कोपरगाव तालुका
अपंग महिलेचा जनता दरबारात टाहो…!

न्यूजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तहसिल कार्यालयात काल आयोजित केलेल्या जनता दरबारात नगपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी टाकळी नाक्यावरील आपल्या अधिकृत जागेतील जवळपास दहा गाळे बेकायदा पाडून आपल्यावर अन्याय केला” असल्याचा टाहो येथील अपंग आणि विधवा महिला लक्ष्मीबाई आढाव यांनी आ.आशुतोष काळे यांचे समोर केल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

“कोपरगाव शहरात तत्कालीन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्राकडून भूमिगत विद्युत वाहिण्यासाठी शिर्डी,कोपरगाव,संगमनेर,श्रीरामपूर तालुक्यांसाठी ८९ कोटींचा निधी आणला त्याचे काम १० वर्षे का रखडले ? जर सामान्य माणसाने हे महावितरण कंपनीचे काही नुकसान केले असते तर त्या विरुध्द कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असता आता यांचेवर कारवाई कोणी करायची”- प्रशांत वाबळे,कार्यकर्ते,राष्ट्रवादी काँग्रेस,कोपरगाव.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या महावितरण,राज्य परिवहन महामंडळ,रेल्वे विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागा संदर्भात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी दुपारी ०२ वाजता तहसील कार्यालय,कोपरगाव येथे आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले त्यावेळी त्यावेळी हा गंभीर प्रकार उघड झाला आहे.

“राज्य सरकारने शेतकऱ्यांची विद्युत पांपाची बिले जर शंभर टक्के माफ केली आहे त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदी वीज बिलाचा उतारा कोरा केल्याचा दावा करत आहेत तर महावितरणचे अधिकारी वर्षाखेर वीज बिलाची वसुली कशी काय करत आहेत ?- राजेंद्र खिलारी,ज्येष्ठ कार्यकर्ते,कोपरगाव.
सदर प्रसंगी युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त शिनगर,गौतम बँकेचे अध्यक्ष संजय आगवण,तालुका पोलिस निरीक्षक संदीप कोळी,काळे कारखान्याचे माजी सुधाकर रोहोम,बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र निकोले,कापूस जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे माजी अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,कोपरगाव शहर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार,शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे,राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंता संगमनेर विनायक इंगळे,महावितरणचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड,राहाता महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता धांडे,बी.डी.पाटील,सचिन बेंडकुळे,कोपरगाव आगार प्रमुख अमोल बनकर आदींसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना,संलग्न संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य,माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“कोपरगाव तालुक्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून पोहेगाव सारख्या मोठ्या गावात दिवसा दरोडा पडतो,व्यापारी लुटले जातात हे आक्रित असून तालुक्यात वाळूचोर आणि भुरट्या चोरट्यांकडे गावठी कट्टे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.पोलिस यांचा शोध कोपरगावचा बिहार,यू.पी.घडल्यावर घेणार का ?- नानासाहेब जवरे,प्रसिध्दी प्रमुख,प्रदेश शेतकरी संघटना.
त्यावेळी सदर महिलेने आपण आरोप करताना म्हटले आहे की,आपण आ.आशुतोष काळे यांचेच राजकीय पक्षात काम करत असून त्यांच्या हातून आपला सत्कार झालेला आहे.मात्र वर्तमानात कोपरगाव शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र केलेली असून त्यात अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले आहे.या बाबत अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटविताना पूर्व सूचना द्यायला हवी अशी मागणी केली आहे.मात्र त्यांनी या सूचनांचे पालन केले नाही असा आरोप लक्ष्मीबाई आढाव यांनी केला आहे.नगरपरिषदेने हा बुलडोझर चा वरवंटा आपल्या व्यापारी संकुलावर कोणतीही पूर्व सूचना न देता चालवला होता.या बाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आपण व आपल्या मुलाने वेळोवेळी विनवणी केली मात्र त्यांनी किसी का एक ना सूनी.त्यावेळी आपल्या मुलाने त्यांना समजावून सांगण्याच्या प्रयत्न केला असता तेथील शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी त्यास बेदम मारहाण केली व त्याला बेशुद्ध केला असल्याचा आरोप केला आहे.त्यावेळी सदर महीलने आपले अधिकृत गाळे हटविण्यात अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचारी किरण बाळासाहेब जोशी हे जबाबदार असल्याचा आरोप करून त्याचे विरुध्द कारवाई करा अशी जोरदार मागणी केली आहे.
दरम्यान बोलण्याच्या ओघात लक्ष्मीबाई आढाव यांनी आ.काळे यांचेकडे पाहून तुम्ही ही कारवाई केल्याचा आरोप केला असता त्यांनी तत्काळ खुलासा करत आपण सदर अतिक्रमण विरोधी कारवाई केली नसल्याचा लगोलग खुलासा केला आहे.दरम्यान या बाबत हस्तक्षेप करत आ.काळे यांनी आपण याबाबत मुख्याधिकारी नगरपरिषद यांचे सोबत बैठक घेतो व पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांना विचारणा करतो असे सांगून वेळ मारून नेली आहे.तर मायगाव देवी येथील शेतकरी प्रवीण जगन्नाथ भुसारे यांनी तालुका पोलीस ठाण्यात अधिकारी खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप केला आहे.

