सामाजिक उपक्रम
जागतिक रक्तदान दिन,…या ठिकाणी रक्तदान संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सध्या रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळ असणाऱ्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन व श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिकसह विविध महाविद्यालयांच्या वतीने जागतिक रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव,पॅलेसोमिया,रक्तक्षय,रक्ताचा कर्करोग,प्रसूतिपश्चात रक्तस्राव,शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते.अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते.कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही,त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.या पार्श्वभूमीवर रक्तदानाचे महत्व ओळखून राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन व श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.
या शिबिरात सर्व कॉलेजच्या प्राध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.तसेच रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी संजीवनी ब्लड बँक कोपरगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.रक्त संकलित करण्यासाठी कोपरगाव येथील संजीवनी ब्लड बँकेचे डॉ.नीता पाटील डॉ.कविता चौधरी,डॉ.जयश्री आढाव यांनी रक्त संकलित केले.या शिबिरात एकूण ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रसाद कातकडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.