न्यायिक वृत्त
कोपरगाव राष्ट्रीय लोक न्यायालयात एका दिवसात….खटले निकाली

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून एका दिवसात २५३६ खटले निकाली निघाले असून तडजोडीत सुमारे ८ कोटी ३६ लाख रुपयांची वसूली झाली आहे. आज पर्यंतची विक्रमी वसूली आहे. अशी माहिती जिल्हा न्यायाधीश-१ सयाजीराव को-हाळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती व कोपरगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय लोकन्यायालया’चे आयोजन कोपरगाव न्यायालयाच्या इमारतीत करण्यात आले होते. या एकदिवसीय लोकन्यायालयात सुमारे ८ हजार प्रकरणे ठेवण्यात आली होती.
या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश-१ तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष सयाजीराव को-हाळे, जिल्हा न्यायाधीश-२ बी.एम.पाटील, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) शौकत देसाई, सहदिवाणी न्यायाधीश स्वरुप बोस, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर-२) महेश शिलार, सहदिवाणी न्यायाधीश(वरिष्ठस्तर-३) भगवान पंडित, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) स्मिता बनसोड,सहकार न्यायाधीश ल.मू.सय्यद, कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष शिवाजी खामकर, कोपरगाव जिल्हा सरकारी वकील ॲड.अशोक वहाडणे, कोपरगाव जिल्हा सहाय्यक सरकारी वकील शरद गुजर, सहाय्यक सरकारी वकील अशोक टुपके, मनोहर येवले, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांच्यासह लोकन्यायालयात दाखल केलेल्या विविध खटल्यांचे पक्षकार, वकील, संबंधित खात्यांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी लोकन्यायालयाचे उद्घाटन पक्षकार अनिल सोनवणे, कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष शिवाजी खामकर, न्यायाधिश, सरकारी वकील
यांच्या उपस्थितीत झाले.
या लोक न्यायालयासाठी नऊ पॅनल करण्यात आले होते. यात पॅनल प्रमुख, सदस्य, कनिष्ठ लिपिक, शिपाई यांचा समावेश करण्यात आला होता. लोकन्यायालयात फौजदारी प्रकरणे, वाहन अपघात, भूसंपादन प्रकरणे, एन.आय.कायदा १३८ ची प्रकरणे, युनियन बॅंक, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर बॅंका व पतसंस्थांची प्रकरणे, ग्रामपंचायत, बी.एस.एन.एल यांची प्रि-लिटिगेशन प्रकरणे, सहकार न्यायालय, तहसील कार्यालय, नगरपरिषद यांची दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणांचा समावेश होता.
यावेळी कार्यालयीन अधीक्षक सुनील निसाळ, तालुका विधी सेवा समितीचे सागर नगरकर यांचे सह न्यायालयीन अधिकारी आणि कर्मचारी, वकील उपस्थित होते. लोकन्यायालयाच्या माध्यमातून सर्वाधिक खटले निकाली निघाले असून निकाली निघालेल्या प्रकारणामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.