दळणवळण
प्रजिमा ४ च्या गोई नदी पुल कामाची ३.४४ कोटीची निविदा प्रसिद्ध-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव मतदार संघातील अनेक रस्ते व पुलांचा प्रश्न मागील चार वर्षात सुटला असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या धामोरी येथील गोई नदीवरील पुलाचा प्रश्न देखील येत्या काही महिन्यात सुटणार आहे.या पुलाच्या कामाची ३.४४ कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच पुलाच्या कामास प्रारंभ होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील धामोरी येथील प्रजिमा-४ वरील गोई नदीवरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पूल पाण्याखाली गेल्यानंतर कोपरगाव चास नळी वाहतूक बंद होत असे.त्याचा परिणाम चासनळी,मोर्वीस,वडगाव,बक्त्तरपूर,हंडेवाडीच्या नागरिकांना कोपरगावला जायचे असेल तर कोळपेवाडी मार्गे जावे लागत होते व धामोरी,मायगाव देवी,सांगवी भुसारच्या नागरिकांना चासनळी किंवा लासलगाव,विंचूर,बसवंत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीला घेवून जाण्यासाठी नासिक जिल्ह्यातील वाकद शिरवाडे मार्गे आठ ते दहा किलोमीटर जास्त अंतर जावे लागते.त्यामुळे वेळेबरोबरच आणि आर्थिक नुकसान देखील होत होते. मात्र वाकद शिरवाडे येथील हा छोटा पूल देखील पाण्याखाली गेला तर नागरिकांना पर्यायच शिल्लक राहत नव्हता त्यामुळे नागरिकांना पाणी ओसरेपर्यंत वाट पहावी लागत होती.त्यामुळे गोई नदीवरील पुलाची उंची वाढविली जावून त्या ठिकाणी नवीन पूल बांधला जावा अशी धामोरीसह चासनळी,मोर्वीस,वडगाव,बक्त्तरपूर,हंडेवाडी,मायगाव देवी, सांगवी भुसार व परिसरातील नागरिकांची मागणी होती.
कोपरगाव मतदार संघातील धामोरी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून त्याचबरोबर लगत असलेल्या चासनळीला दर बुधवारी भरणारा आठवडे बाजार व त्या ठिकाणी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र त्यामुळे धामोरी,मायगाव देवी व तसेच धामोरीप्रमाणे मोठी लोकसंख्या असलेल्या सांगवी भुसार येथील नागरिकांचा सातत्याने चास नळी येथे धामोरी मार्गे मोठी वर्दळ सुरु असते.त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी आ.काळे यांनी या पुलासाठी निधी मिळावा याकरीता शासनाकडे पाठपुरावा केलेला असून आताया पुलाच्या कामाची निविदा देखील प्रसिद्ध झाली आहे.लवकरच कामास प्रारंभ होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून मागील अनेक वर्षापासूनची अडचण आ.काळे यांच्या प्रयत्नातून कायमची सुटणार असल्याचा दावा त्यांनी शेवटी केला आहे.