न्यायिक वृत्त
कुऱ्हाडीने मारहाण,दोन आरोपीस एक वर्षांची शिक्षा,०४ हजारांचा दंड

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील फिर्यादी राहुल रमेश मोरे याने ट्रॅक्टर भाड्याचे पैसे दिले नाही याचा राग धरून त्यास रस्त्यात अडवून लोखंडी पट्टीने व कुऱ्हाडीने केलेल्या मारहाण प्रकरणी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांचे समोर सुनावणी होऊन यातील त्याच गावातील आरोपी तुळशीराम पंढरीनाथ शेळके व त्याचा मुलगा चेतन तुळशीराम शेळके या दोघांना एक वर्षाची प्रोबेशन कालावधीची शिक्षा व ०४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

फिर्यादि राहुल मोरे व भाऊ अशोक मोरे यास आरोपी तुळशीराम शेळके व त्याचा मुलगा चेतन शेळके आदींनी वाईटसाईट शिवीगाळ करून टॉमीने मारहाण केली होती.एवढ्यावर ते थांबले नाही त्यांनी फिर्यादीचे घरी येऊन ट्रॅक्टरच्या पैसे का देत नाही ? असा जाबसाल करून आरोपी चेतन शेळके याने राहुल मोरे यास कुऱ्हाडीने डोक्यावर,उजव्या बाजूस मारले होते त्यावर कोपरगाव येथील न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी राहुल मोरे व तुळशीराम शेळके हे दोघे एकाच गावातील रहिवासी असून यातील फिर्यादी मोरे याने आपल्या शेताचे काम करण्यासाठी आरोपी तुळशीराम शेळके याचा ट्रॅक्टर भाड्याने लावला होता.त्याची बाकी त्यास देणे लागत होती.मात्र सदर रक्कम वेळेत गेली नव्हती.त्याचा राग मनात धरून फिर्यादी राहुल मोरे हा आपल्या दुचाकीवरून आपल्या पत्नीला घेऊन दि.२१ जानेवारी २०१७ रोजी दुपारी ०१ चे सुमारास मंजूर बस स्थानकावरून आपल्या शेताकडे जात असताना आरोपी तुळशीराम शेळके याने त्यास अडवून आपल्या ट्रॅक्टरच्या भाड्याचे पैसे मागत होता.
त्यावेळी फिर्यदीचा भाऊ अशोक मोरे हा त्यास म्हणाला की,”तुमचे पैसे आम्ही सोमवारी देतो”मात्र त्यास आरोपी तुळशीराम शेळके याने दुजोरा दिला नाही उलट त्याने राहुल मोरे यास धक्काबुक्की केली होती.दरम्यान घटनास्थळी आरोपी तुळशीराम शेळके यांचे दोन मुले ज्ञानेश्वर शेळके व चेतन शेळके,लताबाई शेळके,आणखी अनोळखी दोन इसम असे फिर्यादीच्या घरी आले होते व त्यांनी फिर्यादिचा भाऊ अशोक मोरे यास वाईटसाईट शिवीगाळ करून टॉमीने पायावर,उजव्या बाजूने डोक्यावर व पोटावर मारहाण केली होती.एवढ्यावर ते थांबले नाही त्यांनी फिर्यादीचे घरी येऊन ट्रॅक्टरच्या पैसे का देत नाही ? असा जाबसाल करून आरोपी चेतन शेळके याने राहुल मोरे यास कुऱ्हाडी ने डोक्यावर,उजव्या बाजूस मारले तर प्रमुख आरोपी तुळशीराम शेळके याने ट्रॅक्टरच्या पट्टीने राहुल मोरे यास उजव्या हातावर,पाठीवर व पायावर मारहाण करून गंभीर जखमी केले होते.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याचा दावा कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडित याचे समोर सुरू होता.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली असून यात सरकारी पक्षाचे वतीने अभियोक्ता प्रदीप रणधीर यांनी जोरदार युक्तिवाद केला होता तर आरोपींच्या वतीने ऍड.यांनी युक्तिवाद केला होता.दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद गृहीत धरून आरोपी तुळशीराम शेळके व त्याचा मुलगा चेतन शेळके यांना भा.द.वी.कलम ३२४,३४ प्रमाणे दोषी धरून एक वर्षाची प्रोबेशन कालावधीसाठी शिक्षा व रुपये ०४ हजारांचा दंड ठोठावला आहे.या निर्णयाचे कोपरगाव आणि मंजूर परीसरात स्वागत होत आहे.