नैसर्गिक आपत्ती
आपत्ती व्यवस्थापनाची घेतली बैठक,कोपरगावात अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीपात्रात नांदुर मध्यमेश्वर धरणातून सोडण्यात आलेला मोठा विसर्गामुळे कोपरगाव तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी टास्क फोर्सच्या सर्व विभागांनी सज्ज राहावे असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.
“कोपरगाव नगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या बोटीची चाचणी घेऊन बोट नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज ठेवावी त्यामुळे जीवित हानी टाळण्यास मदत होईल.वाढत्या पाण्याचा अंदाज घेऊन गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांना आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी योग्य नियोजन करावे.पावसामुळे भूमिगत जलसाठ्यात नवीन पाणी पाझरल्यामुळे नागरिकांना अतिसार किंवा अन्य साथीच्या आजारांचा त्रास होऊ शकतो याची काळजी घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीने आवश्यक असलेले जल शुद्धीकरणाचे योग्य नियोजन करावे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष साईबाबा संस्थान शिर्डी.
मागील दोन ते तीन दिवसांपासून धरणक्षेत्रात कोसळत असलेल्या आषाढ सरींनी सुरु केलेल्या तांडवामुळे धरण साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात जवळपास ७८ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातून वाहत असलेल्या गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होवून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत.या परिस्थितीत जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी नागरिकांना संभाव्य परिस्थितीत काळजी घेण्याचे आवाहन करून आ.काळे यांनी तातडीने मंगळवार (दि.१२) रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी यावेळी तहसीलदार विजय बोरुडे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप, वैद्यकीय अधीक्षक डॉ.गायत्री कांडेकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दिलीप गाडे,सहाय्यक अभियंता सचिन ससाणे,कनिष्ठ अभियंता आर.बी.चौधरी,ग्रामीण रुग्णालय आरोग्य सहाय्यक एस.ए.जोशी,कोपरगाव नगरपरिषद उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे,आरोग्य विभाग प्रमुख सुनील आरण,जल निस्सारण विभागाचे अंबादास पंडोरे,वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता वाल्मिक लोखंडे,सहाय्यक अभियंता कल्याणी शुक्ल,पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,कार्याध्यक्ष संतोष चवंडके,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,अजिज शेख,दिनकर खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की,”पाटबंधारे विभागाने सर्व विभागांच्या संपर्कात राहून गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे विसर्गाची सविस्तर माहिती सर्व विभागांना वेळेवर द्यावी परिणाम स्वरूप संभाव्य परिस्थितीचा अंदाज येईल.आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत ठेवून नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ती तातडीने उपलब्ध करून द्यावी अशा सूचना तहसीलदार विजय बोरुडे यांना दिल्या आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात विविध आजार डोके वर काढतात त्याची खबरदारी घेवून आरोग्य विभागाने मतदार संघात आवश्यक त्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करून संभाव्य आजारांवर आवश्यक असणाऱ्या औषधांचा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून देऊन नागरिकांना वेळेत औषधांचा पुरवठा होईल याची काळजी घ्यावी.
कोपरगाव नगरपरिषद व पंचायत समितीने शहर व तालुक्यातील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा सर्व्हेक्षण करून या इमारतीमुळे अपघात होवून जीवित हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.पुराच्या पाण्यामुळे गोदावरी नदीच्या काठावरील वाकलेले पोल,झोळ पडलेल्या वीजवाहिन्या,नादुरुस्त झाल्यास त्यांची ऊर्जा विभागाने तातडीने दुरुस्ती करावी.जल निस्सारण विभागाने पावसाळ्यापूर्वीची तयारी पूर्ण केली असली तरी पावसाची सुरू असलेली संततधार व गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेले पाणी त्यामुळे बहुतांश ओढे,नाले,चर वाहते झाले आहेत.त्या प्रवाहात वाहत आलेल्या झाडा-झुडपांमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडचणी येवू शकतात त्याची खबरदारी जल निस्सारण विभागाने घेवून या अडचणी दूर कराव्यात अशा सूचना त्यांनी शेवटी केल्या आहेत.