महसूल विभाग
आधार कार्डचा सावळा गोंधळ,नागरिक त्रस्त !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यात आधार केंद्रे ही बँका आणि सरकारी आस्थापना यांना चालविण्यास देण्यात आल्यापासून नागरिकांचे हाल सुरू झाले असून वर्तमान स्थितीत नागरिकांची ससे होलपत सुरू असल्याचे दिसून येत असून या प्रकियेत नागरिकांची होरपळ होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तहसील कार्यालयात बनावट जातीचे दाखले तयार करणारी टोळी कार्यरत असल्याची बातमी प्रसिध्दी होऊन त्याची शाई वाळत नाही तोच आधार कार्डचा गोंधळ समोर आला आहे.आधार कार्ड हे भारत सरकारद्वारे भारतातील नागरिकांना जारी केलेले ओळखपत्र असून त्यावर १२ अंकी अद्वितीय क्रमांक छापलेला आहे जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) जारी केला आहे.हा क्रमांक भारतात कुठेही व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा मानला जात आहे.हे आधार कार्ड वर्तमानात “जगातील सर्वात अत्याधुनिक आयडी प्रोग्राम” असे मानले जात आहे.हा रहिवासाचा पुरावा मानला जातो.(नागरिकत्वाचा पुरावा नाही) आधार स्वतःच भारतात राहण्याचा कोणताही अधिकार देत नाही.मात्र तरीही सरकारी आस्थापना सर्वच ठिकाणी विविध योजनांसाठी तो सर्वोच्च न्यायालयांच्या निकालानंतर सर्वत्र वापर होत आहे.वर्तमानात नवीन तरुण -तरुणींना त्याची गरज भासली तर त्यांना पूर्वी शहर आणि तालुक्यात मोठया प्रमाणावर सर्वत्र आधार केंद्रे दिसत होती.मात्र अलीकडील काळात सरकारने या सार्वत्रिक केंद्रांना कात्री लावून ती बँका आणि सरकारी आस्थापना यांचेकडे ही जबाबदारी सोपवली आहे.त्यामुळे,”सरकारी काम,आणि सहा महिने थांब” या म्हणीचा सार्थ अनुभव नागरिकांना आता येऊ लागला आहे.कोपरगाव शहरात वर्तमानात,’ स्टेट बँक ऑफ इंडिया’,’बँक ऑफ महाराष्ट्र’,’एच.डी.एफ.सी.बँक’,’भारतीय संचार निगम,(बी.एस.एन.एल.)आदी ठिकाणी ही केंद्रे जनतेच्या सेवेत सुपूर्त केली होती.मात्र अलीकडील काळात या ठिकाणी नागरिक गेले की त्यांना,”सदर केंद्र बंद असल्याचे” सांगून आल्या पावली परत पाठवले जात आहे.कोपरगाव शहरात केवळ स्टेट बँकेजवल ही सुविधा दिसत आहे.अन्यत्र सर्वत्र ती बंद दिसत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे.त्यातले त्यात जन्म तारखेची दुरुस्ती करायची असेल तर तालुक्यात रवंदे या एकाच ठिकाणी हे केंद्र सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान कोपरगाव शहर आणि तालुक्यात आधार केंद्रे पूर्ववत सुरू करून नागरिकांची सोय करावी अशी मागणी अनेक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.या कडे तालुका प्रशासन आता काय कारवाई करणार या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.