“सिन्नरच्या पूर्व भागातील शहा आणि पंचाळे येथील १३२ के.व्ही.ए.विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन झाले त्याची वीज कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप का मिळत नाही ? त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पंपांना कमी दाबाने वीज मिळत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे”- शेतकरी.
दरम्यान या प्रसंगी अनिल दीक्षित आणि कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात ५३ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात केवळ २०-२५ कर्मचारी कामावर असतात त्यामुळे वर्तमान अधिकारी आणि पोलिस क्रमवारी यांचेवर कामाचा अतिरिक्त ताण येतो असा दावा केला आहे व पोलिस बळ वाढविण्याची मागणी केली आहे.
या शिवाय राज्य परिवहन मंडळाचे दक्षिण प्रवेशद्वारावर असलेल्या जागी नवीन पोलिस चौकी स्थापन करून त्या जागी पोलिस कर्मचाऱ्याची नेमणूक करा अशी माहिती देऊन बस स्थानकातील गुन्हे कमी होण्यास मदत होईल असा दावा केला आहे.
त्यावेळी काही नागरिकांनी कोपरगाव तालुक्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून पोहेगाव सारख्या मोठ्या गावात दिवसा दरोडा पडतो हे आक्रित असल्याचे सांगून तालुक्यात शिर्डी जवळ असल्याने व तेथे रेल्वे आणि विमानाची सोय झाल्याने येथील गुन्हेगारी लक्षणीय रित्या वाढत चालली आहे.आता येथील गुन्हेगार भयमुक्त होऊन राजरोस चोऱ्या करत आहेत.तालुक्यातील वाळूचोर आणि त्यांचे पोशिंदे यांचेकडे राजरोस गावठी कट्टे सापडत आहेत.हे कट्टे अवघ्या काही हजारात मिळत आहेत हे विशेष ! त्यातून काही तरुण आत्महत्या करत असून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.त्यामुळे हे गावठी कट्टे नेमके कोठून येतात याची चौकशी होणे गरजेचे आहे.त्याबाबत पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.शिर्डी आणि कोपरगाव येथील पोलिस अधिकारी याबाबत काय कारवाई करतात ? असा तिखट सवाल केला आहे.त्यातून उत्तर नगर जिह्यातील गुन्हेगारी बेताल होऊन बिहार आणि उत्तर प्रदेश होण्याची भीती व्यक्त केली आहे.त्यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे यांनी गुन्हेगारी कमी करण्यासाठी नैऋतेकडील तेरा गावे आदींना शिर्डी आणि राहता पोलिस ठाण्यातून वगळून कोपरगाव तालुक्यात समाविष्ट करून पोहेगाव गटातील गावे असे मिळून पोहेगाव या ठिकाणी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करावे अशी मागणी केली आहे.
दरम्यान या ठिकाणी बैठकीत शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामात विद्युत पंपाची चोरी हा दरवर्षीचा मोठा उत्सव चोरटे साजरे करत असून शेतकऱ्यांच्या हाती तोंडी आलेला पिकांचा घास हिसकावून घेत असल्याचा आरोप केला आहे.चोरटे विद्युत पंपातील तांब्याची तार काढून घेऊन माल कमावत असल्याचा आरोप प्रशांत वाबळे यांनी केला आहे.कोपरगाव शहरात तत्कालीन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्राकडून भूमिगत विद्युत वाहिण्यासासाठी शिर्डी,कोपरगाव,संगमनेर,श्रीरामपूर तालुक्यांसाठी ८९ कोटींचा निधी आणला त्याचे काम का रखडले ? असा सवाल करून महावितरण अधिकाऱ्यांची कोंडी केली आहे.जर सामान्य माणसाने हे महावितरण कंपनीचे काही नुकसान केले असते तर त्या विरुध्द कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला असता आता या अधिकाऱ्याविरुद्ध कोणी गुन्हा दखल करायचा ? असा सवाल केला आहे आणि सदर काम तात्काळ मार्गी लावण्याची रास्त सूचना केली आहे.
त्यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांची विद्युत बिले जर शंभर टक्के माफ केली आहे त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदी वीज बिलाचा उतारा कोरा केल्याचा दावा करत आहेत महावितरणचे अधिकारी वर्षाखेर तर वीज बिलाची वसुली कशी काय करत आहेत ? असा सवाल केला आहे.याबाबत अधिकाऱ्यांनी खुलासा करावा अशी मागणी केली आहे.त्यावेळी अधिकाऱ्यांनी याबाबत आगामी काळात जानेवारी २०२५ ते २०२९ या पाच वर्षातील शेती पंपाचे वीज बिल माफ केले असल्याचे सांगून मागील बिले वसूल केली जात असल्याचे समर्थन केले असून सरकारची वीज बिल माफीची सूचना फोल ठरली असल्याचे उघड झाली असून तो एक निवडणूक जुमला असल्याचे उघड झाले आहे.
त्यावेळी काही शेतकऱ्यांनी सिन्नरच्या पूर्व भागातील शहा आणि पंचाळे येथील १३२ के.व्ही.ए.विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन झाले त्याची वीज अद्याप का मिळत नाही असा सवाल केला आहे.त्यामुळे अद्याप सदर वीज मिळत नसल्याचे शेतकऱ्यांच्या शेती पंपांना कमी दाबाने वीज मिळत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप केला आहे.सदर उपकेंद्राची पूर्ण दाबाने वीज विधानसभा निवडणूक जुमल्यातून बाहेर पडून ताबडतोब द्यावी अशी मागणी शेवटी आ.आशुतोष काळे यांचेकडे केली आहे.