वन व पर्यावरण
…या संस्थेचा ३.५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी )
कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आत्मा मालिक ध्यानपिठाच्या वतीने सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य क्षेत्रात भरीवपणे कार्य केले जाते. पर्यावरणाचे संतुलन राखण्याची जबाबदारी आज प्रत्येक नागरिकाची आहे . पर्यावरणाचे संतुलनासाठी अधिकाधिक झाडे लागवड करून संगोपन करणे हा सोपा उपाय आहे.त्यासाठीच आत्मा मालिक ज्ञानपीठाने येत्या वर्षात ३.५ लाख वृक्ष लागवडी बरोबरच संगोपनाचा संकल्प ध्यानयोग मिशन आयोजित गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर सोडला आहे असे यावेळी ध्यानयोग मिशनचे प्रमुख ज्येष्ठ संत परमानंद महाराज यांनी सांगितले.
शुद्ध पर्यावरण निर्मितीसाठी आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने “आत्मतरू प्रसाद” या उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक संकुलाच्या सर्व विद्यार्थी,कर्मचारी यांचे बरोबरच सर्व भाविकांच्या माध्यमातून या वर्षात ३.५ लाख वृक्ष लागवडीचा उद्दिष्ट समोर ठेवले आहे. गुरुपौर्णिमा उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाला सद्गुरु प्रसाद म्हणून एक रोपटे वितरित करण्यात येत आहे.भाविकांना सुमारे २१ हजार रोपटयांचे वाटप उत्सव कालावधीत करण्यात येत आहे.
“आत्मतरू प्रसाद” परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या उपस्थितीत दर्शन रांगेतील प्रथम पाच भाविकांना ध्यानपिठाचे ज्येष्ठ संत परमानंद महाराज,संत निजानंद महाराज,संत विवेकानंद महाराज,अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,उपाध्यक्ष भगवान दौंड,सरचिटणीस हनुमंत भोंगळे,विश्वस्त विष्णुपंत पवार,प्रभाकर जमधडे,बाळासाहेब गोरडे, प्रकाश गिरमे,प्रकाश भट,उमेश जाधव,आबासाहेब थोरात,विठ्ठलराव होन,उदय शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे !…..या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे सर्व भाविकांनी झाडाचे महत्व लक्षात घेवून आपापल्या घरी शक्य तेवढी झाडे लावावी.तसेच प्रत्येक सत्संग मंडळांनी आपल्या गावात,प्रभागात झाडे लावून परमपूज्य आत्मा मालिक माऊलींनी केलेल्या संकल्प पूर्तीसाठी तन मनाने सहभागी व्हावे.‘एक झाड लावा आणि सर्वांसाठी उज्वल आरोग्यदायी भविष्य घडवा’ असा नारा यावेळी त्यांनी दिला. तसेच प्रत्येकाने या ‘आत्मतरू’ उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे
आषाढी एकादशी पासून “आत्मा मालिक गुरुपौर्णिमा महोत्सवास” सुरुवात झालेली असून हजारो भाविक या उत्सवास सहभागी होऊन परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या दर्शन भेटीचा व महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.तरी जास्तीत जास्त भाविकांनी गुरुपौर्णिमा उत्सवास सहभागी व्हावे असे आवाहान ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे