न्यायिक वृत्त
सर्वोच्च याचिकेतून साई संस्थानच्या अध्यक्षांसह तीन जणांची माघार ?
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त मंडळाच्या अपात्रतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या याचिकेतील प्रमुख पात्र व अध्यक्ष असलेले आ.आशुतोष काळे यांनी या याचिकेतून अचानक माघार घेतली असून त्यांच्या सोबत विश्वस्त अनुराधा आदिक व शिंदे गटाचे विश्वस्त राहुल कुनल यांनीही पिच्छे मुड केल्याने या याचिकेत कोणाचा हस्तक्षेप घडला याच्या उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.दरम्यान यातील अद्यापही सात विश्वस्त याचिकेत सामील असून आगामी सुनावणी दि.१९ मार्च रोजी अंतिम सुनावणी संपन्न होणार आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,”२०१९ ला राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली विधी व न्याय विभागाच्या नियमावलीनुसार शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळाची नेमणूक केली होती.या मंडळाच्या अध्यक्ष व विश्वस्तांना आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार नसले तरी साई भक्तांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात व श्री साईबाबा संस्थानचे काही विकासात्मक निर्णय घेण्याची मुभा दिली होती.त्यामुळे जरी आर्थिक अधिकार नसले तरी विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखाली संस्थानचा कारभार सुरु झाल्याचे दिसत होते व साई भक्तांना देखील सोयी-सुविधा मिळत होत्या.मात्र मागील दोन वर्षात राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे महाविकास आघाडी सरकार पायउतार होवून नवीन सरकार स्थापन झाले व सप्टेंबर २०२२ मध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाकर्ते उत्तमराव शेळके यांनी अड्.सतीश तळेकर यांच्या मार्फत सप्टेंबर २०२२ मध्ये विश्वस्त मंडळ बरखास्त केले होते.त्या आदेशा विरोधात विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका (एस.एल.पी क्रं.-१६९६७/२०२२) हि दाखल केली होती.
दरम्यान त्या याचिकेची आज रोजी सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरु होती.दरम्यान याचिकेत अचानक एक निर्णायक वळण आले असून आज संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी माघार घेतली आहे.त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या श्रीरामपूर नगरपरिषदेच्या माजी अध्यक्षा अनुराधा आदिक व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे राहुल कुणल यांचा समावेश आहे.
दरम्यान या याचिकेत अविनाश दंडवते,डॉ.एकनाथ गोंदकर,जयंत जाधव,सुहास आहेर,सचिन गुजर,महेंद्र शेळके,माजी.आ.डी.पी.आहेर,सचिन कोते,सुमित शेळके,मनीषा कायंदे,शिंदे गटाचे डॉ.भोर,श्री लाखे आदीसंह १३ विश्वस्त सर्वोच्च न्यायालयात लढत आहे.मात्र तेही राजकीय दबावाला बळी पडणार की शेवटपर्यंत टिकणार असा सवाल निर्माण झाला आहे.दरम्यान सर्व विश्वस्तांवर राजकीय दबाव होता अशी माहिती मिळत असून बाकी विश्वस्तांनी त्यास कोलदांडा घातल्याने सरकारचे मनसुबे उधळले गेले असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान या प्रकरणी अंतिम सुनावणी आगामी १९ मार्च २०२४ रोजी संपन्न होणार आहे.त्यामुळे त्या आधी आणखी काही विश्वस्त आपली माघार घेणार का असा सवाल निर्माण झाला आहे.त्यात जर राज्य सरकारला यश आले नाही तर आगामी कालखंडात लोकसभेची आचार संहिता लागणार असून त्यामुळे सगळे मुसळ केरात जाणार आहे.