दळणवळण
एक वर्षात लागली रस्त्याची वाट,१० कोटी गेले पाण्यात !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील उत्तर भारतीयांना पुण्यास जाण्यास सर्वात महत्वाचा आणि जवळचा ठरणाऱ्या तळेगाव दिघे मार्गे संगमनेर रस्त्याची एक वर्षाच्या आत वाट लागली असून अधिकाऱ्यांनी दुसऱ्या थरात सदर रस्त्याचे काम चांगले होईल अशी केलेली बतावणी आता मोठी थाप ठरली असल्याचे आता उघड झाल्याने पहिल्याच पावसात खड्ड्यांचा महापूर आलेल्या या रस्त्याची आता डागडुजी सुरु असून १० कोटी रुपये पाण्यात गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.याबाबत नजीकच्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रस्त्यांच्या कामाबाबत कोटींची उड्डाणे दिसत असली तरी वास्तव हे आहे की या रस्त्यांचा रस्ता निकृष्ट असून त्यांची वाट लागली आहे.त्या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचं आहे.मात्र म्हणावा असा निधी मिळत नाही व तालुक्यातील रस्ते मात्र सुरळीत होत नाही हि तालुक्याची शोकांतिका आहे.नजीकच्या तालुक्यातील रस्ते मात्र चकाकताना दिसत आहे.त्यात मराठवाड्यातील तुलनेने मागास असलेल्या वैजापूर तालुका आणि येवला तालुका वरचढ ठरताना दिसत आहे.शेजारी संगमनेर,सिन्नर,निफाड तालुक्यातील कोणतेही रस्ते नादुरुस्त असल्याचे दिसत नाही.मात्र राजकारणात भलत्याच पुढारलेल्या अ.नगर जिल्ह्यातील प्रवेश केला की वाहतूकदारांना नगर जिल्ह्यात आल्याची चाहूल लागते ती मोठमोठ्या खड्डयांनी.त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या तोंडी नेते आणि प्रशासन यांना देण्यासाठी शेलक्या शिव्या न आल्या तर नवल ठरते.अशीच अवस्था माजी नगराध्यक्ष वहाडणे यांच्या कार्यकाळापूर्वी कोपरगाव शहरातील रस्त्यांची होती.आता तीच अवस्था नगर-मनमाड रस्ता असो की तळेगाव मार्गे संगमनेर रस्ता असो की पढेगाव मार्गे वैजापूर,कोपरगाव-कोळपेवाडी रस्ता असो.त्या मुळे प्रवासी आणि प्रवासी वहांनासह अवजड वाहनचालक त्रस्त असल्याचे वारंवार दिसून येत आहे.मात्र त्यावर उतारा शोधायला कोणालाही वेळ असल्याचे दिसत नाही.
काही वर्षांपूर्वी एशियन डेव्हलप विकास बँकेने (ए.डी.बी.)या रस्त्यास १८९ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता.मात्र राजकीय अनास्थेमुळे तो निधी येऊ शकला नाही.वास्तविक हा रस्ता केंव्हाच चार पदरी होणे गरजेचे होते.कारण या रस्त्याच्या दोन्ही बाजूस मुंबई-नागपूर व नाशिक-पुणे हे दोन रस्ते राष्ट्रीय महामार्ग आहेत.मधला चाळीस कि.मी.चा मार्गाचा केवळ अपवाद आहे.मात्र गतवर्षी झगडेफाटा ते वडगाव पान या मार्गावर जवळके पर्यंत रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे मोठं मोठे फलक लागले होते.मात्र रस्ता पुढे चालू आणि मागे रस्ता कधी नादुरुत होऊ ? असा प्रश्न ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारत होता.मात्र त्यावेळी विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी आवाज उठवूनही त्यावर कोणीही ‘च’कार शब्द काढला नाही उलट सदर ठेकेदारास अभय मिळाले होते.तीच बाब सावळीविहिर ते भरवस फाटा याची झाली आहे.वाकडी मार्गे श्रीरामपूर या रस्त्याची वेगळी स्थिती नाही वारंवार आंदोलने करूनही त्यावर प्रशासनाची कारवाई शून्य आहे.धारणगावं मार्गे कोपरगाव-कोळपेवाडी रस्त्याची वेगळी स्थिती नाही.मात्र यावर कोणी पक्षाचा नेता अथवा कार्यकर्ता बोलताना दिसत नाही.नवीन काम मंजूर झाले की श्रेयासाठी दोघेही पुढे असताना दिसतात.एक केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार आहे असा दावा ठोकतात.तर दुसरा तालुक्यात आमची सत्ता असल्याची टिमकी वाजवली जाते.मात्र काम निकृष्ट झाल्यावर याचा वाली कोणी होत नाही.केवळ दादा आणि भैय्यांचे पोवाडे म्हणण्यात व सलामी ठोकण्यात धन्यता मानत आहे.आता हेच पाहा ना तळेगाव मार्गे कोपरगाव-संगमनेर रस्त्याचा भाग असलेला झगडेफाटा-जवळके दरम्यान खराब रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.व त्यातून हा रस्त्याचे काम सुरू केले होते.मात्र रस्ता सुरू असतानाच मागे खराब होण्याचे काम वेगाने सुरू होते.याबाबत आमच्या प्रतिनिधीने बातम्या प्रसिद्ध केल्या असता संबंधित ठेकेदारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीकाऱ्यांनी अभय देत सदर काम दुसऱ्या थरात (लेयरमध्ये) चांगल्या प्रतीचे करण्यात येणार असल्याची बतावणी केली होती.त्यानंतर उन्हाळा लागला होता.मात्र आता जून महिन्यात पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर मात्र ती शुद्ध थाप ठरली असल्याचे उघड झाले आहे.सदरचाच रस्ता झगडे फाट्यापासून उखडला असून तो थेट जवळके पर्यंत त्याची पुनरावृति घडली आहे.त्यासाठी ठेकेदाराने तात्पुरती डागडुजी सुरू केली असली तरी ती अल्पकाळ ठरणार आहे.या संबधी ठेकेदार यांचेवर तीन वर्षाची जबाबदारी असली तरी जनतेच्या वाट्याला खड्डयाशिवाय काहीही येणार नाही हे उघड आहे.
दरम्यान याच मार्गावर जवळके ते संगमनेर तालुका हद्दीतील रस्त्यास काहीही आर्थिक तरतूद झाली नव्हती त्यासाठी खड्डे बुजविण्यासाठी मुरूम टाकण्याचे प्रताप या विभागाने केले होते.तेही पहिल्या पावसाच्या आत होत्याचे नव्हते झाले आहे.त्यामुळे हा रस्ता पुन्हा पूर्ववत झाला आहे.आजीही अंजनापूर शिवारात विक्रमी खड्डे दिसून येत आहे.त्यामुळे या मार्गावर लवकरच अपघातांची मालिका सुरू होणार आहे.व जनतेच्या भाळी केवळ हात पाय मोडून घरात बसण्याची वेळ येणार आहे हे उघड आहे.त्यामुळे या रस्त्याच्या ठेकेदार आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचेवर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी काय कारवाई करणार ? हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.