संपादकीय
निष्ठावानांचे अरण्य रुदन !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशातील काँग्रेसच्या नेत्यांना देखील आठवत असेल,एकेकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते एकाच पंक्तीत व एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी भोजनाला बसायचे.कार्यकर्ता देखील घरात असलेली मीठ मिरची खाऊ घालताना संकोचत नसे.कारण पक्षाचं काम करतांना विलक्षण आत्मीयता व आपुलकीची भावना प्रत्येकाच्या मनात भरलेली असायची.तसेच गावोगावी दोन-चार कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायचे.त्यासाठी एसटी बस असेल,काळी पिवळी टॅक्सी असेल,कार्यकर्त्याची मोटरसायकल असेल त्यावर बसून जणू पर्यटनाला निघाल्यासारखा आनंद घेऊन पक्षाचे कार्य करायचे. एके काळी पक्षात काम करणारे सारे कार्यकर्ते,नेतेही पक्ष हाच परिवार ही भावना समोर ठेवून पक्षात काम करायचे.निवडणुका लागल्यावर जनसंघाचा दिवा घेऊन दारोदारी प्रचार करायचे.एखाद्या भिंतीवर चुन्याच्या माध्यमातून जनसंघाचा दिवा दिसायचा.निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनामत रक्कम जप्त झालेला नेता देखील दुसऱ्या दिवशी पक्ष संघटनेच्या कामासाठी घराबाहेर पडायचा.पण भाजपच्या तत्कालीन नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कधीही आपली निराशा व्यक्त केली नाही.कुणावर रागाच्या भरात हल्ला केला नाही की शिवीगाळ केली नाही.खूनखराबा तर खूपच दूर राहिला.ज्या पक्षाच्या तोंडातून साधा अपशब्द बाहेर पडत नव्हता,त्या पक्षाच्या अलीकडील नेत्यांच्या तोंडात बाहेर पडलेले शब्द ऐकून हा पक्ष शामाप्रसाद मुखर्जी,पंडीत दीनदयाल उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज,अरूण जेटली,सूर्यभान पाटील वहाडणे,प्रा.ना.स.फरांदे,गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर यांचाच आहे का ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.मुळातच जनसंघ किंवा भारतीय जनता पक्ष नेमका काय आहे,हे ज्यांना कधीच समजले नाही,ते काँग्रेसवाले आज भाजपमध्ये येवून आमदार,खासदार,राज्यात मंत्री, केंद्रात मंत्री,उपमुख्यमंत्री,मुख्यमंत्री होत आहेत.उच्च पातळीवर जो प्रकार आहे,तोच खालच्या पातळीवर आहे. जुनेजाणते कार्यकर्ते निराश होवून सारा प्रकार मूकपणे पहात आहे.आलेले पाहुणे घरात कधी घुसले व त्यांनी घराचा ताबा कधी घेतला हे घराच्या मालकांना कळाले देखील नाही.भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवतो, पण जुने कार्यकर्ते मात्र जत्रेत हरवलेल्या लहान बालकासारखे झाले आहे.पक्षाचा चेहराच गायब झाल्यामुळे प्रत्येकजण भाजपमध्ये स्वतःला शोधायचा प्रयत्न करत आहे.कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की,हा तोच भाजप आहे का, जो पिठलं भाकरी खाऊन ग्रामीण भागापर्यंत पोहोचला होता ?
