आंदोलन
कारसेवा इतिहास…मनोगत
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अकोले तालुका दंडकरण्याचा भाग असून हा प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका असून रामचंद्राचे वंशज राजा हरिश्चंद्राचे नगरीं म्हणून हा तालुका ओळखला जातो.अगस्ती महाराज यांचे वास्तव्य या तालुक्यात आहे. जटायू ला पाणी पाजण्यासाठी मारलेला बाण या तालुक्यात सोमठाणे या ठिकाणी असून अगस्ती महाराज यांची भेट घेण्यासाठी प्रभू श्रीराम येथे आलेले असल्याचा इतिहास इथला असल्याने तालुक्यातील कारसेवा चा इतिहास लिहिताना मला अतिशय आनंद होत आहे.प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माण च्या कार्यातील खारीचा वाटा माझे वाट्याला आला.याचा अभिमान आहे.
रामजन्म भूमी आंदोलनाचे नेतृत्व
दि.२८ सप्टेंबर १९८४ अकोले तालुका स्तरावरची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बैठक संघचालक डॉ.सी.पी.देशपांडे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.या बैठकीला तालुका कार्यवाह वल्लभ दाजी कश्यप,चंद्रभान टेके,प्रचारक जगन्नाथ दिवेकर,अशोक रसाळ,श्रीधर बळवंत भाटे,दत्तात्रय वाणी यांचे सह आपण उपस्थित होतो.या बैठकित मी रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करून सर्व आंदोलनाचे नियोजन करावे असे ठरले.
रामजन्मभूमी आंदोलनाची मुहूर्त मेढ
दिनांक ३० सप्टेंबर १९८४ रोजी जिल्ह्याकडून आचार्य ब्रह्मचारी विश्वनाथ यांचे कार्यक्रम करण्याचे ठरले.यासाठी ‘मनोहरपूर व हिवरगाव या दोन गावांमध्ये मिरवणूक काढून कार्यक्रम करण्यासाठी तयारी सुरू झाली.हिवरगाव मध्ये मारुती रेवगडे,अशोक रेवगडे,माधव ठुबे व गावातील अनेक ग्रामस्थांनी भाग घेऊन भव्य अशी बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली.या ठिकाणी सभा घेण्यात आली.या सभेमध्ये प्रा.एस.झेड.देशमुख सर व ब्रह्मचारी विश्वनाथजी यांचे मार्गदर्शन झाले आणि राम जन्मभूमी आंदोलनाची तालुक्यातील भूमिका व आंदोलन याबाबतची मुहूर्तमेढ रोवली गेली.
मनोहरपुर मध्ये स्वातंत्र्य सेनानी पी.जी.भांगरे,ब्रह्मचारी विश्वनाथजी,प्रा एस.झेड.देशमुख सर,डॉ.सी.पी.देशपांडे व आपण मार्गदर्शन केले.गावातून मिरवणूक निघाली आणि राम जन्मभूमी आंदोलनाची सुरुवात झाली होती.
०२नोव्हेंबर १९८६ साली करवीर पिठाचे शंकराचार्य यांचा दौरा आखण्यात आला.या दौऱ्यासाठी अध्यात्मिक गुरु ह.भ.प.पांडुरंग महाराज मुखेकर,मनोहर महाराज भोर,रामनाथ महाराज जाधव यांच्याशी बैठका करून तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला.
त्यामध्ये मनोहरपूर,अकोले अगस्ती आश्रम यामध्ये कार्यक्रम आयोजित केला.या कार्यक्रमाला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि तालुक्यामध्ये रामभक्ती रुजवण्यास सुरुवात झाली.
मोठया सप्ताह चे आयोजन
१९८७ साली अगस्ती आश्रम अकोले,कोतुळेश्वर कोतुळ,रामेश्वर देवस्थान धांदरफळ या ठिकाणी मोठ्या सप्ताह आयोजन करण्यात आले.यामध्ये ह.भ.प.भास्करगिरी महाराज,ह.भ.प.रामनाथ महाराज जाधव,ह.भ.प.मनोहर महाराज भोर,ह.भ.प.पांडुरंग महाराज मुखेकर आणि ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांची मोठी किर्तने ठेवून रामजन्मभूमीचा जागर कीर्तनांमधून करण्याचं काम या ठिकाणी केले.
