साहित्य व संस्कृती
…हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमान राजकारणातील नागवेपण संपवायचे असेल तर के.बी.सारख्या तत्त्वनिष्ठ राजकारण्यांची गरज आहे.के.बी.रोहमारे यांनी कृष्णाकाठ प्रमाणे गोदाकाठी क्रांती आणली असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी कोपरगाव येथे बोलताना केले आहे.

“के.बी.रोहमारे यांनी सामान्य माणसाला,शेतकरी व शेतमजुराला पुढे नेण्याचे काम केले.शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना सक्षम बनविण्यासाठी गोदाप्रवरा यासारख्या सहकार क्षेत्रामध्ये अनेक मोठमोठ्या संस्थांची स्थापना केली होती”-माजी आ.डॉ.सुधीर तांबे,संगमनेर.
कोपरगाव येथील के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या साकरबेन सोमैया सभागृहामध्ये माजी आ. के.बी.रोहमारे यांचे 28 वे पुण्यस्मरण व भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.डॉ.सुधीर तांबे होते.
सदर प्रसंगी भि.ग.रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव रावसाहेब रोहमारे,शोभाताई रोहमारे,मंदाताई रोहमारे,माजी जि.प.सदस्य सोनाली रोहमारे तसेच कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त,सुनील शिंदे,संदीप रोहमारे,ऍड.राहुल रोहमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,“यशवंतराव चव्हाण,बाळासाहेब भारदे,नागनाथ आण्णा नाईकवाडी,मारुतराव घुले पाटील,भाऊसाहेब थोरात आदींच्या सानिध्यात के.बी. रोहमारे यांची वैचारिक जडणघडण झाली होती.राजकारण व समाजकारणाबरोबरच साहित्याविषयी देखील के.बी.ना प्रचंड आस्था होती.म्हणूनच त्यांनी असा अनोखा उपक्रम सुरू केला आणि त्यांच्या नंतरच्या पिढीनेही तो आजतागायत सुरू ठेवला ही अभिमानाची गोष्ट आहे.वेदना व प्रतिभेच्या संगमातून साहित्याचा जन्म होतो.साहित्यातील शब्द हे लेखकाच्या काळजातून आलेले असतात.म्हणूनच ते समाजाचे व व्यक्तीचे जीवन अंतर्बाह्य बदलून टाकतात.चांगले व दर्जेदार साहित्य माणसाच्या चेहर्यावर आत्मसम्मान बहाल करत असतात.आज इथे पुरस्कार प्राप्त सर्व लेखक बंधूंचे आपण मनःपूर्वक अभिनंदन करत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, “के.बी.रोहमारे यांनी सामान्य माणसाला,शेतकरी व शेतमजुराला पुढे नेण्याचे काम केले.शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना सक्षम बनविण्यासाठी गोदाप्रवरा यासारख्या सहकार क्षेत्रामध्ये अनेक मोठमोठ्या संस्थांची स्थापना केली.के.बी.ची पिढी ही एक समर्पित पिढी होती.त्यांना ग्रामीण जीवनाविषयी प्रचंड कळवळा होता.म्हणूनच त्यांनी सुरू केलेल्या अशा योजना आज ग्रामीण जीवनाचा श्वास बनलेल्या आहेत.आज देशात सुरू असलेले प्रतिक्रांतीचे वारे थोपविण्याची जबाबदारी ही या पुरस्कार प्राप्त लेखकांची आहे.त्यांनी के.बी.रोहमारे व अशोक रोहमारे यांचा वारसा समर्थपणे पुढे न्यावा असे आवाहन शेवटी केले आहे.
सदर कार्यक्रमात आपले मनोगत भि.ग.रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक रोहमारे यांनी केले आहे.तर यावेळी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या भावना व्यक्त करताना सर्वोत्कृष्ट ग्रामीण कादंबरी नांगरमुठीचे लेखक पांडुरंग पाटील कोल्हापूर म्हणाले की,”भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार हा साहित्यातील साहित्य अकादमी सन्मान असून त्याचे मोल आमच्यासारख्या लेखकांसाठी पारिजातका समान आहे.”पुरस्कारप्राप्त कवी सागर जाधव जोपुळकर म्हणाले की हा “पुरस्कार म्हणजे माझ्या कवितेला महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात मिळालेला अनमोल सन्मान आहे.”याप्रसंगी जाधव यांनी आपली एक मार्मिक ग्रामीण कविता देखील सादर केली.कवी सचिन शिंदे,डॉ.हंसराज जाधव,डॉ.नारायण शिवशेट्टे व भारत सातपुते यांनीही आपापल्या भावना व्यक्त केल्या.
सदर प्रसंगी पांडुरंग पाटील (राधानगरी,कोल्हापूर) यांना ‘नांगरमुठी’ या ग्रामीण कादंबरीसाठी रुपये, १५ हजार,सन्मान चिन्ह,सन्मानपत्र,डॉ.हंसराज जाधव (पैठण) यांना ‘मोहरम’ या ग्रामीण कथासंग्रहासाठी रु.१५ हजार,सन्मान चिन्ह,सन्मानपत्र,सचिन शिंदे (उमरखेड,यवतमाळ) यांच्या पातीवरल्या बाया व सागर जाधव जोपुळकर (चांदवड, नाशिक) यांच्या माती मागतेय पेनकिलर या ग्रामीण कविता संग्रहांसाठी (विभागून) प्रत्येकी ७ हजार ५०० सन्मान चिन्ह,सन्मानपत्र तर डॉ.नारायण शिवशेट्टे (अर्जापूर,नांदेड) यांच्या ग्रामीण आत्मकथनात्मक वाङमय: एक अभ्यास या ग्रामीण समीक्षेसाठी व भारत सातपुते (गातेगाव,लातूर) यांना ‘जागरण’ या ग्रामीण आत्मकथनासाठी (विभागून) प्रत्येकी ७ हजार ५०० सन्मान चिन्ह,सन्मानपत्र मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ.विजय ठाणगे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.शैलेंद्र बनसोडे व प्रा.वर्षा आहेर यांनी केले तर डॉ.रवींद्र जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे,डॉ.नामदेव ढोकळे,डॉ.जी.एस.शिंदे,डॉ.एन.जी.शिंदे,डॉ.व्ही.एस.साळुंके,डॉ.सुरेखा भिंगारदिवे,डॉ.बी.एस.गायकवाड व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवकांनी विशेष परिश्रम घेतले असल्याचे दिसून आले आहे.



