जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
वन व पर्यावरण

आगामी काळात मानव-बिबट्या संघर्ष वाढणार !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
 
   कोपरगाव मतदार संघातील टाकळी गावात बुधवार दि.०५ नोव्हेंबर रोजी बिबट्याने ऊस तोडणी करणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर केलेल्या हल्ल्यात या चिमकुलीला आपला जीव गमवावा लागला आहे.ही घटना धक्कादायक असून या प्रश्नी बिबट्याच्या बंडोबस्त करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी यांचेकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे खरी,पण खरच बिबट्याचा बंदोबस्त होईल ?

 

  दरम्यान याबाबत प्रभारी वनाअधिकारी निलेश रोडे यांचेशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी टाकळी ते कोपरगाव शिवराच्या मध्ये सदर बिबट्या पकडण्यासाठी राहुरी,अकोले आदी ठिकाणांहून आणून एकूण सात पिंजरे लावले असून त्याला लवकरच जेरबंद केले जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

   गत ऑगस्ट महिन्यात कोपरगाव शहराच्या भर वस्तीत धुमाकूळ घालणारा मादी बिबट्या मंगळवारी पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते.त्यानंतर कोपरगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असताना काल पुन्हा एकदा बिबट्याच्या तावडीत एक लहान बालिका सापडली असून त्यात तिचा करून अंत झाला आहे.सदर घटना ऐन नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा तोंडावर घडल्याने या घटनेचा जास्त गवगवा केला जात आहे.एरवी शिर्डी विमानतळाच्या शेजारी एका रात्रीत आई,वडील,आणि तरणाबांड मुलगा गतवर्षी मृत्यूमुखी पडल.पण कोणाही नेत्याला आजतागायत त्या ठिकाणी जाता आले नाही.कारण त्यावेळी जवळ कोणतीही निवडणूक नव्हती.आज निवडणुका तोंडावर आल्याने प्रत्येक जण त्याचे राजकीय भांडवल करताना दिसत असून अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेताना दिसून येत आहे.असो सदर घटना अत्यंत वाईट आहेच यात कोणाच्याही मनात शंका येण्याचे कारण नाही.पण अशा एखाद्या घटनेचे राजकीयकरण कसे करायचे याचे गुण कोपरगाव तालुक्यातील नेत्यांकडून शिकून घेतले पाहिजे एवढे मात्र नक्की.येथील मतदारांना रोज अद्याप पिण्याचे पाणी भेटत नाही.चालायला रस्ता नीट नाही.नगर मनमाड आणि तळेगाव  मार्गे संगमनेर रस्त्यावर रोज किती बळी जात आहे याची मोजदाद नाही.डांबरी रस्त्याचे खड्डे बुजविण्यासाठी मुरूम आणि माती वापरली जाते.गर्दीच्या काळात शिर्डीसाठी महत्वाचा ठरणारा रस्ता झगडे फाटा ते वडगाव पान रस्ता,नाशिक वरून शिर्डी येणारा साई भक्तांसाठी सर्वात जवळचा ठरणारा रस्त्याला एक रुपया मिळत नाही.आणि कोपरगाव तालुक्यातील सर्व पक्षीय नेते एकमेकाला सांभाळून घ्यायच्या आणि जुन्या काळे आणि कोल्हे प्रमाणे प्रेमाने राहायच्या आणाभाका घेतात याचा अर्थ काय ? याचा अर्थ एकच जनतेला कोणीही वाली उरला नाही एवढेच.याबाबत जनतेचा कैवार घेऊन कोणालाही जाब विचारावा वाटत नाही.

दरम्यान मृत मुलीच्या पालकांना अथवा नातेवाईकांना याबाबत किती नुकसान भरपाई भेटेल ? या प्रश्नावर त्यांनी प्रथम त्या कुटुंबाला आधी दहा लाख रुपयांची मदत भेटणार असून त्यानंतर पंधरा लाख रुपये असे एकूण पंचवीस लाखांची भरपाई मिळू शकेल अशी माहिती वनाधिकारी निलेश रोडे यांनी दिली आहे.

   शेती पाण्याची यंदा चिंता मिटली हा भाग आज सोडा पण शेतीची वाट लागली आहे.वीज पावसाला पाहून तासभर आधी पळून जाते.कमी दाबाने वीज येत असल्याने किती शेती पंपांचे नुकसान होत आहे.याकडे पाहायला कोणालाही वेळ नाही.विधानसभे पूर्वी उद्घाटन केलेले शहा- पंचाळे येथील उपकेंद्र अद्याप सुरू नाही.परिणामी अनेक शेतकरी आता आपली शंभर वर्षापूर्वी खरेदी केलेली शेती विकून पळून जात आहे.

