विशेष दिन
संविधान हे सभ्य नागरिक बनायला शिकवते-…यांचे प्रतिपादन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जगातील सर्व चांगल्या घटनांचे संकलन म्हणजे संविधान असून संविधान हे सभ्य नागरिक बनायला शिकवते असे प्रतिपादन कोपरगांव न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगांव तालुका विधी सेवा समिती व कोपरगांव वकील संघ यांचे वतीने भारतीय संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख अतिथी कोपरगांव न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित,संत ज्ञानेश्वर विदया प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष किरण भोईर,स्वच्छतादूत सुशांत घोडके,सदस्य दिलीप सोनवणे,वकील संघाचे अँड.शंकर यादव,अँड.दिपक पवार,अँड.शितल देशमुख,अँड.ज्योती भुसे,अँड.करुणा सोनवणे,अँड.सोनल पोळ,प्राचार्य सचिन मोरे,विशाल झावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी न्यायाधीश पंडित पुढे बोलताना म्हणाले की,”शालेय जीवनात विद्यार्थी म्हणून शिक्षण घेणे स्वतःला शिस्त लावणे महत्त्वाचे आहे.विद्यार्थ्यांनी कायद्याने पालन करणारे नागरिक व्हावे.उद्याच्या भवितव्यासाठी शिस्तीने चांगले नागरिक घडून देशाला पुढे नेण्याचा संकल्प करावा असे आवाहन शेवटी केले आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांनी संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करित ते अंगिकारण्याची शपथ दिली आहे.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,संत ज्ञानेश्वर,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पुजन करण्यात आले.संविधान दिनाचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प्राचार्य,शिक्षक यांचे सह सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.तसेच मान्यवरांचे आभार व सुत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका चैताली पुंडे यांनी केले आहे.