विशेष दिन
राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणास्थान-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अराजकतेच्या पार्श्वभूमीवर मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या व विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफून स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणापीठ असल्याचे प्रतिपादन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.
राजमाता जिजाबाई शहाजी भोसले ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.त्यांना राजमाता,राष्ट्रमाता,जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते.सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते.जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.डिसेंबर इ.स.१६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.जिजाबाई त्यांच्या सद्गुण,शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या.त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या.त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान होत्या.त्यांच्या स्मृती दिनानिमित्त कोपरगाव शहरातील राजमाता जिजाऊ उद्यानातील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकास आ.आशुतोष काळे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,शहराध्यक्ष सुनील गंगूले,बाळासाहेब आढाव,प्रशांत वाबळे,सुनील शिलेदार अन्य पदाधिकारी माजी नगरसेवक,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”राजमाता जिजाऊ पराक्रमी व धैर्यशील होत्या त्याचबरोबर समान न्याय देण्याची वृत्ती व अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस त्यांच्याकडे होते.स्वराज्य आणि सुराज्याची निर्मिती करून धर्माला लौकिक कसा मिळवून द्यायचा हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रुजवून राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली.राजमाता जिजाऊंमुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले व त्यांच्या मागर्दर्शनाखाली व प्रेरणेतूनच महाराष्ट्राच्या भूमीत रयतेचे स्वराज्य स्थापन झाले असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.