सहकार
“शेतकऱ्यांच्या,’…या आशुतोष दादाला जोडचं न्हाय…”
न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
ऊसाची एफ.आर.पी.वाढविली जाते हा निर्णय अतिशय स्वागतार्ह असून त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतो.परंतु ज्या वेळी ऊसाची एफआरपी वाढविली जाते त्यावेळी एम.एस.पी.अर्थात साखरेची विक्री किंमत देखील वाढविली पाहिजे अशी मागणी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.मात्र याला शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी हरकत घेतली असून याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होत असून याबाबत शेतकऱ्यांच्या या,”आशुतोष दादाला जोडचं न्हाय” अशी त्यांच्या प्रचार गीताची कोपरखळी लगावली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४/२५ या वर्षाच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन आशुतोष काळे व त्यांच्या धर्मपत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी सेक्रेटरी संदीप शिरसाठ,चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे,चिफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे,फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे,शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे,उद्योग समुहातील सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन,व्हा. चेअरमन,संचालक पदाधिकाऱ्यांसह सभासद,शेतकरी,कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मागील ५ वर्षाची आकडेवारी पहाता हंगाम २०२०-२१ मध्ये साखरेची एमएसपी रु.३,१०० प्रति क्विंटल तर ऊसाची एफ.आर.पी. ही रु.२,८५० प्र.मे.टन होती.तर चालू गाळप हंगामात एफ.आर.पी.रु.३,४०० प्र.मे.टन झाली आहे तर साखरेची विक्री किंमत अर्थात एम.एस.पी.रु.३१०० प्रति क्विंटल एवढीच आहे जी तीन वर्षापूर्वी होती.मागील पाच वर्षातील साखरेच्या किमान विक्री दरात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही.परंतु ऊसाच्या एफ.आर.पी.मध्ये मात्र रु.५५० प्र.मे.टन इतकी वाढ झालेली आहे.एफआरपी वाढली पाहिजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला पाहिजे यात दुमत नाही.परंतु ज्या वेळी एफआरपी मध्ये वाढ केली जाते त्यावेळी ती एफआरपी साखरेच्या दराशी निगडीत असावी.साखरेची विक्री किंमत अर्थात एम.एस.पी.वाढवावी याबाबत साखर संघ,ईस्मा (ISMA) यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला परंतु त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसून केंद्रीय अन्न मंत्रालयाने त्यावर तातडीने निर्णय घ्यावा व साखर उद्योगाला दिलासा द्यावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी शेवटी केली आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक वर्तमान कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले तर सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर उपाध्यक्ष शंकर चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने साखर हंगाम-२०२४-२५ (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी उसाला १०.२५% च्या मुलभूत वसुली दरासह ३४० रुपये प्रती क्विंटल रास्त आणि किफायतशीर भाव (एफ.आर.पी.) देण्यास मंजुरी दिली आहे.वसुलीमध्ये १०.२५% पुढील प्रत्येक ०.१% वाढीला ३.३२ रुपये प्रती क्विंटलचा प्रीमियम देण्यास तर वसुलीमधील घसरणीसाठी प्रत्येक ०.१% घसरणीला रास्त आणि किफायतशीर भावात ३.३२ रुपये प्रती क्विंटलची कपात करण्याला देखील या समितीने मंजुरी दिली असून हा भाव निव्वळ साखर उत्पादन करणाऱ्या साखर कारखानदारांनी ३,४०० तर उपपदार्थ निर्माण करणाऱ्या कारखानदरांनी तो प्रती टन दर ४,५०० ते ५,००० रुपये द्यायला हवा अशी मागणी केली आहे.मात्र वर्तमान कारखानदार शेतकऱ्यांना नडत असून याचा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे.गेल्या पाच वर्षात जैवइंधन क्षेत्र म्हणून इथेनॉलच्या वाढीमुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उत्पादन क्षेत्राला मोठा आधार मिळाला आहे.ऊस/साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवल्यामुळे तसेच जलद देयके,कमी खेळत्या भांडवलाची गरज यामुळे साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत झाली असताना शेतकऱ्यांना मात्र ऊस दराबाबत खेळवले जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष काळे यांनी शेवटी केला असून वर्तमान विधानसभेच्या त्यांच्याच निवडणूक प्रचार गीताचा संदर्भ देत,”शेतकऱ्यांच्या या…आशुतोष दादाला…जोडच न्हाय…”अशी कोपरखळी लगावली आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदार ऊस उत्पादकांना चांगले दर देत नाही या उलट राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ०४ हजार ५०० ते ५,००० रुपयांचा टनाला भाव देणे गरजेचे असताना नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदार मात्र अनेक उपपदार्थ निर्मिती करत असताना शेतकऱ्यांना वेड्यात काढत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी शेवटी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केला आहे.