जाहिरात-9423439946
राज्य विधीमंडळ कामकाज

नाशिक प्रमाणे..या प्राचीन शहराला निधी द्या- मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहराचे महत्व प्राचीन असून देव दानव युद्धापासुन ते आजतागायत आहे.आता आगामी वर्षात सिंहस्थ पर्वणी येत आहे.नाशिक आणि नजीकच्या तीर्थक्षेत्रांना राज्य आणि केंद्र सरकारने जवळपास वीस हजार कोटींची तरतूद केली आहे.मात्र कोपरगाव शहराला डावलले असल्याचे आरोप करत कोपरगाव शहरातील विविध प्राचीन मंदिरांच्या जीर्णोधारासाठी निधी द्या अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनांत केली आहे.

  

  दरम्यान या मागणीत शिर्डी येथील साई मंदिरातील विविध उत्सव काळात होणाऱ्या गर्दीच्या काळात अवजड वाहनातून ज्या भागातून गेली वीस वर्षे दुष्काळी भागातून वळवली जाते त्या झगडे फाटा ते वडगाव पान आणि शिर्डीसाठी मुंबई,गुजरात येथून येणाऱ्या साई पालख्यांसाठी सर्वात जवळचा ठरणारा वावी -जवळके-डोऱ्हाळे-शिर्डी या पालखी मार्गाला एक कवडीही मिळाली नाही यावर मात्र प्रकाशझोत टाकला नसल्याचे दुष्काळी भागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

   नाशिकला राज्याचे एक प्रमुख आर्थिक केंद्र म्हणून विकसित केले जाणार असून नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा तयारीसाठी २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त विकासकामे मंजूर असून,रस्ते,पाणीपुरवठा,नदी घाट,वाहतूक व्यवस्था आणि शहरातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असताना आ.आशुतोष काळे यांनी या महत्वपूर्ण विषयाकडे सरकारचे लक्ष वेधतांना सांगितले की,कोपरगावच्या पवित्र भूमीवर दैत्यगुरु शुक्राचार्यांनी घोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून संजीवनी विद्या प्राप्त केली होती.देवगुरू बृहस्पती यांचा पुत्र कच आणि शुक्राचार्य यांच्यातील संजीवनी विद्येचा प्रसंगही याच ठिकाणी घडला आहे.गोदावरी नदीच्या काठी वसलेले हे क्षेत्र प्राचीन दंडकारण्याचा एक महत्त्वाचा भाग असून धार्मिक दृष्ट्या हे अत्यंत महत्वाचे स्थान आहे.कोपरगावमधील शुक्राचार्य मंदिराचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी विवाह करण्यासाठी कोणत्याही शुभ मुहूर्ताची आवश्यकता भासत नाही असे जगातील एकमेव मंदिर आहे त्यामुळे वर्षभर कोणत्याही दिवशी याठिकाणी विवाह कार्ये पार पडतात.

  अशा अनेक धार्मिक व पौराणिक गोष्टीमुळे कुंभमेळ्याच्या काळात देशभरातील हजारो साधुसंत आणि भाविक कोपरगावला आवर्जून भेट देत असतात.कोपरगाव मतदारसंघातील चासनळी,मोर्वीस,कुंभारी,कोपरगाव बेट,संवत्सर,कोकमठाण आणि पुणतांबा या ठिकाणी अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत.या देवस्थानांचा जीर्णोद्धार,मंदिरांचा विस्तार करणे आणि भाविकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नासिकप्रमाणे कोपरगावलाही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ.काळे यांनी सरकारकडे शेवटी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close