सहकार
…या पतसंस्थेतील तंत्रज्ञान राज्यातील पतसंस्थांमध्ये लागू करणार-सहकार मंत्री
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशातीलच नव्हे,तर परदेशातील पतसंस्था,बँकांनाही लाजवेल अशा प्रकारचे कामकाज समता पतसंस्थेने केले असून या कामकाजाचा आदर्श महाराष्ट्रातील पतसंस्थांनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी नुकतेच कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
समता नागरी सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.अतुल सावे यांनी सदिच्छा भेट दिली असता समवेत समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,सर्व संचालक मंडळ व अधिकारी.
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री यांनी नुकतीच राज्यातील सहकाराची पतसंस्था चळवळीत अग्रणी असलेल्या समता पतसंस्थेला भेट दिली व त्यांची कार्यप्रणाली जाणून घेतली.विशेषत: पेपरलेस बँकिंग प्रणाली,व्हाउचेरल बँकिंग प्रणाली,फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम,समता वसुली पॅटर्न,समता सुधन गोल्ड लोन योजना,समता सहकार उद्योग मंदिर,समताज सहकार मिनी मॉल अशा विविध योजना व उपक्रम बघून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,जेष्ठ संचालक रामचंद्र बागरेचा,चांगदेव शिरोडे,जितुभाई शहा कचरू मोकळ,गुलशन होडे,संदीप कोयटे,निरव रावलिया संचालिका शोभा अशोक दरक,भरत अजमेरे,सहकार विभागाचे अभिजित पाटील,कोपरगाव तालुका सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ,अंतर्गत ऑडिटर स्वप्नील घन, राहाता तालुका फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे,राहाता येथील गाडेकर पतसंस्थेचे अध्यक्ष स्वाधीन गाडेकर,समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे अधिकारी,कोपरगाव, गांधी चौक शाखेचे शाखाधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
समता पतसंस्थेने तयार केलेल्या लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमच्या माध्यमातून ९९.६७ टक्के ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असून प्रत्येकी २५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना सुरक्षितता समता देत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.तसेच संस्थेचे एकूण कर्ज ५४७ कोटी रुपयांपर्यंतचे आहे त्यात कर्ज वाटपापैकी २२४ कोटी सोनेतारण कर्ज हे जगातील अतिसुरक्षित कर्ज आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”समता पतसंस्थेने महाराष्ट्रात आर्थिक स्थैर्य निर्माण केले असून त्यांच्या योजना व उपक्रम महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये लागू करण्यासाठी सहकार खाते पुढाकार घेईल.तसेच पतसंस्था चळवळीमध्ये संदीप कोयटे यांनी घेतलेल्या पुढाकाराप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर तरुणांनी ही त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी भारतातील सहकार क्षेत्रातील पहिले,’स्टार्ट अप सुधन गोल्ड लोन’चे ब्रँड जिंगलचे उद्घाटन ही सहकार मंत्री सावे,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी सहकार मंत्री यांचे स्वागत महाव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी केले तर उपस्थितांचा सत्कार संस्थेचे जेष्ठ संचालक रामचंद्र बागरेचा यांच्या हस्ते करण्यात आला.संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा सचिन भट्टड व ठेव प्रमुख संजय पारखे यांनी चित्रफितीच्या आधारे सादर केला आहे.उपस्थितांचे आभार भट्टड यांनी मानले आहे.