संपादकीय
निरर्थक योजनांमुळे राज्य होणार भकास ?
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
दुसऱ्याच्या तोंडचा घास काढून आपल्या समोर केला जात असेल,तर आपण तो स्वीकारणं कितपत योग्य असते.आपल्या पुरोगामी राज्याला नेमकी अशी सवय लावून लोकांना लाचार करण्यासाठी प्रचंड स्पर्धा लागली असल्याचे जाणवायला लागले आहे.विविध प्रकारच्या ‘लाडक्या’ योजना सुरू करून महायुती सरकारने राज्य सरकार रसातळाला नेण्याचा निर्धार केलेला दिसतो.त्याचाच परिणाम म्हणून राज्य सरकारने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी दिली जाणारी रक्कम देणे बंद करण्यात आले.कारण काय तर अशा योजनांकडे ‘त्या’ कुटूंबाला देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसेच शिल्लक राहीलेले दिसत नाही.फुकट योजनांचा लाभ मिळविणारे मात्र प्रचंड खूश होत आहे.अशा योजनांमुळे मतांचा टक्का वाढेल या आशेवर ‘महायुती’चे सरकार मनातल्या मनात मांडे खात आहेत.या फुकटच्या अतिरेकामुळे शिक्षण,आरोग्य,शेती यासारख्या अत्यावश्यक गोष्टीवर खर्च करायला सरकारकडे पैसे आहेच कुठे ? लोकसभा निवडणुकीच्या निकालात अपेक्षित यश न मिळालेल्या महायुती सरकारने ‘लाडकी खुर्ची’ वाचवण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांच्या ‘भंकस’ योजना सुरू केल्या आहेत.
दरम्यान या योजनांसाठी सरकारी तिजोरीवर सुमारे शंभर हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे.त्यापैकी फक्त या योजनांच्या प्रसिद्धीसाठीही जवळपास तीनशे कोटी रुपये सहज मंजूर करण्यात आले आहेत.अशी उधळपट्टी करून पून्हा एकदा सरकार आले की काही तरी कारण काढून योजना बंद करणे त्यांच्याच हातात आहे.विशेष म्हणजे दलितांच्या विकासासाठी व आदिवासींच्या विकासासाठी असलेला निधी राज्य सरकारने अशा नको त्या योजनांकडे वळवला आहे.त्याचाच परिणाम म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानानंतर आता होमगार्ड्सना मंजूर केलेला भत्ता थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.अशा असंख्य सरकारी योजना,भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे पगार सहा महिन्यापासून थांबले आहेत.फक्त मतांसाठी आणलेल्या दीड-दिड हजार निवडणुकांपर्यंत वाटून मत विकत घ्यायच्या या सरकारी योजनेमुळे सरकारी कर्मचारीही अडचणीत येणार आहेत.तीन महिने झाले अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्सला मानधन नाही,पोलीस पाटलांचं मानधन नाही,कोतवालांना पगार मिळत नाहीय,सर्व योजनांचे पैसे थांबवून ठेवले गेलेत.राज्याच्या तिजोरीवरील वाढता भार पाहता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केल्यास आम्ही तीव्र विरोध करू अशी भूमिका मांडली आहे.बजेट अधिवेशनात मांडलेल्या अर्थसंकल्पात वीस हजार कोटी रुपयांची महसुली तूट होती.या योजनांमुळे एक लाख कोटी रुपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.यामुळं महसुली तूट एक लाख वीस हजार कोटी रुपयांवर जाणार असल्याचा अंदाज आहे.अंदाजपत्रकात राज्याचं एकूण उत्पन्न पाच लाख कोटीहून अधिक आहे.याचा अर्थ जवळपास वीस टक्के उत्पन्न या ‘फुकट’ वाटण्यामध्ये चालली आहे.खरं म्हणजे राज्याला हे परवडण्यासारखं नाही.पण निवडणूक जिंकण्यासाठी राज्यकर्ते कोणत्याही थराला जाण्याच्या तयारीत आहे.फुकट योजनांची जाहिरात इतक्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आली की,असंख्य पोस्टर्स का व कशासाठी? हे विचारायचे नाही.सरकारी खर्चाला कोणतेच बंधन राहीलेले दिसत नाही.राज्य व केंद्र दोन्हीकडेही सारखीच स्थिती आहे.कारण भारताच्या डोक्यावरील एकूण कर्ज २०५ लाख कोटी रुपये इतकं प्रचंड झालेलं आहे.भारत देश स्वतंत्र झाल्या नंतर देशाला शुन्यातून उभा करण्यासाठी ७० वर्षामध्ये एकूण १७ पंतप्रधानांनी २०१४ सालापर्यंत केलेलं ५४ लाख कोटी रुपये कर्ज ‘चौकीदार’ सरकारने केवळ नऊ वर्षात १५५ लाख कोटींने वाढवून २०५ लाख कोटीवर नेलेलं आहे. विशेष म्हणजे गेली ७० वर्षात ५४ लाख कोटी रूपय कर्जामधून उभारलेल्या सर्व कंपन्यांची व देशाच्या संपत्तीची विक्री सुध्दा ‘दक्ष’ असलेल्या सरकारने केलेली आहे.कर्ज असंच वाढत राहिलं तर लवकरच ते ‘जीडीपी’पेक्षा जास्त होईल आणि संपूर्ण देश दिवाळखोर होईल,असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यापूर्वीच दिला आहे.पैसा अन् कायदा कशाचाच कशात पायपोस राहीलेला दिसत नाही.उदाहरणच द्यायचे झाल्यास कलकत्ता येथील देता येईल.तेथील एका बहिणीवर अघोर अन्याय झाला.तसेच बदलापूरसह राज्यात अनेक ठिकाणी घडलेल्या घटना ऐकूनच काळीज पिळवटून जाते. पोलिस आणि राजकारणी मिळून काय केले ते सर्व उघडे गुपित आहे.महाराष्ट्रातील बहिणींचे आम्हीच ‘लाड’ करू शकतो,असे सांगणारे एक दाढीवाले,दुसरे गुलाबी जॅकेटवाले तर तिसरे भगव्या जॅकेटवाले असे तीन भाऊ एकत्र आल्यावर या बहीणींना सख्ख्या भावाची आठवण येणारच नाही,असे या भावांना वाटले होते.बँकांमध्ये प्रचंड गर्दी करून दीड हजारासाठी लाडक्या बहिणींनी तिनही भावांना सपशेल दंडवत घातला असेल.हे कमी की काय त्यानंतर लखपती दिदीचा प्रयोग सुरू झाला.त्यासाठी लाडक्या बहिणीच्या भेटीला ‘दिल्ली’चा भाऊ जळगावला येवून गेला.प्रत्येक खेड्यात बहिणीला घेऊन येण्यासाठी ‘भाऊ’ने एसटी पाठवली होती.काहीही काम न करता लाख रूपयांचा चेक मिळत असेल,फोटो,बातमी छापली जात असेल तर बहीणी खूष होणारच ना ! पण येथून पुढे सतत रडावे लागणार आहे,हे ‘लाडक्या’ बहीणींना कळणार तरी कधी?
प्रा.जयंत महाजन.