सण-उत्सव
३१ डिसेंबर निमित्त…या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने नाताळ सुट्टी,सन २०२३ वर्षाला निरोप व सन २०२४ नविन वर्षाचे स्वागता निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाची तयारी पुर्ण झाली असुन यानिमित्ताने रविवार दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली आहे.
सदर प्रसंगी श्री.हुलवळे म्हणाले की,”दरवर्षी नाताळ सुट्टी,चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.संस्थानकडे शिर्डी महोत्सवाकरीता वेगवगळया ठिकाणांहुन येणा-या १६४ पालख्यांनी नोंदणी केलेली आहे.या येणा-या साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरात १२ हजार २५० चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आलेले आहे.तसेच अतिरिक्त निवासव्यवस्थेसाठी साईधर्मशाळा व भक्तनिवासस्थान (५०० रुम) या ठिकाणी ३४ हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आलेले आहे.तसेच साई आश्रम भक्तनिवासस्थान येथे टेंसाईल फॅब्रीक शेड मध्ये १९ हजार ५०० चौ.फुट अतिरीक्त निवासव्यवस्था करण्यात आलेली आहे.
साईभक्तांकरीता सुमारे दररोज साधारण १५ क्विंटलचे ७० हजार मोफत बुंदी प्रसाद पाकिटे व विक्रीसाठी दररोज साधारण ३० क्विंटलचे १ लाख ५० हजार नग मोतीचूर लाडू प्रसाद बनविण्याचे नियोजन असून उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी श्री साईनाथ मंगल कार्यालय, व्दारकामाई समोरील खुले नाट्यगृह,मारुती मंदिराशेजारी साईकॉम्प्लेक्स, गेट नंबर ०१,श्री साईप्रसादालय,सेवाधाम इमारत,शिर्डी विमानतळ व सर्व निवासस्थाने या ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आलेले आहेत.तसेच आवश्यकता भासल्यास अतिरिक्त लाडू विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.तसेच या कालावधीत श्री साई प्रसादालयात दररोज अंदाजे साधारण ६० हजाराहून अधिक साईभक्त प्रसाद भोजन घेतील असे नियोजन करणेत आलेले आहे.
दरम्यान दर्शनरांगेत व परिसरात भक्तांना चहा,कॉफी व दुध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्प्लेक्स,साईआश्रम, धर्मशाळा,भक्तनिवासस्थान (५०० रुम),व्दारावती भक्तनिवासस्थान तसेच साई उद्यान इमारत परिसर,नविन दर्शन रांग इमारत,शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत चहा व कॉफीची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे.
याकालावधीत भक्तांच्या सोयीसाठी दर्शनरांग,मंदिर परिसर,साईआश्रम व नविन श्री साईप्रसादालय आदि ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात येणार असुन तातडीचे सेवेसाठी मंदिर परिसरात,नविन भक्तनिवासस्थान, धर्मशाळा व श्री साईप्रसादालय येथे रुग्णवाहीका तैनात ठेवण्यात येणार आहे.तसेच सुरक्षेकामी पोलिस निरिक्षक, पोलिस उपनिरिक्षक,पोलिस कर्मचारी,एक शिघ्र कृतीदल पथक,एक बॉम्ब शोधक पथक तैनात असून बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिस निरिक्षक, सहाय्यक पोलिस निरिक्षक,पुरुष पोलिस कर्मचारी व महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येवून याव्यतिरिक्त संस्थानचे पोलिस निरिक्षक व सुरक्षा कर्मचारी असे एकुण १००० हून अधिक कर्मचारी कार्यरत राहणार आहे.तसेच मंदिर व निवासस्थान आणि श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी येणे-जाणे करीता जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
रविवार दि. ३१ डिसेंबर २०२३ या दिवशी समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्यामुळे रात्रौ १० वाजता होणारी शेजारती व दिनांक ०१ जानेवारी रोजी पहाटेची ०५.१५ वाजता होणारी काकड आरती होणार नाही. शिर्डी महोत्सवा निमित्ताने रविवार दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून दुपारी ०२.०० ते ०३.४५ यावेळेत श्री साई स्वरांजली संगीत संच,नागपुर,दुपारी ०४ ते ०५.३० यावेळेत लाइफ लाइन सर्विस सोसा.,सागर,मध्यप्रदेश,सायं ०६.१५ ते ०८.०० यावेळेत श्री अजय बी.मोरे,मिरा रोड, ठाणे व रात्रौ ०८ ते ०९.४५ यावेळेत श्री जगदिश मारुती पाटील,ठाणे (मुंबई) आदी कलाकारांचे साईभजने व भक्ती गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.हे सर्व कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर होणार असल्याचे सांगुन शिर्डी महोत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या साईभजन संध्या कार्यक्रमांचा जास्तीत-जास्त श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही श्री.हुलवळे यांनी शेवटी केले आहे.