महिला बालविकास विभाग
नारीशक्ती ॲपवर अचूक माहिती नोंदवावी-आवाहन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी शहरी व ग्रामीण भागामध्ये अधिकाधिक शिबीरांचे आयोजन करुन लाभार्थ्यांकडून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. योजनेचे अर्ज भरुन घेताना लाभार्थ्याच्या आधारकार्डवर नमूद असलेले नाव तसेच आधारकार्डला लिंक असलेल्या बँक खात्याची माहिती नारीशक्ती ॲपवर अचूकपणे नोंदविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात १२ व १३ जुलै दरम्यान “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजनेंतर्गत विशेष शिबीरांचे आयोजन करत लाभार्थ्यांकडून ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरुन घेण्यात येत आहेत.यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.सेतू चालकांना मानधन जाहीर केले नव्हते.अंगणवाडी सेविकांना अर्ज ऑनलाइन भरल्यावर व मंजूर झाल्यावरच मानधन देण्याचे जाहीर केले होते.सदर अप चालत नव्हते त्यामुळे अनेक अडचणी निर्माणझाल्या होत्या.याबाबत आमच्या प्रतिनिधीने सर्व प्रथम वाचा फोडली होती.त्यावर शासनाने हा निर्णय घेतला आहे.
सदर आदेशात ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांचे “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने नोंदवितांना संबंधित लाभार्थ्यांच्या आधारकार्डवर लाभार्थ्याचे नमूद असलेले नाव जशेच्या तसे नारी शक्ती ॲपवर नोंदविणे आवश्यक आहे.तसेच बँकखाते क्रमांक लाभार्थ्याच्या आधारकार्डला लिंक असणे आवश्यक आहे.या बाबींची खात्री झाल्यानंतरच लाभार्थ्याचे नाव व बँक खाते क्रमांक नारीशक्ती ॲपवर नोंदविण्यात यावेत.
नवविवाहित महिलेचे नाव लगेच रेशनकार्डवर लावणे शक्य होत नसल्याने विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या विवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.तसेच या योजनेच्या लाभासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे.योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य करण्यात आले आहे.या योजनेंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी,अंगणवाडी सेविका एनयुएलएम यांचे समुह संघटक,मदत कक्ष प्रमुख व सीएमएम,आशा सेविका,सेतु सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरुन घेण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.
“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी त्यांचे अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती व इतर मार्गदर्शन शिबीरस्थळी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिबीरस्थळी उपस्थित राहून अर्ज सादर करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.