कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव शहरात…या ठिकाणी होणार व्यापारी संकुल !

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषदेने नुकतीच अतिक्रमण विरोधी जोरदार मोहीम सुरू केली असून अद्याप ती प्रगतीपथावर असताना नगरपरिषदेने विस्थापितांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला असून आगामी काळात शहरातील कोट्यवधी रुपये खर्चून विविध चार ठिकाणी व्यापारी सुंकुल उभारून जवळपास पन्नासहून अधिक गाळे बांधणी करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन सुहास जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यामुळे विस्थापितामंध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

“दरम्यान कोपरगाव शहरातील अतिक्रमणमुक्त केलेल्या जागा या शहरातील सहकारी पतसंस्था,सामाजिक संस्था आदींना विकासक म्हणून विकास करण्यासाठी दिल्या जाणार असून त्यातून व्यायाम शाळा,सुशोभीकरण,वृक्ष लागवड करून त्याचा विधायक उपयोग केला जाणार असून गावाचे सौंदर्य वाढवले जाणार आहे”- सुहास जगताप,मुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव नगरपरिषद हद्दीत सन-२०११ पूर्वी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली होती.त्यामुळे नेहमी शहरातील वाहतूक कोंडी होत असे.त्या बाबत माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता.अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर त्याला यश येऊन तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन प्रांताधिकाऱ्यांच्या कुंदन सोनवणे नेतृत्वाखाली अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली होती.त्यावेळी सुमारे दोन हजारहुन अधिक अतिक्रमणधारकांचे कंबरडे मोडले होते.त्यानंतर अनेक नेत्यांनी आगामी निवडणुका पाहून अनेक आश्वासने देऊन त्यानां आम्ही पुन्हा सन्मानाने गाळे बांधून देऊ असे आश्वासने दिली होती.अनेकांनी बस स्थानकानजीक केवळ रांगोळ्या काढल्या होत्या.मात्र ते (विद्यमान आ.आशुतोष काळे यांनी बस स्थानकाचे नैऋत्येस प्रगतीपथावर असलेले वगळता) अद्याप पर्यंत कोणीही पाळले नाही.केवळ नगरपरिषद,विधानसभा व लोकसभा निवडणुकीत आम्हीच विस्थापित टपरीधारकांचे तारणहार असल्याचा बहाणा करून आश्वासने देऊन पुन्हा निवडणुका झाल्या की त्यानां वाऱ्यावर सोडून देण्यात आले होते.मात्र हा प्रश्न अद्यापही कोणी निस्वार्थ भावनेने सोडवला नाही व टपरी धारकांना न्याय दिला नाही.अनेक जण परागंदा झाले आहे.अनेकांना आपले कर्ज फेडण्यासाठी घरेदारे विकावी लागली आहे.अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले,त्यांच्या मुलांचे शिक्षण करता आले नाही.बँकांचे हप्ते भरता आले नाही.मात्र नेत्यांच्या निवडणुकांची व मतांची बेगमी मात्र होत राहिली.त्यांची दुकाने मात्र जोरात सुरू राहिली आहे आणि अद्याप सुरू आहे.

“कोपरगाव शहरात उपलब्ध नगरपरिषद हद्दीत नवीन व्यापारी संकुल प्रस्तावित केले आहे.त्यात आठवडे बाजाराच्या ठिकाणी सुमारे ०१ कोटी रुपये खर्चाचे १२ गाळ्यांचे तर या शिवाय पोस्ट कार्यालयाजवळ ११ गाळ्यांचे व्यापारी संकुल,नगरपरिषद नवीन कार्यालयासमोर धरणगाव रोड लगत १६ गाळे,तर अन्य एका ठिकाणी एक व्यापारी संकुल प्रस्तावित आहे”-सुहास जगताप,मुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद.
त्यानंतर आता पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला असून गत महिन्यात फेब्रुवारी २०२५ मध्ये नगरपरिषदेने आपल्या हद्दीत जवळपास ६००-७०० अतिक्रमण धारकांना आपला हिसका दाखवला आहे.नव्हे ती गरज बनली होती.अद्याप उपनगरे आणि काही रस्ते अद्याप अतिक्रमण मुक्त होणे बाकी आहे.ती कारवाई अद्याप बाकी असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे.दरम्यान झालेल्या कारवाईमुळे शहरातील रस्त्यांना मोकळा श्वास घेता आला आहे.त्यामुळे अपघात कमी होणार आहे.शिवाय ज्यांनी इमानेइतबारे आपली गुंतवणूक करून इमारती व गाळे बांधले दरवर्षी कर भरला त्यांच्यावर अन्याय होत होता तो या अतिक्रमण मोहिमेमुळे दूर होणार आहे.त्यामुळे सदर मोहीम दरवर्षी किमान सहा महिन्यांनी राबवणे गरजेचे बनले आहे.
दरम्यान वर्तमान मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी निव्वळ अतिक्रमण हटवलं नाही तर त्यासाठी शहरात उपलब्ध नगरपरिषद हद्दीत नवीन व्यापारी संकुल प्रस्तावित केले आहे.त्यात आठवडे बाजाराच्या ठिकाणी सुमारे ०१ कोटी रुपये खर्चाचे १२ गाळ्यांचे व्यापारी संकुल समाविष्ट आहे.या शिवाय पोस्ट कार्यालयाजवळ ११ गाळ्यांचे व्यापारी संकुल,नगरपरिषद नवीन कार्यालयासमोर धारणगाव रोड लगत १६ गाळे,तर अन्य एका ठिकाणी एक व्यापारी संकुल प्रस्तावित असल्याची माहिती दिली असून त्या जागेचे नाव नंतर दिले जाईल अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
दरम्यान अतिक्रमणमुक्त केलेल्या जागा या शहरातील सहकारी पतसंस्था,सामाजिक संस्था आदींना विकासक म्हणून विकास करण्यासाठी दिल्या जाणार असून त्यातून व्यायाम शाळा,सुशोभीकरण,वृक्ष लागवड करून त्याचा विधायक उपयोग केला जाणार असून गावाचे सौंदर्य वाढवले जाणार असल्याची माहिती शेवटी मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी शेवटी दिली आहे.त्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे तर दुसरीकडे अतिक्रमण करणाऱ्यांत दहशत पसरली आहे.