विधी व न्याय विभाग
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात ‘बचाव पक्ष सहाय्य यंत्रणे’साठी पदभरती
न्यूजसेवा
अ.नगर-(प्रतिनिधी)
जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरणाकडून मिळणारी मोफत विधी सेवा सहाय्य ही सुविधा सक्षम करण्यासाठी ‘बचाव पक्ष साह्य विधीज्ञ यंत्रणा’ अस्तित्वात येत आहे.बचाव पक्षाची /आरोपीची बाजू जास्त प्रभावीपणे मांडण्यासाठी ही यंत्रणा पूर्ण वेळ कार्यरत राहणार आहे. यामध्ये मुख्य विधी सहाय्य बचाव पक्ष विधिज्ञ,उप मुख्य विधी सहाय्य बचाव पक्ष विधिज्ञ,सहाय्यक विधी सहाय्य बचाव पक्ष विधीज्ञ यांचा समावेश असणार आहे.या पदभरतीच्या प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १५ सप्टेंबर अशी असून त्यासाठी निवृत्त न्यायाधीश,निवृत्त सरकारी अभियोक्ता,विधीज्ञ हे पात्र आहेत.अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती भाग्यश्री का.पाटील यांनी दिली.
“अ.नगर जिल्हा न्यायालयाच्या मुख्य इमारतीमध्ये विधी सेवा सहाय्य बचाव पक्ष यंत्रणेचे कार्यालय लवकरच सुरू होणार आहे.त्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर वे.यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयाच्या निर्मितीची प्रक्रिया चालू आहे”-श्रीमती भाग्यश्री पाटील,सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांनी बचाव पक्ष यंत्रणा सक्षम करण्यासाठी अभियोग पक्षाला साजेशा व स्पर्धात्मक अशा स्वतंत्र यंत्रणेची निर्मिती केलेली आहे.विधी सेवा प्राधिकरणाकडे सहाय्यासाठी येणारी प्रकरणे वगळता इतर प्रकरणे हाताळता येणार नाही.तसेच वैयक्तिक रित्या कोणत्याही प्रकरणांमध्ये विधीज्ञ म्हणून बाजू मांडता येणार नाही किंवा खाजगीरित्या वकिली करता येणार नाही.
बचाव पक्ष यंत्रणा लोकाभिमुख राहण्यासाठी व लोकांची सोय होण्यासाठी सदरचे कार्यालय जिल्हा न्यायालयाच्या मुख्य इमारतीत तळमजल्यावर सुरू करण्यात येणार आहे. समाजातील दुर्बल दुर्लक्षित, गरजू,गरीब व्यक्तींना पैशाअभावी सर्वंकष,गुणवत्तापूर्ण,विधी सहाय्यला वंचित राहू नयेत.त्यांची बाजू न्यायालयासमोर परिपूर्णरित्या व कायद्यातील सर्व बारकाव्यांसह मांडली जावी. हा त्या मागचा हेतू आहे.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अंतर्गत सदरची यंत्रणा लवकरच कार्यान्वित होणार आहे.