सण-उत्सव
कोपरगाव येथे यावर्षी स्त्री शक्तीचा जागर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने मंडळाच्या सालाबाद प्रमाणे याहीवर्षी सोमवार (दि.२६) ते बुधवार (दि.५ ऑक्टोबर) पर्यंत “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.
शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे.हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. परंतु मागील दोन वर्ष संपूर्ण विश्वावर जीवघेणी कोरोना महामारी असल्यामुळे सर्व सण-उत्सव साजरे करण्यावर सर्वसामान्य नागरिकांना मर्यादा होत्या. त्यामुळे मागील दोन वर्ष सर्व सण अतिशय साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. त्यामूळे मागील दोन वर्ष हा नवरात्र उत्सव ऑनलाईन पद्धतीने (डिजिटल नवरात्र उत्सव) साजरा करण्यात आला होता. मात्र मागील काही महिन्यांपासून कोरोना महामारी बऱ्याच अंशी आटोक्यात आली आहे. त्यामुळे सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या (दि.२६) पासून सुरु होणारा नवरात्र उत्सव देखील साजरा केला जाणार असल्याचे पुष्पाताई काळे यांनी सांगितले आहे.
आज पासून सुरु होणा-या नवरात्र उत्सवानिमित्त महिला भगिनींसाठी योग स्वास्थ्य शिबीर तसेच अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पाक कला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, उखाणे स्पर्धा, केक सजावट स्पर्धा, गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या देवीच्या विविध दागिन्यांची स्पर्धा तसेच महिलांचा सर्वात आवडता ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले असून प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या माध्यमातून महिला भगिनींना पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवस कुंकुमआर्चन, देवीचे पाठ, भजन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहे. तरी सदर कार्यक्रमांचा महिला भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी केले आहे.