सहकार
…या सहकारी साखर कारखान्यांच्या होणार वार्षिक सभा !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेला कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची उद्या शनिवार दि.२३ सप्टेंबर रोजी दुपारी ०२ वाजता कारखाना कार्यस्थळावर ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आ.अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असून संजीवनी सहकारी साखर काखान्याचे वार्षिक सभा अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि.२५ सप्टेंबर रोजी दुपारी ०२ वाजता असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.या प्रसंगी एकाच वेळी सर्वसाधारण सभा टाळल्या आहेत हे विशेष !
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील सहकारी साखर कारखाने साठच्या दशकाच्या प्रारंभी उभे राहिले.खाजगी कारखाने शेतकऱ्याच्या उसाला भाव देत नाही… असा कंठघोष करत या कारखान्याची उभारणी झाली होती.त्यासाठी तत्कालीन सहकार मंत्री धनंजय गाडगीळ यांनी त्यावेळी प्रवराचे विठ्ठलराव विखे यांना प्रोत्साहित केले होते.मात्र त्याआधी तत्कालीन पोहेगाव येथील शेतकरी नेते स्व.गणपतराव औताडे यांनी असा प्रयत्न केला होता.मात्र सुमारे ७५ हजारांचे समभाग जमा झाल्यानंतर पुढे त्यांना शेतकऱ्यांची योग्य साथ न मिळाल्याने त्यांना तो प्रयत्न अर्ध्यावर सोडून ते समभाग प्रवरा कडे वर्ग करून प्रवराच्या उभारणीस सिहांचा वाटा उचलला होता.त्यांना त्यावेळी संस्थापक संचालक यावरच समाधान मानावे लागले होते.त्यांचा,’आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना संस्थापक’ हा किताब थोडक्यात हुकला होता.मात्र आज त्यांचे नाव वर्तमान पुढाऱ्यांनी सहकाराच्या पटलावरून जवळपास पुसून टाकले असल्याचे दिसत आहे.नंतर सत्तेत आलेल्या नेत्यांनी या सहकारावर मांड ठोकून ऊस उत्पादक शेतकरी वाऱ्यावर सोडून दिला आहे.या सहकाराचे सर्वत्र राज्यभर वारे फिरले आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर आधुनिक संस्थानिक उभे राहिले आहे.शिक्षण संस्था,जोडून आता विविध उपपदार्थ आदींचा महापूर आला आहे.त्यातून हि मंडळी संतुष्ट झाली नाही.ऊस पुरवणारा शेतकरी मात्र भिकेला लागला आहे.त्यांना भिकेला लावून हि सोवळी-ओवळी राजकीय मंडळी पुन्हा एकदा खाजगीकरणाच्या प्रेमात पडली आहे हे विशेष !
वर्तमानात शेतकऱ्यांच्या उसातून कपात केलेल्या पैशावर उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्थात शेतकऱ्यांकडूनच देणग्या उपटण्याचा नवीन गोरख धंदा निर्माण केला आहे.आगामी काळात आता सहकारास मोठे भविष्य दिसत नाही.त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुन्हा एकदा खाजगी साखर कारखादारीस किंवा खाजगी गुऱ्हाळाना परवानगी देण्याची गरज निर्माण झाली आहे.खुल्या आर्थिक धोरणात राज्याची शेतकरी संघटना मागणी करत असलेल्या सहकारी कारखानदारीत पंचवीस कि.मी.हवाई अंतराची अट तातडीने रद्द करण्याची गरज निर्माण झाली आहे.त्यामुळे शेतकरी स्वतः पिकवून प्रक्रिया करून त्यातून आपले कल्याण करू शकेल.
अ.नगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यात वर्तमानात दुय्यम पद मिळण्याकडे वेगळे काही कार्यकर्त्यांच्या हाती काही पडत नाही.केवळ ‘सयाजीराव’ म्हणून मिरवून सध्या त्याची समाजात अप्रतिष्ठा होत असल्याचे दिसून येत आहे.’कुऱ्हाडीचा दांडा गोतीस काळ’ ठरवून व कुठलाही अधिकार नसलेल्या संचालकास पाहून गावागावातील लोक आपल्या कपाळावर आठ्या घालत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपली प्रतिष्ठा पुन्हा पुनर्रस्थापित करायची असल्यास आगामी काळात सहकाराची व्याख्या बदलावी लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.सहकारात या नेत्यांची आता तिसरी पिढी कार्यान्वित झाली असली तरी वेगळे काहीही घडण्याची स्थिती नाही.
याबाबत राज्याला पुन्हा एकदा शेतकरी विकासाला दिशा देण्यासाठी शेतकऱ्यांना उठाव करण्याची वेळ आली असल्याचे मानले जात आहे.याबाबत मध्यन्तरी सन-२००० दरम्यान काही व्यक्तींनी याबाबत जनजागृती केली मात्र त्यांना दीर्घ दृष्टी नसल्याने तो प्रयत्न निष्फळ ठरला होता.आता आगामी काळात शेतकरी केवळ नाश्ता पाकिटे घेणार की वेगळे काही निर्णय घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.त्यामुळे तालुक्यातील दोन्ही सभांकडे तालुक्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून आहे.