समाजकल्याण विभाग
तृतीयपंथी चालविणारे पहिलं शेळीपालन केंद्र…या ठिकाणी सुरू !

न्युजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या शासकीय मदतीच्या व सप्रेम सामाजिक संस्थेच्या पाठबळामुळे श्रीरामपूर येथील तृतीयपंथी समाजसेवा संस्थेने राहाता तालुक्यातील चितळी येथे तृतीयपंथीयांच्यावतीने चालविण्यात येणारा राज्यातील पहिला शेळीपालन प्रकल्प साकार केला आहे.या प्रकल्पामुळे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे,अशी भावना तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या सचिव दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केली.

तृतीयपंथी समाजसेवा संस्थेने चितळी शिवारात तीन एकर जागा खरेदी केली असून,समाजकल्याण विभागाच्या पाच लाख रुपयांच्या शासकीय मदतीतून साधारणतः दोन हजार चौरस फूट क्षेत्रात पशुपालन शेड उभारण्यात आला आहे.सध्या या केंद्रात १६ बकऱ्यांचं पालन केलं जात आहे.
तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण या योजनेंतर्गत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय शेळीपालन केंद्राचे उद्घाटन समाजकल्याण सहायक आयुक्त प्रविण कोरगंटीवार व श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील यांच्या हस्ते चितळी येथे पार पडलं आहे.

या वेळी श्री.कोरगंटीवार म्हणाले,“समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे.तृतीयपंथीयांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून शेळीपालन व्यवसायास सुरुवात केली,ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे.शेळीपालनासारखा पारंपरिक व उत्पन्नक्षम व्यवसाय आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवतो.या मार्गावर चालल्यामुळे तृतीयपंथीयांना आर्थिक स्थैर्याबरोबर आत्मसन्मानही मिळणार आहे.

श्री.सावंत पाटील म्हणाले, “तृतीयपंथीयांच्या घरकुल व स्मशानभूमीसाठी शिरसगाव येथे तीन एकर जागा मंजूर करण्यात आली असून ती जागा लवकरच त्यांच्या नावावर केली जाणार आहे.तृतीयपंथीयांच्या पाठीशी शासन नेहमीच खंबीरपणे उभं आहे.यासाठी तृतीयपंथी समुदायाने एक पाऊल पुढे टाकून शासनासोबत काम करण्याची गरज आहे.

या वेळी तालुका कृषी अधिकारी पंडीत वाघेरे,डॉ.प्रकाश गायकवाड,पिंकी शेख व दिशा शेख यांनीही आपली मनोगतं व्यक्त केली आहे.सदर कार्यक्रमात राहत रेशम पवार,अनु नुरजहॉ शेख,सायली किरणगुरू सोनवणे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी असलेली तृतीयपंथीय ओळखपत्रं वाटप करण्यात आली.
यावेळी श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,गटविकास अधिकारी प्रविण सिनारे,मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप,राहाता गटविकास अधिकारी पंडीत वाघेरे,तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे,नायब तहसीलदार बाळासाहेब मुळे,चितळीचे सरपंच नारायणराव कदम,तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या अध्यक्षा पिंकी शेख,उपाध्यक्ष तमन्ना शेख,सचिव दिशा शेख व सप्रेम संस्थेचे डॉ.प्रकाश गायकवाड तसेच चितळी ग्रामस्थ,तृतीयपंथीय समुदायातील लोक उपस्थित होते.
असं आहे पशुपालन केंद्र-
तृतीयपंथी समाजसेवा संस्थेने चितळी शिवारात तीन एकर जागा खरेदी केली असून,समाजकल्याण विभागाच्या पाच लाख रुपयांच्या शासकीय मदतीतून साधारणतः दोन हजार चौरस फूट क्षेत्रात पशुपालन शेड उभारण्यात आला आहे.सध्या या केंद्रात १६ बकऱ्यांचं पालन केलं जात आहे.पशुपालन करणाऱ्या तृतीयपंथीयांच्या निवाऱ्यासाठी शेड शेजारीच एक हजार चौरस फूट क्षेत्रात निवासस्थानाचे बांधकाम सुरू आहे.या जागेत निवासस्थान,कूपनलिका व तारेच्या कुंपणासाठी सप्रेम सामाजिक संस्थेने आर्थिक मदत केली आहे.