शिलापूजन
०१ ऑगस्ट १९८९ रोजी या तालुक्यांमध्ये शिलापूजनाला सुरुवात झाली.तालुक्यातील १४७ ग्रामपंचायत मध्ये शीलापूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.प्रत्येक ग्रामपंचायतचे पदाधिकारी व गावचे भजनी मंडळ आणि त्या ठिकाणी कार्यकर्ते प्रत्येक कार्यक्रमात हजर राहत होते.तालुक्यातून प्रत्येक घरातून सव्वा रुपया निधी आमच्याकडे देत होते. प्रत्येक गावामध्ये वक्ते कमी असल्यामुळे प्रा.एस.झेड.देशमुख सर व मी प्रत्येक गावामध्ये हजर राहता येईल अशा पद्धतीचे रचना या तालुक्यांमध्ये करण्यात आली.आणि त्यामध्ये असंख्य जनतेचे योगदान मिळाले आणि कार्यक्रम यशस्वी झाले.
अगस्ती रथ यात्रा अन रथ यात्रेवर हल्ला
१९९० मध्ये कारसेवा समिती स्थापन झाली.अकोले तालुक्यामध्ये माझ्यावरती जबाबदारी सोपवली आणि मी अगस्ती रथयात्रा तालुक्यातून काढली तालुक्यातून ३५ गावांमधून ही रथयात्रा संगमनेर तालुक्यामध्ये नेली.त्यामध्ये ३० गावांमध्ये ही रथयात्रा फिरली.जनजागृती करताना ह.भ.प.वाणी महाराज,धोंडिबा वाकचौरे हे पूर्णपणे रथयात्रेबरोबर माझ्या समवेत होते.संगमनेर तालुक्यातून रथयात्रा पारनेर तालुक्यात गेली.पारनेर तालुक्यातही चांगल्या पद्धतीचे स्वागत झालं.चांगले कार्यक्रम झाले.तेथेही ४० गावा पर्यंत रथयात्रा गेली आणि रथयात्रा नगरच्या दिशेने जात असताना सुपे घाटामध्ये हत्यारांनीं भरलेली गाडी एक अंबेसिडर आमच्या गाडीला,आमच्या रथाला आडवी मारण्याचा वारंवार प्रयत्न झाला.परंतु रथयात्रेला संरक्षण असल्यामुळे,पोलीस संरक्षण गाडी बरोबर असल्याने तातडीने अंबेसीडर ताब्यात घेतली आणि पंचनामा करून नगरला जमा केली.त्यादिवशी काय घडले असते हे मला माहीत नाही परंतु संरक्षण नसते तर रथयात्रा मला नगर पर्यंत नेणे सुद्धा त्रासदायक झाले असते.परंतु प्रभू रामचंद्राच्या कृपेने नगरमध्ये रथयात्रा सुखरूप पोहोचली.त्या ठिकाणी तीन रथयात्रेचा संगम होता.एक चोंडीवरून निघालेली रथयात्रा,दुसरी शिर्डी वरून निघालेली रथयात्रा व अगस्ती रथयात्रा या तिन्ही यात्रेंचा संगम होऊन भव्य अशी नगरमध्ये मिरवणूक निघून त्या ठिकाणी सभा झाली.रथयात्रा आपापल्या गावी आल्या.त्या नंतर आयोध्याला जाण्यासाठी यात्रा निघाली.अनेक उपज्योत यात्रा काढण्यात आल्या.त्यामध्ये अकोले तालुक्यात एक यात्रा काढण्यात आली.ही ९७ गावातून ज्योतयात्रा मिरवण्यात आली.प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद या यात्रेला मिळाला आणि तालुक्यातून संबोधित करण्यासाठी ह.भ.प.मनोहर महाराज भोर,प्रा.एस.झेड.देशमुख सर,ह.भ.प.पांडुरंग महाराज मुखेकर,ह.भ.प. रामनाथ महाराज जाधव,राजेंद्र धारणकर,बाळासाहेब मुळे व मी आदिसह रामभक्त रमेश शेठ नेवासकर,भाऊसाहेब घोरपडे,मुरलीधर लहामगे,डॉक्टर सी.पी.देशपांडे,अनिल सोमणी,दत्तात्रय वाणी,खिरविरा येथील देशपांडे डॉक्टर, अशोक रसाळ असे सर्वजण या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटत होतो.कार्यक्रम चांगल्या पद्धतीने या तालुक्यांमध्ये झाला.घराघरापर्यंत प्रभू रामचंद्रांचा इतिहास व जनजागृती या तालुक्यांमध्ये चांगल्या पद्धतीची झाली.
