न्यायिक वृत्त
पासष्ट कोटींची विमा भरपाई,…या वकिलांचा जाहीर सत्कार !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
सन -२०२० खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याची ६५ कोटी रुपयांची रक्कम मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर येथील खंड पिठातून जनहित याचिकेद्वारे मिळवून दिल्याबद्दल शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी मिळवून दिल्याबद्दल त्यांचा परभणी जिल्ह्यातील बनवस,पालम येथील शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीच्या हाती आली आहे.त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त भागीदारातुन प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जाते.ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरला आहे अशांना नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो.सन २०२०-२१ मधील रब्बी हंगामातील पिकांवर गारपीट त्याचप्रमाणे पावसाचे संकट ओढावले होते.अनेक पिकांचे शेतकऱ्यांच्या खरीप व रब्बी हंगामातील अतोनात नुकसान झाले होते.शासनाने झालेल्या नुकसानीचा विचार करता खरिपानंतर आता रब्बी हंगाम २०२१-२२ मधील पीक विमाही देऊ केला असताना परभणी जिल्हयातील काही शेतकऱ्यांना मात्र वंचित ठेवले होते.
दरम्यान याबाबत याचिकाकर्ते हेमचंद्र शिंदे,विश्वंभर गोरवे,गोविंद लांडगे सर,माधव घुन्नर आदींनी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.त्याची सुनावणी संपन्न होऊन उच्च न्यायालयाने याबाबत राज्य सरकार व संबधित कंपनीस ६५ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचा आदेश दिला होता.त्यात शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मोफत विधी सहाय्य करून महत्वाची भूमिका निभावली होती.त्यामुळे हा लढा लढणे शक्य झाले होते.याचे रास्त भान ठेवून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऍड.अजित काळे यांचा बनवस,पालम येथील महादेव मंदिरात जाहीर नागरी सत्कार नुकताच आयोजित केला होता.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट,परभणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम,यांचेसह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते.त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी ऍड.अजित काळे यांना मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ देऊन गौरव केला आहे.
सदर प्रसंगी प्रास्ताविक हेमचंद्र शिंदे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन कालिदास आपेट,डॉ.सुभाष कदम यांनी केले तर सूत्रसंचलन विश्वंभर गोरावे,गोविंद लांडगे यांनी केले आभार माधव घुन्नर यांनी मानले आहे.