कृषी विभाग
शेतकऱ्यांना हेक्टरी ३८ हजार रुपयांची मदत द्या -मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठे थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पासाने हिसकावून घेतला असल्याने सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ३८ हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी महत्वपूर्ण मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे.

“राज्यातील शेतकरी हा आज रोजी ८० टक्के सेवा सोसायटी व राष्ट्रीयकृत बँक स्तरावर थकबाकीत आहे.येणाऱ्या उत्पादनातून त्याला त्याचा चरितार्थ चालवायचा होता परंतु सदर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झालेले आहे”-अनिल औताडे,अध्यक्ष,शेतकरी संघटना,नगर जिल्हा.
महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ३० जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आले आहेत.गेल्या दोन महिन्यांमध्ये राज्यात पावसाचे थैमान चालू असून,पुर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार,ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे.या काळात प्रामुख्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून,सोयाबीन,मका,कापूस,उडीद,तूर, मूग यासोबतच भाजीपाला,फळपिके,बाजरी,ऊस,कांदा,ज्वारी व हळद यांनाही मोठा फटका बसला आहे.नगर जिल्हा त्याला अपवाद नाही.
अहील्यानगर जिल्ह्यामध्ये १५ व १६ सप्टेंबर रोजी २४ तासाच्या आत सरासरी १०० ते १५० सेंटीमीटर पर्जन्यमान नोंद झालेली आहे.शेतकऱ्यांकडे असलेली खरिपातील सोयाबीन,भुईमूग,मूग,कपाशी,ऊस पिकांसह सर्वच पिकांचे नुकसान झालेले आहे.ऊस पिके जोरदार वाऱ्यामुळे व पावसामुळे जमिनीला झोपल्याने मोठे नुकसान झालेले आहे.राज्य शासनाने मागील दोन वर्ष नैसर्गिक आपत्ती निवारण कायदा अंतर्गत केली जाणारी मदत बंद करून एक रुपयात पिक विमा योजना आणली होती.मात्र सदर पिक विमा योजना राज्य सरकारने बंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः विमा हप्ता भरून केंद्र शासनाच्या पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग नोंदविन्यास पाठ फिरविली आहे. ७० टक्के अहिल्यानगर जिल्हा हा पर्जन्य छायेचा प्रदेश असल्याने जून-जुलै ऑगस्ट ते १५ सप्टेंबर पर्यंत सरासरीपेक्षा ५० टक्के पर्जन्यमान कमी झाल्याने ऊस पिकांसह खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट आलेली आहे.अशा स्थितीमध्ये सलग दोन दिवस २४ तासाच्या आत मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेने पिकांची काढणी करणे जिकरीचे झाले आहे.अजूनही परतीचा मान्सून सुरूच आहे.अशा परिस्थितीत १० ते १५ मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई प्रलंबित आहे.मागील गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाने उत्पादन खर्च भरून निघेल इतकाही दर मिळालेला नाही.
राज्यातील शेतकरी हा आज रोजी ८० टक्के सेवा सोसायटी व राष्ट्रीयकृत बँक स्तरावर थकबाकीत आहे.येणाऱ्या उत्पादनातून त्याला त्याचा चरितार्थ चालवायचा होता परंतु सदर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झालेले आहे.दुर्दैवाने आज रोजी राज्यात गेले एक वर्षाच्या कालावधीमध्ये सरासरी सहा ते सात शेतकरी आत्महत्या होत आहे.अशा गंभीर परिस्थितीमध्ये राज्य सरकारचे दायित्व म्हणून नैसर्गिक आपत्ती निवारण कायदा २०१५ अन्वये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ३८ हजार रुपये मदत कुठलेही पंचनामे न करता व निकष न लावता तात्काळ करावी अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष औताडे यांनी शेवटी केली आहे.