न्यायिक वृत्त
शेतकऱ्यांना…या कर्जमुक्तीचा तत्काळ लाभ द्या-उच्च न्यायालय

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
महाराष्ट्र शासनाने सन -2017 रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज मुक्ती योजना अंमलात आणून सदर योजनेप्रमाणे जून 2016 रोजी थकीत असलेले दिड लाख पर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता.मात्र काही शेतकऱ्यांना त्यापासून वंचित ठेवले होते.याबाबत नुकत्याच उच्च न्यायालयात संपन्न झालेल्या अवमान याचिकेत न्यायालयाने सरकारला सहा हप्त्यात सदर कर्जमाफी देण्याचे फर्मान सोडले आहे त्यामुळे राज्यातील सहा लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होऊन जवळपास 06 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार असल्याने शेतकरी संघटनेने याचे जोरदार स्वागत केले आहे.

“शेतकरी संघटनेनं दाखल केलेल्या अवमान याचिकेत महाराष्ट्रातील 6 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना सदर निर्णयाचा फायदा होऊन 1.5 लक्ष रुपयांची कर्ज माफी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मानले जात आहे.सदर प्रस्तावाप्रमाणे जवळपास 05 हजार 985 कोटी रुपये या योजनेच्या माध्यमातून शासनाला शेतकऱ्यांना सहा आठवडयात द्यावे लागणार आहे”-ऍड.अजित काळे,उपाध्यक्ष,प्रदेश शेतकरी संघटना.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,” राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर अवघ्या काही दिवसात कर्जमाफीचा फुगवटा पाहून सरकारने आपल्याच निर्णयावर ‘यू ‘ टर्न घेतला होता.परिणामी’छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’चे पोर्टल बंद करण्यात आले होते.त्यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.त्यावेळी सरकारने या योजनेची तीन भागांत विभागणी केली होती.दिड लाखांची कर्जमाफी,वन टाइम सेटलमेंट आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान असा राज्यातील थकीत शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार होता.मात्र सरकारने आपल्याच निर्णयावर पाठ फिरवल्याने याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात श्रीरामपूर तालुक्यातील याचिका कर्ते शेतकरी भाऊसाहेब बजरंग पारखे व कांतीबाई हळनोर या शेतकऱ्यांच्या वतीने त्याचे वारस साहेबराव हळनोर आदींनी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या विधी सहकार्याने सन-2022 साली जनहित याचिका दाखल केली होती.

दरम्यान त्याबाबत संबधित जिल्हा बँक अहिल्यानगर,जिल्हा उपनिबंधक आदीकडे पाठपुरावा करण्यात आला होता.मात्र त्यांनी सदरचे कर्ज हे कर्जमाफीच्या यादीत न आल्याने कर्जमाफीवरून असमर्थता व्यक्त केली होती व सरकारने दगडाखाली गुंतलेली आपली बोटे सोडवून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.त्या विरूध्द ही न्यायिक लढाई सुरू झाली होती.त्यानंतर ऍड.काळे यांनी उच्च न्यायालयास पोर्टल बंद असल्याचे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले असल्याची बाब लक्षात आणून दिली होती.सदरचा युक्तिवाद ग्रहीत धरून उच्च न्यायालयाने तो मान्य करुन राज्यस्तरीय समितीने त्यांचे नांव ग्रिन लिस्टमध्ये टाकून त्यांना या योजनेचा लाभ दि. 30 सप्टेंबर 2022 च्या आत द्यावा असा आदेश पारित केला होता.

दरम्यान मात्र तरीही राज्य सरकारने त्याकडे कानाडोळा केला होता.परिणामी शेतकरी संघटनेने याबाबत उच्च न्यायालयात अवमान याचिका क्रं.150/2023 ही दाखल करून न्यायलायचा दरवाजा ठोठावला होता.त्यानंतरही संवेदनशीलतेचा अभाव असलेल्या सरकारने चालढकल केली होती.त्यानंतर 10 ऑक्टोंबर 2025 रोजी याबाबत एक आठवड्याचे आत सरकारला आपले म्हणणे मांडण्याची शेवटची संधी दिली होती.मात्र सरकारने त्याची गांभीर्य घेतले नाही व सदरची प्रस्ताव वित्त विभागाकडे प्रलंबित असल्याचे सपशेल बतावणी केली होती.

परिणामी सरकारी वकिलांच्या या सोपस्कारामुळे उच्च न्यायालय न संतापले तर नवल होते.परिणामी उच्च न्यायलयाने सरकारला नुकत्याच संपन्न झालेल्या सुनावणीत चांगलेच फटकारले असून याबाबत अड.काळे यांनी,”सन 2023 पासून सदरचे प्रकरण हे शासन स्तरावर प्रलंबित असून त्यावर कोणताच निर्णय का होत नाही.शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ पात्र असून देखील होत नसल्याने त्यांचेवर व्याजाचा डोंगर वाढत चाललाअसल्याचे व त्यांना नविन कर्ज मिळत नसल्याचा युक्तीवाद अड.अजित काळे यांनी जोरदारपणे केला होता.परिणामी याची दखल उच्च न्यायालयाने घेतली असून महाराष्ट्रातील सर्व पात्र असलेल्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ प्रस्तावाप्रमाणे निर्णय घेऊन सहा आठवडयाचा आत निधी उपलब्ध करुन वितरीत करण्याचा आदेश केला आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील 6 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना सदर निर्णयाचा फायदा होऊन 1.5 लक्ष रुपयांची कर्ज माफी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मानले जात आहे.सदर प्रस्तावाप्रमाणे जवळपास 05 हजार 985 कोटी रुपये या योजनेच्या माध्यमातून शासनाला शेतकऱ्यांना सहा आठवडयात द्यावे लागणार आहे.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या सुनावणीत राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने ॲड.अजीत काळे यांनी काम पाहिले आहे.त्यांना ॲड.साक्षी काळे(काटे),ॲड.कृष्णा नरवाडे,ॲङ.विनायक दहिहंडे आदींनी सहकार्य केले आहे.
———————————–
*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.