अयोध्येला कारसेवा-
१९९० कारसेवेला अयोध्येला जाण्याचा निर्धार अनेक कार्यसेवकांनी केला.त्यासाठीच्या सर्व बैठका या ठिकाणी केल्या गेल्या.आणि कारसेवेसाठी निघालेले अकोले तालुक्यातून रामेश्वर मुंदडा,राजेंद्र धारणकर,नितीन जोशी, माधवराव तिटमे,श्रीधर बळवंत भाटे,अशोक रसाळ,अनिल सोमणी,जालिंदर वाकचौरे हे कार्यकर्ते निघाले.त्यांना झाशी या ठिकाणी अटक करून पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला व ते आयोध्या पर्यंत पोहोचू शकले नाही.त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग यादव यांचे सरकार होते.या सरकारने संपूर्णपणे उत्तर प्रदेशात येण्यास मज्जाव केला त्यामुळे पंधरा दिवस अगोदर जे कारसेवक आयोध्यात गेले तिथं उग्र अशा स्वरूपाचा लाठीचार्ज झाला.अश्रुधुराचे नळकांडे सोडले.अनेकांना गोळ्या घालण्यात आल्या.आणि शरयू नदी रक्ताने लाल झाली.कार सेवकांचं बलिदान त्या ठिकाणी झाले.अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मुलायम सिंग सरकारने सरकारने निर्दयी पद्धतीने कोठारी बंधूंना गोळ्या घातल्या.
बाबरी ढाचा पाडला-
सन-१९९२ अनेक निषेधाचे आंदोलन उभारण्यात आली.आणि पुन्हा परत ३० नोव्हेंबर रोजी आम्ही आयोध्याकडे कारसेवेसाठी निघालो.माझ्या समवेत दौलत नाना देशमुख,श्रीधर बळवंत भाटे,धनंजय संत,पिंट्या म्हसे,अशोक रसाळ यांचा परिवार,अनिल सोमणी,बाळासाहेब मंडलिक,कळस येथील धोंडिबा वाकचौरे बाबा,बाळासाहेब मुळे, सुभाष वाकचौरे,शिवाजी धुमाळ,तात्याबा धुमाळ असे ४८ कार सेवक निघालो.श्रीरामपूर वरून झेलम एक्सप्रेस ने झाशी येथून ट्रेन बदलून अयोध्या कडे आगमन केले आणि माझ्याकडे शंभर कारसेवक नसल्यामुळे वाहिनी पूर्ण करण्यासाठी संगमनेर आणि नेवासा परिसरातील काही कारसेवक घेऊन वाहिनी पूर्ण करण्यात आली आणि साकेत डेअरी फैजाबाद या ठिकाणी राहुटीची व्यवस्था करण्यात आली.दर दिवस मध्ये प्रत्येक गल्लीमध्ये फिरायचे,दर दिवस होणाऱ्या सभेला हजर राहायचे,होणाऱ्या मिटींगला हजर राहायचे,अयोध्येमध्ये प्रत्येक गल्ली राम मंदिराचा परिसर हा आमचा परिचयाचा झाला होता आणि आणि सहा डिसेंबर रोजी ठरल्याप्रमाणे एक मूठ वाळु आणण्यासाठी कारसेवक निघाले परंतु आमच्या सर्वांच्या मनामध्ये वाळू नसून त्या ठिकाणी असणार बाबराने बांधलेली मशीद कार सेवकांच्या डोळ्यात सलत होती.स्टेज वरती भाषण चालू होते परंतु त्या भाषणाकडे कोणाचंही लक्ष नव्हतं आणि म्हणून सर्व कार सेवक बाबरी मशिदीच्या दिशेने निघालो.तार कंपाउंड तोडलं कारण पोलिसांचा विरोध नव्हता,केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार होतं राज्यांमध्ये कल्याण सिंग यांचे भाजपचं सरकार होते.मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी कोर्टामध्ये लेखी लिहून दिलं होतं की,”मी बाबरी मशीद पाडू देणार नाही; तर प्रतिबंध करेल” परंतु अनेक कारसेवक घुमटा वरती चढले,अन
“सियावर रामचंद्र की जय…”,”जय जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला त्यावेळी हातोड्याने,मिळेल त्या साहित्याने तोडण्याचं काम सुरू झाले बरोबर तीन तासांमध्ये तिन्ही घुमटे जमीनोदोस्त केली.धुळीचा लोट संपूर्ण आयोध्यावर पसरला आणि कारसेवकांना आपापल्या जागी जा असे सांगण्यात आले.यामध्ये अनेक कार सेवक जखमी झाले.जखमींना फैजाबादच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले यामध्ये संगमनेर येथील रंगार गल्लीतील कार सेवक होता.बाबरी ढाचा पाडल्यानंतर आम्ही साकेत डेअरीवर आलो.रात्री ब्लॅक आऊट झालं होते.भा.द.वि.१४४ कलम लागू केलेलं होते आणि कल्याण सिंग सरकारचा राजीनामा झाला होता.
दिनांक ०७ डिसेंबर ला संध्याकाळी चार वाजता आम्हाला निरोप मिळाला की तुमची वाहिनी घेऊन काशी या ठिकाणी पोहोचणे व तिथून सकाळी सातची ट्रेन पकडून मुंबईच्या दिशेने रवाना होणे.म्हणून अयोध्या रेल्वे स्टेशनवर मी माझी वाहिनी घेऊन आलो.काशी कडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसायला नव्हे तर चढायला सुद्धा जागा नाही. आमच्याबरोबर पाच सहा महिला,काही वृद्ध माणसं यांना बळे बळेच रेल्वेमध्ये कोंबत होतो.माता भगिनींना आत मध्ये लोटत होतो नाना रसाळ,धनंजय संत,पिंट्या म्हसे,सुभाष वाकचौरे आम्ही सर्व कार सेवकांना रेल्वेमध्ये कोंबले व आम्ही रेल्वेच्या टपावरती बसून काशी कडे निघालो रेल्वे कोळशाची असल्यामुळे,अख्खा धूर आमच्या अंगावरती आणि डोळ्यांमध्ये जायचा.कसाबसा पाच तासाचा प्रवास करून आम्ही काशीमध्ये पोहोचलो.रात्रीचे बारा वाजले होते.रेल्वे स्टेशन वरती सर्व स्टॉल बंद झालेले होते आणि अनिल सोमणी यांना भूक लागली म्हणून ते रेल्वे स्टेशन बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी त्यांच्या पाठोपाठ गेलो व धनंजय संत पाठोपाठ आले सोमणी सर बाहेर पडणार तोच काशीमध्ये प्रचंड अशी दंगल चालू होती अशी माहिती मिळाली होती.तेवढ्यात एक गोळी सोमणी सरांच्या व आमच्या दिशेने,आम्ही सरांना खाली दाबलं आणि ती गोळी रेल्वे स्टेशनच्या भिंतीवरती आदळली काळ आला होता परंतु वेळ आलेली नव्हती.आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही वाचलो सकाळी सात वाजता रेल्वे लागली.आणि त्यामध्ये बसलो,कुणी जर स्टेशन आल्यानंतर आत मध्ये फळे काही टाकलं तरच ते खायचं अशा पद्धतीने आणि नाशिक रोडला दिड दिवसानंतर पोचलो.त्यावेळेस संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गावित हे रेल्वे स्टेशनला घ्यायला आले आणि त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना ताब्यात घेऊन अकोल्यामध्ये आणण्यात आले.अकोल्यात डॉ.देशपांडे व इथं असलेले सर्व कारसेवक अकोला सोसायटीच्या हॉलमध्ये सत्कार करण्यात आला.
अकोल्यात अटक-
२४ जानेवारी १९९३ रोजी दिल्लीमध्ये चेतना मेळावा होणार होता आणि त्यासाठी मला जायचं होतं परंतु अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृष्णाराव जाधव यांनी रात्री नऊ वाजता सापळा लावून मला माझ्या घरी मनोहरपुर मधून ताब्यात घेण्यात आले परंतु पोलीस गाडी गावात आली आणि घरासमोर थांबली गावच्या लोकांच्या लक्षात आले,लोकांनी गराडा घातला आणि पोलिसांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला.परंतु मी सर्वांची समज काढली पोलिसांचं काम पोलिसांना करू द्या आणि गावकऱ्यांना आणि सर्वांना विश्वासात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणण्यात आलं.स्थानबद्ध करण्यात आलं.आठ दिवसाची कोठडी मिळाली आणि आठवी दिवस मी पोलीस स्टेशनच्या वेगळ्या रूममध्ये होतो मला राजेंद्र धारणकर,भास्कर फापाळे,अनिल सोमनी अशा पाच जणांना अटक करण्यात आली.नवव्या दिवशी मला सोडण्यात आलं परंतु तेव्हापासून आजपर्यंत पोलीस आणि पोलीस स्टेशन हे माझे मित्र झाले.कारण अगस्ती रथयात्रेमध्ये मला जे एस्कॉर्ट होतं ते अकोले पोलिसांचं होतं आणि खरोखर नऊ दिवसाच्या कालखंडामध्ये त्यांनी दिलेली ट्रीटमेंट मी माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही.किंवा माझे मित्रही कधी विसरू शकत नाही.अतिशय चांगल्या पद्धतीचं एक राम भक्त म्हणून त्यांनी आम्हाला वागणूक दिली.
या सर्वांचं ज्यांनी सहकार्य केले गेली दहा वर्ष या तालुक्यामध्ये जे आंदोलन उभं केलं याला भरभरून असा प्रतिसाद या तालुक्यांन दिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो.विशेषतः गावोगावची जी भजनी मंडळ आहेत हे अत्यंत निरोप गेल्यानंतर तत्परतेने कार्य करायचे आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचा वाटा या भजनी मंडळांचा आहे.त्यानंतर कारसेवा ही झाली २७ डिसेंबर २००२ साली या कारसेवेची जबाबदारी अकोले तालुक्यामध्ये देण्यात येऊन,’बजरंग दला’ची स्थापना झाली.भाऊसाहेब चव्हाण,बबलू धुमाळ,दत्ता ताजने,गोंड्याभाऊ यांच्या वर होती.त्यामुळे हे सर्व कारसेवेला गेले.कारसेवे वरून परत आले.परंतु गोध्रा या ठिकाणी ट्रेनला आग लावण्यात आली. आणि यामध्ये का ६० कारसेवकांचा होरपळून मृत्यू झाला मनाला वेदना झाल्या.
परंतु न्यायालयामध्ये विजय झाला.
“रामल्ला हम आवत है,मंदिर भव्य बनाएंगे” हि घोषणा आज प्रत्यक्षात साकार होत आहे.आज रामलल्लाच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा होते.अतिशय असा मनाला आनंद होतो.हा दिवस अनेक हुतात्म्यांना पाहायला मिळालं नाही.परंतु तो आम्हाला मिळाला केवळ आणि केवळ त्यागातून हे राम मंदिर उभे राहणार असून हे राष्ट्र मंदिर व्हावं अशीच आमच्या राम भक्तांची इच्छा….!
शब्दांकन-
सिताराम भांगरे
अकोले,जिल्हा अ.नगर.