कर्जदाराच्या नावे ही तारण कर्जे दाखवली आहे.त्यांनीच या कर्जाला नकार दिल्याने खरा घोटाळा उघड झाला आहे.असे एकूण सत्तर कर्जदार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

  दरम्यान नगर जिल्ह्यात सर्वदूर शेतकऱ्यांच्या हिस्स्याचे कर्ज उचलून ते जिल्ह्यातील सहकार नेते आपल्या बँकात लाटून शेतकऱ्यांना वाढीव दराने कर्ज देऊन शेतकऱ्यांना आत्महत्येस भाग पाडत असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

  

“श्रीरामपुर तालुक्याचे जिल्हा बँकेचे संचालक,शाखाधिकारी,सोने मूल्यांकन अधिकारी आदींनी संगणमत करून शेतकऱ्यांच्या फसवणूक केली असून या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावे.याबाबत चौकशीची टाळाटाळ केली तर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी संघटनेचे राज्य ऍड.उपाध्यक्ष अजित काळे यांचे माध्यमातून उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल’-अनिल औताडे,अध्यक्ष,शेतकरी संघटना,अहिल्यानगर जिल्हा.

  याबाबत शेतकरी संघटनेने सहकार आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत बँकेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत श्रीरामपुर तालुक्याचे सर्व संचालकांना जबाबदार धरत गुन्हेगारी प्रवृत्तीचा शाखाधिकारी,सोने मूल्यांकन अधिकारी आदींनी संगणमत करून शेतकऱ्यांच्या फसवणूक केली असल्याचा आरोप केला आहे.या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी विनंती मागणी अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेसह फसवणूक झालेल्या ७० नागरिकांनी केली आहे.याबाबत चौकशीची टाळाटाळ केली तर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी संघटनेचे राज्य ऍड.उपाध्यक्ष अजित काळे  यांचे माध्यमातून उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल असा इशारा शेवटी दिला आहे.

   सदर निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांचेसह तालुका अध्यक्ष युवराज जगताप,डॉ.दादासाहेब आदिक,साहेबराव चोरमलसह फसवणूक झालेले तक्रारदार विशाल आदिक,जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी नानासाहेब मांढरे,खंडेराव सरोदे सर्जेराव देवकर,प्रभाकर गोरे,राजेंद्र अंबिलवादे आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close