विशेष दिन
महिलांनी गुणवत्ता व कर्तुत्वाने मोठे होण्याची गरज-प्राचार्या डॉ.पाटील
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
समाजात महिलांची जबाबदारी मोठी असुन गुणवत्ता व कर्तुत्वाने आपण समाजात वावरले पाहीजे.शिक्षणाची कास धरून महिला सबलीकरण होण्याबरोबरच स्त्री-पुरुष समानतेसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन मालेगांव येथील श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रजनी पाटील यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
दरवर्षी ०८ मार्च रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने ०८ मार्च १९७५ रोजी महिला दिन साजरा करण्याची सुरुवात केली होती.हा दिवस खास महिलांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.कोपरगावात तो श्री के.जे.सोमैय्या महाविद्यालयात महिला सबलीकरण कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या वतीने
मोठया उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,प्रो.(डॉ.) विजय ठाणगे,महाविद्यालयातील महिला प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा.डॉ.विजय ठाणगे म्हणाले कि,” आजच्या काळात पुरुषांच्या बरोबरीने महिला विविध क्षेत्रात निर्भयपणे काम करत असून महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी समाजप्रबोधनाची,जनजागृतीची व सहकार्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.
सदर महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात सर्व महिला प्राध्यापक,यशस्वी विद्यार्थिनी व महाविद्यालयात कार्यरत असलेल्या सर्व महिला कर्मचारी यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सबलीकरण कक्षाच्या प्रमुख डॉ.नीता शिंदे यांनी केले आहे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मयुरी काळे यांनी तर आभार प्रा.वर्षा आहेर यांनी मानले आहे.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.सुरेखा भिंगारदिवे,प्रा.जे.एस.मोरे,डॉ.संजय दवंगे यांनी परिश्रम घेतले होते.