महसूल विभाग
… याठिकाणी महसूल समाधान शिबिरात दाखल्यांचे वाटप !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत आज कोपरगाव मंडळाधिकारी कार्यालयात आयोजित शिबिरात १३६ महसूल दाखल्यांचे तहसीलदार महेश सावंत यांचे हस्ते वाटप करण्यात आले आहे.या शिबिरात शेतकरी,महिला,विद्यार्थी तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना महसूल विषयक विविध दाखले व लाभ प्रदान करण्यात आले आहे.

महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख,कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये यापुढे मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्हा वार्षिक योजनेमधून ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ अंतर्गत मंडळ स्तरावर हे अभियान राबविण्यात येत आहे.
महसूल विभागांतर्गत राज्यातील सर्वसामान्य जनता,शेतकरी,विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे,तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख,कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये यापुढे मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्हा वार्षिक योजनेमधून ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ अंतर्गत मंडळ स्तरावर हे अभियान राबविण्यात येणार असून त्याचे नामकरण ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ असे करण्यात आले असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले होते.याबाबतचा शासन निर्णय,दि.२५ मार्च, २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला होता त्याची कोपरगाव तालुक्यात अंमलबजावणी सुरू करणेत आली असून कोपरगाव मंडळ कार्यालयात त्याचा शुभारंभ शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांचे हस्ते करण्यात आला आहे.

यावेळी शिबिरात उत्पन्न दाखले -४०,जातीचे दाखले -२२,जिवंत ७/१२ मोहिमेंतर्गत वारस फेरफार -८,रेशनकार्ड वाटप -२१,७/१२ व ८ अ उतारे -४५,संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी -१८ अशा एकूण १३६ दाखल्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सावंत यांनी दिली आहे.
सदर प्रसंगी निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते,मंडळाधिकारी मच्छिंद्र पोकळे,ग्राममहसूल अधिकारी जगदीश शिरसाठ (कोपरगाव),अश्विनी निर्मळ (येसगाव), वैशाली दुकळे (मुर्शतपूर),वाल्मिक पवार (शिंगणापूर) तसेच महसूल सेवक व कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिराला कोपरगाव मंडळातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.महसूल सेवा थेट शिबिरात उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.अन्य मंडळात हे अभियान कधी राबवणार अशी विचारणा ग्रामस्थ करत आहेत.