   बिबट्या हा हिंस्र प्राणी आहे.आणि तो वाळवंट,जंगल,डोंगर आणि उसाच्या शेतात स्वतःला लपवू शकतो आणि आहे त्या निसर्गाशी जुळवून घेतो.आता तर तो उसाच्या शेतात.मका पिकात सहज वावरू शकतो.आणि आता त्याला शहरातही मुबलक खाद्य मिळू शकते याची कल्पना एव्हाना आली आहे.परिणामस्वरूप तो आता लीलया अतिक्रमण करू लागला आहे.त्याला कुत्री आणि डुकरे हे त्याचे आवडते खाद्य त्याला सहज उपलब्ध होत आहे.परिणामी तो आजही काळाच्या ओघात टिकून आहे.अन्य प्राण्यांना काळाच्या ओघात जुळवून घेता आले नाही पर्यायाने ती आज नष्ट झाले आहे.आणि हो मानवाने त्याच्या जंगलावर अतिक्रमण केल्याने त्याने तरी कोठे जायचे याचे उत्तर आज कोणाकडे आहे.एखाद्दोन घटनांनी आरडाओरडा झाला आणि वन विभागावर आपण दबाव आणला तर त्याला ते मारू शकत नाही.ते पिंजरा लावणार आणि अन्य या नाही तर त्या  तालुक्यात सोडून देणार.तेथे गेल्यावर चार दोन दिवसांत त्याचा वावर नागरिकांच्या लक्षात येतो आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू होते.वन विभागाच्या नावाने ओरड सुरू होते.हे असेच चालणार आहे.त्यामुळे पूर्वी कधीतरी बातमी वाघाची ऐकायला,वाचायला मिळायची.आता वाघ कमी आणि बिबटे जास्त अशी स्थिती आहे.कारण त्यांचा प्रजनन दर वाघापेक्षा जास्त आहे हे उघड आहे.त्यामुळे त्यांची संख्या वाढली आहे.संख्या वाढली म्हणजे उपद्रव वाढणार हे ओघाने आलेच.त्यामुळे तक्रार अजित पवार यांचे कडे केली काय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली काय काहीही फरक पडणार नाही आता आपल्याला बिबट्या आणि वघांब्रोबर राहायचे आहे हे एकदा स्वीकारले पाहिजे म्हणजे सगळे सोपे होईल.पूर्वी नव्हते का आपले पूर्वज वाघ,लांडगे,बिबटे,अस्वले,रान कुत्री आदी समवेत राहत आता आपण ही तयारी करायला हवी.

   बिबट्याच्या नागरी क्षेत्रात वावराची समस्या राज्यात सर्वाधिक अहिल्यानगर जिल्ह्यात असल्याचे  मानले जात आहे.महिन्यातील किमान १५ दिवस बिबट्याच्या वावराच्या घटना समोर येत असतात.जिल्ह्यात सुमारे साडे पाचशे ते सहाशे बिबटे असल्याचा वनखात्याचा अंदाज आहे.स्थानिक जनतेच्या म्हणण्यानुसार तो अधिक आहे.वन्यजीव व्यवस्थापनासाठी खास सुविधा मोठ्या प्रमाणात उदासीनता असल्याने बिबट्यांची समस्या अधिक उग्र झाली आहे.संपूर्ण जिल्हा बिबट्याने व्यापला जिल्ह्यात अकोले,संगमनेर,पारनेर,राहुरी,नगर,नेवासे,श्रीरामपूर, राहाता,कोपरगाव,श्रीगोंदे या ऊसबहुल क्षेत्र असलेल्या तालुक्यांत बिबट्यांचा वावर मोठा आहे.कर्जत,जामखेड,शेवगाव पाथर्डी तालुक्यात बिबट्याने अनेकदा अस्तित्व दाखवून दिले आहे.अलीकडील काळात बिबट्यांच्या हल्ल्यांचे केंद्र संगमनेर,श्रीरामपूर,पारनेर आदी तालुक्यांत सरकले आहे.पारनेर तालुक्यातही,विशेषतः कान्हूर पठार,गोरेगाव या भागात बिबट्यांचे अस्तित्व उघड होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.हा भाग तसा डोगराळ,ओसाड अधून-मधून असलेल्या तुरळक विहीर बागायती क्षेत्र असलेला आहे.त्यामुळे या भागात बिबट्याचे अस्तित्व आश्चर्यकारक कोड्यात टाकणारे आहे.मानवावर हल्ले करण्याच्या घटना वाढत असल्याने मानव-बिबट्या संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षभरात बिबट्याच्या मानवावरील हल्ल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.मात्र त्यातील कोपरगाव येथे एका ऊस तोड मजुराच्या मुलींच्या मृत्यूने त्यांचे गांभीर्य वाढले आहे इतकेच.

   दरम्यान याबाबत वन अधिकारी निलेश रोडे यांचेशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी टाकळी ते कोपरगाव शिवराच्या मध्ये सदर बिबट्या पकडण्यासाठी एकूण सात पिंजरे लावले असून त्याला लवकरच जेरबंद केले जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.या मुलीच्या नातेवाईकांना याबाबत किती नुकसान भरपाई भेटेल ? या प्रश्नावर त्यांनी प्रथम त्या कुटुंबाला आधी दहा लाख रुपयांची मदत भेटणार असून त्यानंतर पंधरा लाख रुपये असे एकूण पंचवीस लाखांची भरपाई मिळू शकेल अशी माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close