कृषी विभाग
केन्द्र सरकार पाच लाख टन कांदा खरेदी करणार-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारत सरकार यावर्षी पाच लाख टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती भारत सरकारचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आय.एस.नेगी यांनी नुकतीच अ.नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे एका कार्यक्रमात दिली आहे.त्याचे राज्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
वर्तमानात देशात लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरु असून त्यात सर्वच पक्षाचे राजकीय नेते आणि त्यांचे पक्ष मश्गुल असून शेतकऱ्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे शेतमालाला कवडीमोल भाव मिळत आहे.त्यामुळे राज्यातील शेतकरी हैराण झालेले आहे.कांद्याची वेगळी स्थिती नाही.कांद्याची केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांना कोणीही वाली उरल्याचे दिसत नाही.अशातच एक दिलासा देणारी बातमी हाती आली असून अ.नगर जिल्ह्यात नुकतीच भारत सरकारचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आय.एस.नेगी यांनी नुकतीच अ.नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब भिमराज ढूस यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट या कार्यक्रमात भेट दिली असून त्यावेळी हि माहिती दिली आहे.
सदर प्रसंगी भारत सरकारचे अन्न पुरवठा विभागाचे संचालक सुभाष चंद्र मीना,व्यवस्थापकीय संचालक ॲनीस जोसेफ,राष्ट्रीय सहकारी ग्राहक फेडरेशनचे व्यवस्थापक श्री.एम.परीक्षित,राज्याचे पुणे येथील व्यवस्थापक विशाल भुजबळ,प्रसाद खामकर,वैभव ढूस,चंद्रकांत कराळे,कार्याध्यक्ष,प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रकाश वाकळे,देवळाली प्रवरा प्रहार शहर प्रमुख गणेश भालके,राहुरी फॅक्टरी प्रहार शहर उपप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”या वर्षी पाच लाख टन कांदा खरेदी करताना थेट शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाने एक नवीन पोर्टल तयार केले आहे.त्यामुळे शेतकरी त्यावर आपली नोंद करू शकतो व शेतकऱ्यालाही थेट त्यामार्फत कांद्याचे पैसे मिळू शकतात.या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास होणारा विलंब टळणार आहे.शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी विविध तंत्रज्ञान देण्यासाठी आम्ही राज्यांमध्ये विविध ठिकाणी अधिकारी पाठविले असून त्याद्वारे माहिती संकलन करण्याचे काम चालू आहे.तसेच कांदा खरेदीमध्ये पारदर्शकता आणून थेट खरेदीमुळे शेतकऱ्यांना नफा मिळण्यास मदत होणार आहे.
सदर प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी देवळाली प्रवरा शहरवासीयांच्या वतीने या केंद्रीय समितीचे त्यांचे निवासस्थानी स्वागत केले व केंद्राने शेतकऱ्यांना कांदा पिकासह इतर शेतमालाला हमीभाव देण्याची विनंती केली आहे.तसेच राज्यातील शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी अनुदान वाढवून मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे.