कोपरगाव शहर वृत्त
घराचे स्वप्न साकारण्यासाठी म्हाडाची योजना गरजेची-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
स्वत:चे घर असावे असे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते परंतु शहरात जागेचे भरमसाठ दर व घर बांधण्यासाठी येणार मोठा खर्च त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपल्या घराच्या स्वप्नापासून कोसो दूर राहत आहे.त्यामुळे अशा नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी म्हाडाची योजना राबविणार असून त्याबाबत नुकतीच म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या बेट भागातील सर्व्हे क्र.५६ मधील जागेची पाहणी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर प्राथमिक लक्ष केंद्रित करून,महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) सामाजिक गृहनिर्माण क्षेत्रात आघाडीवर आहे.महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा द्वारे लॉटरी पद्धतीने सर्व उत्पन्न गटातील पात्र नागरिकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देते.त्यामुळे जे नागरीक आर्थिक अडचणीमुळे स्वत:चे घर घेवू शकत नाही त्यांना आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारता येते.हि योजना पुणे,मुंबई,नासिक,संभाजीनगर,नागपूर अशा मोठ्या शहरात तसेच महापालिका क्षेत्रात व्यापक प्रमाणात राबविले जाते.त्याच धर्तीवर नगरपालिका क्षेत्रात देखील हि योजना राबवून कोपरगाव शहरातील ज्या नागरिकांना वास्तव्यासाठी स्वत:चे घर,जागा नाही अशा नागरिकांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी आ. आशुतोष काळे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून कोपरगाव शहरात म्हाडाची योजना राबविण्याबाबत सूचना केल्या होत्या.
त्या सूचनेनुसार म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवार दि.३० रोजी कोपरगाव शहरात येवून कोपरगाव नगरपरिषदेच्या बेट भागातील सर्व्हे क्र.५६ मधील जागेची पाहणी केली.या जागेवर एकूण ३५० घरांची निर्मिती होवून ३५० कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.घरांच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न धूसर होत चालले आहे.परंतु म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे स्वत:च्या घराचे स्वप्न सत्यात उतरून परवडणारे घर उपलब्ध होते.कोपरगाव शहरात म्हाडाची योजना राबविण्यात पुढाकार आ.काळे यांनी पुढाकार घेतला आहे.यावेळी म्हाडाचे अधिकारी नितीन आव्हाड,महेश कडू,कोपरगाव नगरपरिषदेचे किरण जोशी,हर्षवर्धन सुराळकर,प्रवीण पठाडे आदींसह सचिन परदेशी,राजेंद्र जोशी,विलास आव्हाड,राहुल आव्हाड आदी उपस्थित होते.