न्यायिक वृत्त
साईबाबा संस्थानला ऑक्सिजन प्रकल्प युद्धपातळीवर स्थापन करा-उच्च न्यायालय
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावसह राज्यात मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्ण व मृत्युदर वाढत असल्याच्या पार्श्वभुमीवर शिर्डी येथील साईबाबा संस्थानने तातडीने प्राणवायू बनविणारा प्रकल्प व कोरोना तपासणीसाठी आवश्यक असलेली आर.टी.पी.सी.आर.प्रयोग शाळा तातडीने सुरु करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठाने नुकतेच दिल्याने कोरोना बाधित रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत मिळणार आहे.त्यामुळे शिर्डीसह नगर जिल्हा व नजीकच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
साईबाबा संस्थान ट्रस्ट येथे नवीन आर.टी.पी.सी.आर.प्रयोग शाळा लवकरात लवकर युद्धपातळीवर स्थापन करण्याचे आदेश दिले असून सदर प्रयोगशाळेचा भविष्यात पॅथॉलॉजिकल प्रयोग शाळा म्हणून करावा संस्थानच्या काही तज्ञ डॉक्टर्सनी प्रयोग शाळा मधील कामाचे प्रशिक्षण देखील घेतले असल्याची बाब संस्थानच्या वतीने निदर्शनात आणून देण्यात आली आहे.
कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोवीड-१९ चा प्रादुर्भाव व दुसऱ्या लाटेत वाढणारी रुग्णाची संख्या लक्षात घेता साईबाबा संस्थान ट्रस्ट येथे नवीन आर.टी.पी.सी.आर.प्रयोग शाळा स्थापन करून कोवीड रुग्णांची तातडीने चाचणी करण्याची सोय व्हावी,तसेच डॉक्टर,नर्सेस,वॉर्डबॉय आदींची तातडीने भरती व्हावी तसेच साईबाबा संस्थानला कोरोनावर मात करण्यासाठी लागणारी औषधें तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी ऍड.सतीश तळेकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित दाखल केली होती त्याची सुनावणी आज सकाळी संपन्न झाली आहे.त्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायायालयाचे न्या.एस.व्ही.गंगापूरवाला व न्या.एस.डी.कुलकर्णी यांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे.
प्रधान जिल्हा न्यायाधीश अहमदनगर,साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी,अतिरिक्त विभागीय आयुक्त,नासिक व सह धर्मादाय आयुक्त,अहमदनगर यांची तदर्थ समिती धोरणात्मक व आर्थिक निर्णय उच्च न्यायालयाच्या परवानगीने घेत आहे.सदर समिती ऑक्टोबर २०१९ पासून साईबाबा संस्थानचा कार्यभार आजवर सांभाळत आहे.तदर्थ समितीला याचिकाकर्ते यांनी वरील विषयावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी पत्रव्यवहार केले होते.तसेच याचिकाकर्ते संजय काळे व सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी साईबाबा संस्थानच्या डॉक्टर्स,नर्सेस,अधिकारी व इतर यांना संपर्क करून वरील बाबीचीं कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा देखील केला होता मात्र त्याला यश येत नव्हते त्यामुळे त्यांनी या बाबत उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता.
त्याबाबत आज दि.२० एप्रिल रोजी उच्च न्यायायालयाचे न्या.एस.व्ही.गंगापूरवाला व न्या.एस.डी.कुलकर्णी यांनी सुनावणी घेऊन हे आदेश दिले आहे.साईबाबा संस्थान ट्रस्ट येथे नवीन आर.टी. पी.सी.आर.प्रयोग शाळा लवकरात लवकर युद्धपातळीवर स्थापन करण्याचे आदेश दिले.सदर प्रयोगशाळेचा भविष्यात पॅथॉलॉजिकल प्रयोग शाळा म्हणून करावा असेही आदेश दिले आहे.संस्थानच्या काही तज्ञ डॉक्टर्सनी प्रयोग शाळा मधील कामाचे प्रशिक्षण देखील घेतले असल्याची बाब संस्थानच्या वतीने निदर्शनात आणून देण्यात आली आहे.तसेच साईबाबा संस्थानला कोरोनावर मात करण्यासाठी लागणारी औषधें तातडीने खाजगी कंपनीकडून विना निविदा प्रक्रियेने खरेदी करण्याचे आदेश दिले आहे.या शिवाय नगर जिल्हाधिकारी यांनी कोरोनासाठी जिल्ह्यात विविध हॉस्पिटलला लागणारी औषधे,यंत्रसामुग्रीच्या मागणीचा अहवाल तातडीने शासनास सादर करून शासनाने सदर हॉस्पिटलला योग्य दरात औषधे,यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.याशिवाय साईबाबा संस्थानच्या ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देत उच्च न्यायालयाने सदर प्रकल्प युद्धपातळीवर तातडीने उभा करावा व जास्त ऑक्सिजन निर्मिती झाल्यास जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांना पुरवावा असे देखील आदेश दिले आहेत.
सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड.प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे यांनी काम पाहिले तर शासनाच्या वतीने ऍड. एस.जी.कार्लेकर, तर संस्थांच्या वतीने ऍड.अनिल बजाज यांनी काम पाहिले आहे.