ज्या पक्षाचा झेंडा हातात धरला की लोक हसायचे.तत्कालीन काँग्रेसचे नेते म्हणायचे की,अख्या तालुक्यातील भारतीय जनता पक्ष एका रिक्षात मावतो.पण कितीही टिंगल टवाळी झाली तरीही कार्यकर्ता कधीही निराश झाला नाही.मग देशातील संपूर्ण सत्ता हाती येऊनही कार्यकर्ते निराश का होऊ लागले ? याचा पक्षश्रेष्ठींनी कधी विचार केला की नाही,हे लवकर समजणार नाही.ज्या पक्षात पैसा हा विषय कधीच नसायचा.कित्येक वेळा संघाचा जुना कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर दोन-चार जणांची जेवणाची व्यवस्था करायचा.आता तो आपल्याच पक्षाच्या आजूबाजूला पेट्यांची,खोक्यांची चर्चा ऐकून डोक्याला हात लावून बसला.आजही वैचारिक व नैतिक अधिष्ठान असलेला पक्ष म्हणून भाजपकडेच पाहीले जाते.पण पक्ष विस्ताराच्या नांवाने सुरू झालेल्या तडजोडी आता भाजपचे नेते कशा थांबविणार? ज्या पक्षात निष्ठेने काम करणारी मोजकी डोकी होती,त्या ठिकाणची डोकी मोजणे आता अशक्य झाले आहे.ती जागा आता धक्काबुक्कीची झाली आहे.ज्यांनी पक्षाला शिव्यांची लाखोली वाहीली,ते आता पक्ष नेत्यांची आरती करू लागले आहे.सत्ता किती महान असते हे त्यावेळी दिसून येते.भारतीय जनता पक्षाची मार्गदर्शक संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे.त्या संघटनेतील कार्यकर्त्यांच्या ‘हाफचड्डी’ वरून कमालीचे विनोद करणारे व टिंगलटवाळी करणारे नेते आता खाली मान घालून नागपूर भूमीला वंदन करून येतात.काही जणांनी ‘नमस्ते सदा वत्सले’ पाठ करायलाही सुरूवात केली आहे.पण या गर्दीत भाजपचा सच्चा कार्यकर्ता शोधायचा कुठे ?
आता तर भाजपमध्ये कार्यकर्ता जन्मालाच येत नाही.जो कोणी पक्षात येतो तो नेताच असतो.तो सर्व घरे फिरून अलीकडे भाजपमध्ये येऊन सत्ता राबवितो,मूळच्या कार्यकर्त्याला आदेश देत असतो.पक्षनिष्ठ असलेला कार्यकर्ता खाली मान घालून तो आदेश मान्यही करतो.याला शिस्त म्हणावे की,पक्षाची अधोगती हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.पण सत्तेच्या या साठमारीत कट्टर,धडाडीचा,सत्शील,सच्चा,दानशूर,निष्ठावान,समर्पित,प्रामाणिक अशी बिरूदावली चिकटलेला नेता किंवा कार्यकर्ता शोधायचा तरी कुठे ? एकीकडे आरक्षणावरुन मराठ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही,तो एम.एस.पी.साठी आकंठ ओरडत असताना सत्ताधाऱ्यांना दिसत नाही.सुशिक्षित तरुण रस्त्यावर भटकतो आहे.महागाईने जनता त्रस्त आहे.शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे वांधे केले जात आहे.आरोग्य सुविधा मिळत नसल्याने रुग्ण तडफडत मरत आहेत.पण याबाबतीत सामान्य माणसाला हात देणारा भाजपचा ‘तो’ कार्यकर्ता आता दिसत नाही किंवा तो गर्दीत हरवून गेला आहे.कमळ चिखलात उमलते हे सगळ्या जगाला माहित आहे.परंतु आता कमळ उमलताना आजूबाजूला इतका चिखल झाला आहे की,कमळाकडे सगळ्यांचेच दुर्लक्ष व्हायला लागले.कारण चिखलाने बरबटलेले अनेकजण बाहेर आले आणि सिंहासनावर बसून राज्य करू लागले आहे.आयुष्यभर पक्षाशी निष्ठा व बांधिलकी बाळगणारा कार्यकर्ता आता आजूबाजूला सापडेल का ? भाजपच्या विचारांशी व तत्वांशी प्रामाणिक राहून वाटचाल करणारा नेता तरी सापडेल का ? आणीबाणीच्या काळात पक्षाचे अनेक निष्ठावान तुरुंगात गेले.अनेकांचे संसार उध्वस्त झाले.निरंकुश सत्तेशी संघर्ष केल्यामुळे पक्षाला चांगले दिवसही आले.परंतु आणीबाणीच्या काळात अनेकांना तुरुंगात डांबण्यासाठी सरकारला यादी देणारे व तुरुंगाबाहेर राहून टाळ्या वाजवणारेच सत्तेच्या मुलायम व गुबगुबीत गादीवर जाऊन बसले. तरीही भाजपचा कार्यकर्ता मुकाटपणे सारे सहन करतो आहे.खरोखरच इतकी सहनशक्ती असलेला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता महानच म्हणावा लागेल!
पूर्वीचा भाजप,आजचा भाजप
आपले राज्य खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचे होते पण आता जनताच म्हणते की,महाराष्ट्राची वाटचाल यु.पी.,बिहार सारख्या राज्याप्रमाणे दिसत आहे.सध्या चाललेल्या घाणेरड्या राजकारणामुळे गुण्यागोविंदाने राहणाऱ्या जनतेच्या मनात भिती निर्माण झाली आहे.दररोज काही न काही घटना घडत आहेत व घडविल्या जात आहेत.सत्ताधाऱ्यांकडून तोडा फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची निती वापरली जात आहे.खुलेआम दिवसाढवळ्या पोलिस ठाण्यामध्येच बंदुकीतून गोळीबार केला जात आहे.कोणाचे कोणावर कसलेच नियंत्रण नसल्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल अराजकतेकडे सरकताना दिसत आहे.काही लोकप्रतिनिधी आपली संस्कृती विसरून भाषणात आया बहिणीवरुन घाणेरड्या शिव्यांची लाखोली वाहताना दिसत आहेत.त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली जाते,हे विकृत मानसिकतेचे लक्षण स्पष्ट दिसत आहे.तर कोणी पोलिसांना आव्हान देऊन त्यांच्यासमोरच त्यांच्या पत्नींबाबत बोलत असूनही त्यांना अटक केली जात नाही.कारण अशी बेताल विधाने करणारे भाजपचे नवे संस्कृतीरक्षक आहेत,असे म्हणतात. एखादी सामान्य व्यक्ती भाषणात एखादे वाकडे शब्द बोलले तरी त्याला लगेच अटक केली जाते.मग,लोकप्रतिनिधी समाजासमाजात तेढ निर्माण करण्याची भाषा वापरूनही त्यांच्यावर काहीच कारवाई का नाही ? हे कायद्याचे आणि पोलिसांच्या दुर्बलतेचे लक्षण नाही का ?
नवभाजपवासीयांचा मोठा धुमाकुळ !
आता भारतीय जनता पक्षात इतक्या मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी सुरू झाली आहे की,मूळ भाजपवाले चेंगरून कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन पडले आहेत.त्यांना कसलीही मदत किंवा सहारा मिळत नाही.पक्षाशी प्रामाणिक राहणाऱ्यांना भाजपमध्ये आलेल्या नव्या पाहुण्यांनी कोपऱ्यात ढकलून दिले आहे.कारण ढकलून देणारे मूळचे काँग्रेस संस्कृतीतील आहे.त्या संस्कृतीला भाजपने जवळ केले हे लक्षात घ्यावे लागेल.लोकसभेत सहज नजर टाकली तरी सर्व चित्र स्पष्ट होते.या क्षणाला लोकसभेत भाजपाचे ३०३ खासदार आहेत.या ३०३ खासदारांपैकी १३४ खासदार हे मूळ भाजपाचे आहेत.भाजपच्या सध्याच्या खासदारांपैकी १६९ खासदार हे देशातील वेगवेगळ्या पक्षातून भाजपात गेलेले आहेत.यामध्ये ४५ टक्के खासदार म्हणजे जवळपास ७७ खासदार हे काँग्रेस पक्षाचे आहेत.बाहेरून आलेल्या भ्रष्टाचाऱ्यांना मंत्रीपदांची खैरात वाटली जात आहे.पैशाची आमिषे आणि जेलमध्ये टाकण्याचा धाक दाखवून पक्ष वाढविले जात आहे.गेल्या काही वर्षापासून कथित ‘विकास’चा जन्मच झालेला दिसत नाही.एकूणच महाराष्ट्रात भयाण परिस्थिती असून जनतेचे रक्षण करणारे पोलिसही हतबल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.राज्यासाठी ही अतिशय धोकादायक बाब होय.नेहमी शांत असणारा आपला महाराष्ट्र अशांत कसा झाला याचाच विचार करण्याची वेळ आली आहे.
साभार-प्रा.जयंत महाजन