पाणी पुरवठा योजना
राहाता तालुक्यातील…या पाणी योजना मार्गी-माहिती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा,रस्तापूर या गावांचा मागील अनेक वर्षापासूनचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून जल जीवन मिशन योजने अंतर्गत या गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी १५ कोटी ६२ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
“मंजुर निधीतून साठवण तलावाची दुरुस्ती,साठवण तलावापासून जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन पाईप लाईन टाकणे,सोलर पॅनल,उच्च क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्थेसाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे.मागील अनेक वर्षापासून पुणतांबा-रस्तापूर या गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. काळे यांनी तीन वर्षात जवळपास ७० पेक्षा जास्त गावातील पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळवून जवळपास २७० कोटी निधी मिळवून या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला असल्याचा दावा त्यांच्या प्रसिद्धी विभागाने केला आहे.उर्वरित गावांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता.या पाठपुराव्यातून पुणतांबा-रस्तापूर या गावातील पाणी पुरवठा योजनेला निधी मिळविण्यात यश मिळविले आहे.
या निधीतून साठवण तलावाची दुरुस्ती,साठवण तलावापासून जल शुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन पाईप लाईन टाकणे,सोलर पॅनल,उच्च क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्थेसाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे.मागील अनेक वर्षापासून पुणतांबा-रस्तापूर या गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती.त्यामुळे महिला भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागत होता.मात्र या पाणी पुरवठा योजनांना आ.काळे यांनी १५.६२ कोटी निधी देवून हा प्रश्न कायमचा मार्गी लावला आहे.त्यामुळे पुणतांबा-रस्तापूर ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहे.