वन्य जीव
बिबट्याचा मेंढ्यांवर हल्ला,एक जखमी

न्युजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
संवत्सर परिसरातील लक्ष्मणवाडी भागात एक महिन्यापूर्वी बिबट्याचे दर्शन होऊन त्या भागातील अनेक कुत्र्यांना ठार करुन त्यांचा फडशा पाडल्याच्या घटनेला एक महिना उलटत नाही तोच आज पुन्हा एकदा त्याने आपले स्वरूप दाखवले असून धार्मिक आस्थेचे प्रतीक असलेल्या बाळू मामाच्या मेंढ्यावर हल्ला चढवला असल्याचे निदर्शनास आले आहे.मात्र वेळीच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतल्याने सदर मेंढीचा जीव वाचला आहे.

दरम्यान या बिबट्याच्या घटनेने दहिगाव बोलका,पढेगाव,कासली,भोजडे,कान्हेगाव परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी संवत्सर ग्रामपंचायत उपसरपंच विवेक परजणे यांनी केली आहे.
संवत्सर गांवचा परीसर आठ ते नऊ वाड्या वस्त्यांनी विस्तारलेला आहे.परिसरात ऊस व मका पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.याचाच फायदा घेऊन बिबटे रात्रंदिवस आता मानवी वाड्या वस्त्यांमध्ये संचार करु लागले आहेत.उन्हाळ्याचे दिवस असल्याने जंगल भागात खाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची सोय राहिली नसल्याने जंगली प्राण्यांचा आता पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांमधून वावर मोठ्या प्रमाणावर सुरु झालेला आहे.एप्रिल महिन्याच्या प्रारंभी सलग दोन दिवस लक्ष्मणवाडी (पढेगांव चौकी) भागात प्रतशील शेतकरी बापुसाहेब लक्ष्मणराव परजणे व सूर्यभान लक्ष्मणराव परजणे यांच्या वस्तीजवळ रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले.कुत्र्याला ठार करुन त्याला फस्त केले होते.त्यानंतर हा बिबट्या दिसला नव्हता मात्र आज दुपारी दोनच्या सुमारास त्याने बबनराव बारहाते यांच्या शेतात आपले मूळ स्वरूप दाखवले आहे.
यात संवत्सर शिवारात संत बाळू मामांचे मेंढरे आले आहे.त्याठिकाणी भाविकांची दर्शनासाठी आणि महप्रसादासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे.त्याला ही चांगली संधी आली असावी असे समजून त्याने मेंढपाळांचे लक्ष चुकवून मेंढ्यावर हल्ला चढवला होता.मात्र उपस्थित भाविकांचे त्या घटनेवर लक्ष गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे.त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतल्याने त्याने धूम ठोकली आहे.मात्र एका मेंढीला त्याने गळ्याला आपले दात लावून जखमी केले आहे.याबाबत कोपरगाव वन विभागाने दखल घेऊन पाळणा लावावा व या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी उपसरपंच विवेक परजणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.
दरम्यान या घटनेने दहिगाव बोलका,पढेगाव,कासली,भोजडे,कान्हेगाव परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.